शिदोरी

*शिदोरी*

भल्या पहाटे उठून निघतो रानी शेतकरी
कारभारीणही करून देते त्यास शिदोरी
भाजी,कांदा,चटणी आणि ज्वारीची भाकरी
फडक्यामध्ये बांधून घेऊन मार्गक्रमणा करी

मजूर राबती रस्त्यामध्ये किंवा कारखान्यात
कष्टावीण ना अन्न पडे कधी त्यांच्या पानात
सोबत घेती शिळी भाकरी अन् मिरचीचा ठेचा
सणावारीही हिच शिदोरी प्राक्तनात त्यांच्या

बाळ सानुले घेऊन निघता दूर प्रवासास
ध्यास आईचा कुठेही त्याला होऊ नये त्रास
भूक लागता छबकड्यास त्या पाजण्यास घेई
हीच शिदोरी बाळाची जणू अमृत बनूनी जाई

शाळेमधली हवीहवीशी ती मधली सुट्टी
दप्तरातल्या डब्याशी बट्टी अन् अभ्यासाशी कट्टी
मस्त शिदोरी शेव,चकली किंवा गुडदाणी
चटकन् खावी पटकन् प्यावे बाटलीतले पाणी

असे प्रसंग वेगवेगळे , वेगवेगळ्या व्यक्ती
शिदोरी खाऊनी आपआपली क्षुधा शमविती
गृहातून निघताना बाहेर घ्यावी बरोबरी
भुकेल्याची भूक भागवी ही छोटी शिदोरी....

© स्वाती शृंगारपुरे

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं