Posts

Showing posts from June, 2018

स्वागतगान

 *स्वातीचे शब्दमोती* गगनावर पसरून निलिमा दिव्य आपुल्या किरणांचा रविराज निघती भूवरी मुकुट लेवूनी सोन्याचा पहाटचा तो शीतल वारा तृषार्त धरणीस सांगी दवबिंदूचे मोती झेलूनी मिरव तू अंगोपांगी लेवूनी हिरवाईचा साज वृक्षराज तो पाही वाट अवखळ त्या किरणांची मजवर होईल कधी सुखकर बरसात झाडावरी बैसून कुठेसे कोकिळ घेई मंजुळ तान रविराजाच्या स्वागतास जणू गाई मंगल स्वागतगान उधळीत केशर नभांगणावर नाजूक सोनेरी क्षितिजावरती हळूच अवतरे अरुणाची स्वारी ! © स्वाती शृंगारपुरे 📞 8692893984

पोवाडा

*स्वातीचे शब्दमोती*   *स्त्री शक्ती -एक लोकजागर* (चाल - पोवाडा) अगं नारी गं.. जीरंजीजी जीजीजी सा-या सृष्टीचीही राणी असे देखणी गोड हिची वाणी पण रणांगणी मर्दानी शत्रूला पाजतसे पाणी.. जीजीजीजी... अशी ही स्त्री.. क्षणाची पत्नी ; तर अनंत काळची माता... पण प्राक्तनात हिच्या... नेहमीच उपेक्षा... येता लेक ही जन्माला बापदोष देत नशिबाला अपराध काय मी केला आली पोटी कन्या जन्माला जीजीजीजी हळूहळू पोर मोठी होऊ लागते. घर ,  शाळा , अभ्यास सर्वच आघाड्या यशस्वीरित्या सांभाळते. सगळी आव्हाने झेलत ती यशिचे गड सर करते.. ज्ञानेशाची ती मुक्ताई उपदेश जगाला देई शिवबाची जिजाऊ आई शूरवीर राष्ट्राला देई जीजीजीजी ती बनली सावित्रीबाई शिक्षणाचा ध्यास ती घेई मर्दानी लक्षुमीबाई इतिहास नोंद तिची घेई जीजीजीजी असा प्रवास करत करत स्त्री अवकाशात झेपावली.. कल्पना चावला , सुनिता विल्यम्स.. तिथेही स्त्रीने आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली.. जिंकण्याची असे तीज आस गवसणी घाली गगनास भेदुनी जाय अंबरास विस्तीर्ण तिचे आकाश जीजीजीजी पाहिलंत लोकहो ?? किती विविध रुपे ही स्त्रीची ! अशा लेकी आ...

दुधावरची साय

*स्वातीचे शब्दमोती*         *दुधावरची साय* नातं "ती"चं नी माझं असे एक अपुर्वाई गोड तिच्या हास्याने माझे घरदार भरून जाई गाल गोबरे जणू सायीचे मऊ मुलायम कांती ऐटीत बसली मांडीवर अन् पाहे हसून सभोवती नभांगणातून जणू उतरली ही शुक्राची चांदणी अविरत पेरित हास्य गातसे मंजुळ बडबडगाणी कधी बोलते आई आई कधी बोलते बाबा नजरेने पण मलाच खुणवी घ्या मज आजोबा चला जाऊया भूर फिराया उचलूनी घ्या मज घट्ट आनंदाने मीही तिचा मग पुरवित जातो हट्ट तिचे नि माझे असे वेगळे एक अनोखे राज्य राजकुमारी ती राज्याची अन् मी सेवेस सज्ज माया अपार माझी तिजवर जरी दूरदेशी ती असे तिचाच ध्यास अन् सदोदित ती मनात माझ्या वसे आजोबांची नात जशी ही गोड मिठाईमेवा आनंदाचा मला गवसला हा अनमोल ठेवा ! © स्वाती शृंगारपुरे 8692893984

अभंग

*स्वातीचे शब्दमोती*                      *अभंग* असो देवा माझा  तुला नमस्कार।  तूच एक थोर      विश्वामाजी ॥ अपार करुणा  मायेचा निर्झर । प्रेमाचे पाझर  तुझ्या ठायी ॥ तूच माझा विठू  तूच माझा राम । सावळा तो श्याम  तूच की रे ॥ ग्रासले मी देवा  वाहूनी संसारा । सांभाळ हा सारा  तुझा खेळ ॥ जेथे जेथे माझे  अपुरे प्रयास । प्राक्तनाचे फास  आवळती ॥ तेथे तेथे तू रे  सावर मजला । हीच रे तुजला  विनवणी ॥ चरणी तुझ्या मी  सदा लीन व्हावे । ओठी सदा यावे   नाम तुझे ॥ सुखाचा तो व्हावा  जीवनप्रवास ।  हीच एक आस      "स्वाती" म्हणे ॥ © स्वाती शृंगारपुरे 18/04/2018 📞 8692893984

तू नसताना

*स्वातीचे शब्दमोती*             *तू नसताना* तू नसताना व्याकूळ मन हे तुझ्या आठवाने तू नसताना अफाट जग हे वाटे सुनेसुने एकमेकांवाचून अपुले अस्तित्व कधी नव्हते अंतरी माझ्या तूच सदोदित मी तुलाच अनुभवते नसताना तू जगरहाटी सुरळीत चालू असते रे ह्रदयमंदिरी माझ्या परंतु तुझीच मूर्ती वसते रे तू नसताना छळतो मजला माझा भूतकाळ नयनांतून मग आसवांची वाहे मौक्तिकमाळ तू नसताना वाटे मज जणू जीवन संपले सारे शोक अनावर मनात दाटे ह्रदयी वादळवारे ©स्वाती शृंगारपुरे 8692893984

अनामवीरा

*स्वातीचे शब्दमोती*   *अनामवीरा सलाम तुजला* कोण बरे हा शेतामधूनी पिकवी माणिकमोती साथ न देई निसर्ग तरीही घाम आपुला ओती अपार मेहनत करुनी कोण हा रुजवी बीजाला अनामवीरा सलाम तुजला तुझ्या अफाट जिद्दीला येता जरी किती संकट मोठे त्यावर करीसी मात कधी पूर,कधी अवर्षण सृष्टी देई ना साथ कधी झेलावे लागे तुजला दुष्काळ वा मंदीला अनामवीरा सलाम तुजला तुझ्या अफाट जिद्दीला कधी करावी लागे तुजला दुबार पेरणी जीवघेणी कधी गारपीट,कधी कीडही कधी बरसे अगणित पाणी शूरवीर तू अतिधैर्याने झेलिसी आपत्तीला अनामवीरा सलाम तुजला तुझ्या अफाट जिद्दीला निरंत राहो धैर्य तुझे हे असेच अबाधित पोशिंदा तू विश्वाचा तरी सदा उपेक्षित नको हरवू देऊ राजा तुझ्या उमेदीला अनामवीरा सलाम तुजला तुझ्या अफाट जिद्दीला... © स्वाती शृंगारपुरे 8692893984

पहिलं प्रेम

*स्वातीचे शब्दमोती* *पहिलं प्रेम* बहरलेल्या प्राजक्तासारखं गंधित आणि बेभान असतं खरं सांगते पहिलं प्रेम खूप खूप छान असतं मित्र मैत्रिणी , बहीण भाऊ कुण्णी कुण्णी आठवत नाहीत प्रेमवेडे प्रेमाखेरीज काही मनात साठवत नाहीत ह्रदयपटलावरचं ते सोनसळी पान असतं खरं सांगते पहिलं प्रेम खूप खूप छान असतं " तो " आणि  " ती " मग स्वतःचे असे उरत नाहीत गोड गोड त्या क्षणांच्या आठवणी कधी सरत नाहीत आतुरलेल्या पक्ष्यांचं ते मंजूळ,सुरेल गान असतं खरं सांगते पहिलं प्रेम खूप खूप छान असतं धुंद चांदणे बेभान करते निळा चंद्रमा हसत असतो उनही भासू लागते शीतल पाऊस ह्रदयात बरसत असतो थंडी,  वारा उन , पाऊस सारंच कसं बेभान असतं खरं सांगते पहिलं प्रेम खूप खूप छान असतं पहिल्या प्रेमावर लिहील्या जातात कविता आणि कथा असतात बंध रेशमाचे नसते कसलीच व्यथा रंगरंगिल्या फुलांचं ते हिरवंगार रान असतं खरं सांगते पहिलं प्रेम खूप खूप छान असतं खूप खूप छान असतं... ©स्वाती सुबोध शृंगारपुरे... 📞8692893984

बाबा

*स्वातीचे शब्दमोती* *बाबा* आठवणींच्या राज्यात मन माझे रमते बाबा तुमच्या विरहाने व्याकूळ ते होते आजही आठवतो तुमचा तो आश्वस्त स्पर्श हट्ट माझे पुरवताना होतसे तुम्हा हर्ष हट्टी होते बाबा मी कधी विचार केला नाही मात्र हौस माझी पुरली नाही असा दिवस गेला नाही माझ्या उत्तम प्रगतीकडे तुमचे असे लक्ष वाचन करावे भरपूर मी हा तुमचा असे कटाक्ष तुम्हीच जाणवून दिलंत मला काटकसरीचं मोल पाठीशी ठाम उभे राहून ढळू दिला नाहीत तोल तुमच्या संस्कारातूनच आज पडत आहे पाऊल तरी मन डगमगते जेव्हा अकल्पिताची लागे चाहूल विश्वासाची माणसे कधी निघून जातात सोडून साथ नकळत अचानक सुटून जाती हातामधले प्रेमळ हात तेव्हा मात्र तुमच्या कुशीत शिरावंसं वाटतं गळामिठी मारून तुम्हा रडावंस वाटतं संपला ऋणानुबंध तुटले रेशीमधागे काहीच शिल्लक नाही म्हणता उरल्या आठवणी मागे शब्द मुके सूर मुके,माझी कविताही अबोल झाली वेदना उरांतली आसवांत न्हाली शोधते हे उदास मन तुम्हा चंद्रतार्यांत ह्या लाडक्या लेकीसाठी बाबा तुम्ही परत या.... बाबा तुम्ही परत या... ©स्वाती शृंगारपुरे... 8692893984 🌹🌹...

घर तुझं नि माझं

घर तुझं नि माझं हिरवाईने नटलेलं आभाळ होऊन तुझ्यामाझ्या ह्रदयामध्ये दाटलेलं घर तुझं नि माझं तू राजा अन् मी राणी प्रेमात भिजावे चिंब अन् गावी आनंदाची गाणी घर तुझं नि माझं जणू मायेचा ओलावा स्वप्नातल्या संसाराचा पापण्यांत जपलेला ठेवा घर तुझं नि माझं जणू प्रेमभरली मिठी निसटलेल्या क्षणांना कवेत घेण्यासाठी !

शिदोरी

*शिदोरी* भल्या पहाटे उठून निघतो रानी शेतकरी कारभारीणही करून देते त्यास शिदोरी भाजी,कांदा,चटणी आणि ज्वारीची भाकरी फडक्यामध्ये बांधून घेऊन मार्गक्रमणा करी मजूर राबती रस्त्यामध्ये किंवा कारखान्यात कष्टावीण ना अन्न पडे कधी त्यांच्या पानात सोबत घेती शिळी भाकरी अन् मिरचीचा ठेचा सणावारीही हिच शिदोरी प्राक्तनात त्यांच्या बाळ सानुले घेऊन निघता दूर प्रवासास ध्यास आईचा कुठेही त्याला होऊ नये त्रास भूक लागता छबकड्यास त्या पाजण्यास घेई हीच शिदोरी बाळाची जणू अमृत बनूनी जाई शाळेमधली हवीहवीशी ती मधली सुट्टी दप्तरातल्या डब्याशी बट्टी अन् अभ्यासाशी कट्टी मस्त शिदोरी शेव,चकली किंवा गुडदाणी चटकन् खावी पटकन् प्यावे बाटलीतले पाणी असे प्रसंग वेगवेगळे , वेगवेगळ्या व्यक्ती शिदोरी खाऊनी आपआपली क्षुधा शमविती गृहातून निघताना बाहेर घ्यावी बरोबरी भुकेल्याची भूक भागवी ही छोटी शिदोरी.... © स्वाती शृंगारपुरे

विरह (एका बालमित्राच्या विनंतीवरून )

*स्वातीचे शब्दमोती* गुलजार ह्या रुपाला पाहून दंगलो मी बेधुंद होऊनिया स्वप्नात रंगलो मी उनाड कुंतलाचा हा रेशमी पिसारा मदहोष कुंतलात अलवार गुंतलो मी ह्रदयी हळूच घुसती नयनांचे खट्याळ तीर लागून तो निशाणा घायाळ जाहलो मी हे रूप तुझे शराबी मज वाटले हवेसे नजरेने तुला पिउनी कैफात झिंगलो मी कळले मुळीच नाही सरला कितीक काळ फे-यात प्राक्तनाच्या अगतिक जाहलो मी विरह तुझा गं राणी तरीही साहवेना विरहात आसवांनी सचैल नाहलो मी आता नुरे ही आशा होशिल तू गं माझी अव्यक्त प्रेम माझे गजलेत गायलो मी "राधा" जरी नसे ही जीवनात "मोहना"च्या मानून वास्तवाला तरी तुझाच राहीलो मी ! © स्वाती शृंगारपुरे 8692893984