वारी पंढरीची
*स्वातीचे शब्दमोती* *वारी पंढरीची* विठूराया संसाराचे मोहपाश सोडव वारी पंढरीची मला एकदा तू घडव काय वर्णावा मी देवा वारीचा तो थाट गजरात रंगते रे पंढरीची वाट वाटेमधले अडथळे वाटेवरच अडव वारी पंढरीची मला एकदा तू घडव कधीतरी सोडू दे ना मायेचे हे पाश होऊ दे ना वारकरी नको संसाराची आस वाट करूनी सुकर घाट सुखरूप चढव वारी पंढरीची मला एकदा तू घडव पाहू दे रिंगण हरपून देहभान टाळ चिपळ्यांच्या सवे यावी भजनाची तान होई चरणी मी लीन मला पापातून सोडव वारी पंढरीची मला एकदा तू घडव नाही संसारी मी देवा तुला कधी आठविले शुद्ध भावाने अंतरी नाही तुला साठविले आता शरण तुला मी मला घडव वा बिघडव वारी पंढरीची मला एकदा तू घडव ©️ सौ.स्वाती शृंगारपुरे भ्रमणध्वनी ८६९२८९३९८४