Posts

Showing posts from March, 2024

स्पर्श

 *स्वातीचे शब्दमोती*                          *स्पर्श* स्पर्श असावा मृदु,मुलायम        आश्वासकता झरे तयातून थंड बोच-या वा-यामध्ये        सुखवून जावे थोडेसे उन  स्पर्श असावा असा निरागस        जणू चिमुकले बाळ गोजिरे  कुशीत घेता आई त्याला        ह्रदयामधुनी अमृत पाझरे  स्पर्श असावा सुरेल सुस्वर        श्रीरंगाची जणू वेणू  अधरामधुनी संगीत झरता        स्वर्गसुख की त्यास म्हणू  स्पर्श असावा पावन ऐसा       उद्धरू दे भाविक भक्त  श्रीरामाच्या पदस्पर्शाने       जशी अहिल्या झाली मुक्त  विविध रुपे ही स्पर्शाची        जीवन सुखकर करतात विरून गेले स्पर्श तरीही       रम्य स्मृती त्या उरतात  - ©️ स्वाती शृंगारपुरे २८/०३/२०२४ 📞85913 25204

चिऊताईची कविता

 *चिऊताईची कविता* गोडगोजिरी अशी सानुली हवीहवीशी असते चिमणी पहाटवेळी चिवचिव करते फांदीवरती बसते चिमणी चिऊकाऊचा घास कालवून बाळ गोजिरे खाई मम्मम खाता खाता खुदकन हसते दारी पाहता छोटी चिमणी आई बसुनी ओसरीवरी निवडून घेई धान्ये सारी हळूच पाहुनी इकडेतिकडे धान्य टिपण्या येते चिमणी शेतक-याची प्रिय सखी ही साथ देई त्या शेतीकामी  फस्त करुनी अळ्या, किडेही शेतक-यांना सुखवी चिमणी येतो पाऊस वादळवारा, वाहून नेतो तिचा निवारा घरट्यासाठी जमवून काड्या पुन्हा घरकुल बांधे चिमणी क्रूर परि ही मानवजाती तिला कश्याची फिकीर नसे  जंगल तोडून घरे बनविती भिऊनी त्यांना पळते चिमणी ऐक मानवा धडा शीक हा वाचविण्यासाठी तिजला कत्तल केली  वृक्षांची तर सांग कशी मग उरेल चिमणी ? म्हणूनच ऐका महत्व जाणा इवल्याश्या त्या चिऊताईचे जगास सांगा ठणकावुनी हवीच चिमणी हवीच चिमणी !