Posts

Showing posts from November, 2017

बालभारती अभ्यासलेल्या प्रत्येकासाठी

Image
*स्वातीचे शब्दमोती* *बालभारती अभ्यासलेल्या प्रत्येकासाठी....* वर्तमानपत्र उघडलं तर त्यात बातमी दिसली. बालभारती पन्नास वर्षांची झाली म्हणे!  सोबत बालभारतीच्या मुखपृष्ठावरचा तो दोन मुलांचा गोजिरवाणा फोटो ,  चित्रकाराने अचूक रेखाटलेली त्यांच्या बोलक्या डोळ्यातली बालभारती वाचण्याची ती उत्सुकता ,  आणि ती गोल वळणदार अक्षरे,  "बालभारती " !     तो फोटो पाहून मी भूतकाळात कधी शिरले , माझं मलाच समजलं नाही. मनःपटलावर तरळली ती आठवणीतली शाळा आणि शाळेतल्या अभ्यासात सर्वांत जास्त आवडणारं ते बालभारती पुस्तक ! जून महिन्यात शाळा उघडल्यावर सर्वात प्रथम हवंसं वाटायचं ते बालभारती .     बालभारतीच्या मुखपृष्ठावरची ती निरागस मुले जणू आम्हीच होतो की ! अजूनही आठवतो तो नव्याको-या पुस्तकांचा श्वासात साठवलेला गंध आणि पुस्तकाला कव्हर घातल्यानंतरही हळूच कव्हर थोडं सरकवून पहावीशी वाटणारी ती गोडुली मुले !     बालभारती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा सांगाती , सोबती , सखा . हवंहवंसं वाटायचं त्यातलं प्रत्येक पान .  मायमराठीची खरी ओळख बालभारतीनेच करून दिली. त्या...

मुंबई कोकण सागरी प्रवास

*स्वातीचे शब्दमोती* *मुंबई-कोकण सागरी प्रवास*      लहानपणी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्ही कोकणात आमच्या आजोळी जात असू. "मामाच्या गावाला" जाण्यातला आनंद अवर्णनीय होता. आत्तासारखे रेल्वेचे जाळे त्याकाळात कोकणात पसरले नव्हते. त्यामुळे पाणी कापत जाणारी बोट किंवा लाल धुरळा उडवित जाणारी एस.टी. एवढीच काय ती प्रवासाची साधने !      सुट्टी जवळ येताच आईची लगबग सुरू होई. ठेवणीतले कपडे , घरगुती कपडे ह्यांची वर्गवारी करून ते जुन्याच पण घासूनपुसून लख्ख केलेल्या पत्र्याच्या ट्रंकेत भरले जात. आजीसाठी लुगडे , मामीसाठी खण , बाळासाठी झबल्या-टोप-याची खरेदी होई.      प्रत्यक्ष प्रवासाच्या दिवशी तर आम्हा मुलांचा उत्साह गगनात मावत नसे. परीक्षा आटोपलेली असे आणि शाळेची सुट्टी सुरू होई.      अगदी सुरुवातीच्या काळात आम्ही बोटीने प्रवास करत असू. रात्रीच्या जेवणाचा डबा सोबत घेऊन आमच्या स्वा-या  संध्याकाळीच भाऊच्या धक्क्यावर डेरेदाखल होत आणि फेसाळणा-या समुद्राच्या लाटा मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून आमच्या उत्साहात भर घालीत. लहानपणाप...

पु.ल.

मंडळी ,      अखिल महाराष्ट्रालाच नव्हे,तर जगभरातील मराठी वाचकप्रेमींना वेड लावणा-या पु.लं.ची आज जयंती.      मला आठवतात कुमारवयातून तरुणवयात पदार्पण करत असतानाचे माझे मोरपंखी दिवस. किशोरवयात असताना लागलेली वाचनाची गोडी कुमारवयात फुलू लागली आणि तरुण वयात तर वाचनाचं अक्षरशः वेड लागलं. "बालभारती" , "कुमारभारती" आणि त्यापाठोपाठ डेरेदाखल झालेल्या "युवकभारती"ने करून दिलेली नावाजलेल्या साहित्यिकांची ओळख मनात रुंजी घालत असे आणि त्यांचं साहित्य वाचण्याची ओढ लागे.      अशा  उमलत्या वयातच हाती लागली पु.लं.ची पुस्तकं आणि मग काय ! व्यक्ती आणि वल्ली ,  बटाट्याची चाळ , पूर्वरंग , अपूर्वाई , खोगिरभरती....  एक ना दोन ! अक्षरशः फडशा पाडला त्यांच्या पुस्तकांचा !      व्यक्ती आणि वल्लीमधल्या वल्लीमधल्या वल्ली आपल्याच अवतीभवती वावरणा-या वाटतील इतक्या पु.लं.नी जीवंत केल्या. पु.लं.ची बटाट्याची चाळ जणू माझीच चाळ आणि अपूर्वाईसारखी प्रवासवर्णनं त्यांच्यासोबत मलाही देशविदेशाची सफर घडवून आणित. दूरदर्शन ने ह्याच काळात हातपाय पसरायला सुर...

ब्लाॅगर

नमस्कार मंडळी...       अखेर अस्मादिक ब्लाॅगर झाले ! ब्लाॅग तयार झाला एकदाचा ! स्वतःचा ब्लाॅग असावा हे खूप दिवस उराशी बाळगलेलं स्वप्न साकार झालं ! सद्गुरू साईबाबांच्या आराधनेने सुरुवात करून "स्वातीचे शब्दमोती" ब्लाॅगवर झळकायला सुसज्ज जाहले !       आता गुंफल्या जातील ह्या शब्दमोत्यांच्या सुरेख माळा..... खास तुमची वाचनाची आणि माझी लेखनाची भूक भागविण्यासाठी ! चला तर मग... होऊया आपण 'नेट'करी ; आणि करूया "शब्दमोती" ब्लाॅगची वारी !       उद्यापासून जमेल तसं आणि जमेल तेव्हा लिहीत जाईन. अर्थात तुम्हा सर्व हितचिंतकांच्या प्रोत्साहनामुळेच मला हे शक्य होतंय् ! तुमच्या मित्रमंडळींनाही ह्या ब्लाॅगची माहिती द्या आणि त्यांनाही ह्या वाचनयात्रेत सहभागी करून घ्या .       सर्वांनी जरूर वाचा आणि अभिप्राय द्या . तुमचा अभिप्राय माझ्यासाठी लाखमोलाचा आहे.       धन्यवाद !

साई

साई           मज होतसे चहूकडे तुझाच भास साई मनात माझ्या तूच तू वससी माझ्या देही सतेज प्रसन्न मूर्ती विराजे मंदिरात तेथून भक्तगणांस कृपादृष्टी तू पाही शिरडीत राहूनी तू दाविले चमत्कार लीला तुझ्या अनंत उपमाच त्यास नाही भेद तुझ्या ठायी नसे कुणी हिंदू कुणी यवन पावन तुझ्या निवासाने जाहली द्वारकामाई बैसुनी निंबवृक्षातळी भक्तांस बोध केला पवित्र गुरुस्थान ते भक्तांस मान्य होई दर्शनासी येती रोज असंख्य भक्तगण मैलोन् मैल अंतर ते तुडवितात पायी श्रद्धा अन् सबुरी हे मंत्र दिले जगाला तूच तारणहार तू बाप तूची आई सदैव मुखाने मी साईनाम घेते लेखणीतूनही माझ्या झरते साईरूप शाई उरून राहसी तू शब्दांत माझ्या निरंत कविताच माझी मग बनतोस तूच साई !