आठवणीतल्या गोष्टी
आठवणीतल्या गोष्टी नुकताच एका परीसंवादात भाग घेण्याचा योग आला . मुलांवर कसे उत्तम संस्कार होतील आणि त्यात बालकथांचा सहभाग किती हा ह्या परीसंवादाचा विषय होता. त्यानिमित्ताने बालपणी ऐकलेल्या व वाचलेल्या अनेक रम्य कथा स्मृतीपटलावर आल्या. अगदी न कळत्या वयात टोपीविक्या आणि माकडांची गोष्ट बाईंच्या तोंडून ऐकताना खूप मजा वाटत असे. बाई अशा गोष्टींवर छान नाटुकलीही बसवत असत. त्याच वयात वाचलेला लाकूडतोड्या त्या अजाणत्या वयातही प्रामाणिकपणाचे धडे देऊन गेला. चल रे भोपळ्या म्हणत भोपळ्याला टुणूक टुणूक चालवणारी ती चाणाक्ष म्हातारी आणि तीचा तो गोलमटोल भोपळा !! आजही पुस्तकातलं ते चित्र जसंच्या तसं डोळ्यापुढे तरळतंय् ! लहानपणी आजी आम्हाला शूर शिवाजीच्या गोष्टी सांगत असे. शिवाजीच्या गोष्टी ऐकून अंगात जणू वीरश्रीच संचारायची आणि मग आमचे लुटूपुटूचे तलवारबाजीचे खेळ रंगत. घरातल्या जुन्या वह्यांचे पुठ्ठे काढून त्यांच्या तलवारी वाड्यातलाच एखादा दादा बनवून देई ; आणि मग त्याच तलवारी हाती घेऊन आमचे गनिमी कावे रंगत . ...