साहित्य संमेलन अनुभव
*स्वातीचे शब्दमोती* *साहित्य संमेलन-माझा अनुभव* यंदाचे साहित्य संमेलन बडोद्याला होणार हे समजल्यावर आधी मन साशंक झाले. गुजराती समाजाच्या ह्या भूमीत मराठी किती जणांना समजत असेल अशी शंका वाटली. पण सयाजी महाराजांच्या ह्या नितांतसुंदर नगरीत साहित्याला किती महत्व आहे हे शहरात प्रवेश केल्यावर लगेचच जाणवले. शहराच्या सर्वच प्रमुख भागात संमेलनाची माहिती देणारे फलक सयाजीनगरीतील सुखावह वास्तव्याची जणू ग्वाहीच देत होते. शहरात मराठी भाषिकांची संख्याही ब-यापैकी आहे. प्रत्यक्ष संमेलनस्थळी आम्ही पोहोचलो तेव्हा सूर्यास्ताची रम्य वेळ होती. प्रचंड मोठ्या प्रांगणात व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला मोठे पडदे लावून सर्वांना कार्यक्रम पाहता यावा अशी व्यवस्था केली होती. स्वागताध्यक्षा शुभांगिनीराजे गायकवाड ह्यांचे छोटेखानी भाषण छान झाले. तोडक्यामोडक्या मराठीत त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला व काही जुन्या आठवणी सांगितल्या. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांची भाषणे नेहमीच्याच पठडीतली वाटली. साहित्य महामंडळाचे श्रीपाद...