आदरांजली - सुधा नरवणे
*स्वातीचे शब्दमोती* *आदरांजली* "आकाशवाणी पुणे. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे!" मंडळी , कोणाकोणाला आठवतोय हा स्वर ?? वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माझ्यासारख्या अनेकांना नक्कीच आठवत असेल. साधारण 70-80 चं दशक. दूरदर्शन चा सोनेरी विळखा अद्याप पसरला नव्हता. पण रेडीओ मात्र त्याकाळात घराघरात विराजमान असे. सिनेमा वगैरे पाहण्याची चैन परवडण्यासारखी नव्हती. रेडीओ हे एकमेव मनोरंजनाचं साधन ! सकाळची सुरुवातच मुळी आकाशवाणीवरच्या सुमधूर प्रभातगीतांनी व्हायची. सकाळची रम्य वेळ , बच्चेकंपनीची शाळेला निघायची घाई , बाबांची कार्यालयात जाण्याची तयारी , सर्वांचे डबे तयार करण्याची आई आणि आजीची लगबग.... सर्वच आवरत आलेलं असे आणि अशा वेळेलाच हा चीरपरिचित स्वर कानी यायचा ! सुधाताईंचा सुमधूर श्रवणीय स्वर कानी येताच घरातलं वातावरण अचानक बदलून जात असे. निवांत बसलेले आजोबा कान टवकारून बातम्या ऐक...