वृक्षवल्ली त्यांना सोयरी...
मी पाहिलेला झाडावर प्रेम करणारा माणूस बालपणीच्या अनेक रम्य आठवणींपैकी मनात घर करून राहिलेली आठवण म्हणजे माझी शाळा आणि आमचे आवडते लोकरे गुरुजी. लोकरे गुरुजी आमच्या शाळेतले चित्रकला शिक्षक. पण कोणताही विषय सोपा करून शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. अतिशय संवेदनशील मनाचे लोकरे गुरुजी निसर्गावर खूप प्रेम करीत. झाडे,पाने, फुले हा तर त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. वृक्षराजीवर गुरुजींचे अतोनात प्रेम. झाडे म्हणजे सरांचा प्राणच जणू ! शाळेच्या प्रशस्त आवारातही त्यांनी मैदानाच्या कडेकडेने भरपूर झाडे लावली होती. रोज पहाटे लवकर उठून वेळेच्या पंधरा वीस मिनिटे अगोदर ते शाळेत हजर होत. झाडांना पाणी घालून मनोभावे नमस्कार करीत. आम्हा विद्यार्थ्यांनाही ते झाडांचं महत्त्व समजावून सांगत. आमच्याकडूनही ते छोटी रोपटी लावून घेत. मातीत बिया रुजवून घेत. बी मधून हळूहळू डोकं वर काढणारं रोपटं आम्हाला दाखवताना गुरुजी इतकं भरभरून बोलत की जणू काही त्यांचं बाळच ते ! त्या चिमुकल्या रोपट्याल...