Posts

Showing posts from February, 2023

संत गजानन महाराज

         *संत गजानन महाराज*          ( छंद -अभंग  चरण -४ ) गजानन स्वामी |  तुम्ही माझे गुरु |  वाटे कल्पतरू |  मजलागी  ||१|| तुमचे चरण |  हेचि गोदास्नान | होई मी पावन |  वंदुनी त्यां ||२|| तुझ्या द्वारी येती | दर्शनासी भक्त | त्यांचे मनोरथ | पुरवी तू ||३|| शेगावी राहुनी | केले चमत्कार | झाले साक्षात्कार | भक्तगणा ||४|| लाभो मज देवा | तुझा सहवास | तूच माझा ध्यास | रात्रंदिन ||५|| तुझी जी समाधी | माझी ती पंढरी |  घडो मज वारी | शेगावीची ||६|| माझ्या हाती नित्य | घडो तुझी सेवा | हेचि दान देवा | द्यावे मज ||७|| सदा तुझे नाम | असो माझ्या मुखी |  ठेव मज सुखी |  "स्वाती" म्हणे  ||८|| ©️ स्वाती शृंगारपुरे दासनवमी १५/०२/२०२३

गुलाबी स्वप्न

                *गुलाबी स्वप्न* ऐक सखे गं मनीचे माझ्या गुपित सांगते एक तुला भल्या पहाटे रोज पडतसे गोडगुलाबी स्वप्न मला स्वप्नामध्ये येतो माझ्या कुणी देखणा राजकुमार  भासे जणू की साजण माझा घोड्यावरती असतो स्वार प्रिये ऐक ना म्हणे मला तो तुजवर मी जाहलो फिदा  हाय तुझे हे रुप साजिरे हाय तुझ्या दिलफेक अदा डोळे सुंदर पाणीदार अन् नाक जणू की चाफेकळी  गोब-या गुलाबी गालावरची खुणविते मला ती गोड खळी  भुरूभुरू उडती वा-यावरती खट्याळ कुरळ्या केशबटा  ओठामधले मंद स्मित अन् लज्जेच्या रंगीत छटा तुझ्या रुपाने ओढ लावली घायाळ झालो मी सजणी  सांग प्रिये तू आज मला,  होशील का माझी राणी?  स्वप्न पाहता असे सखे गं मनोमनी मी मोहरते  ऐकुनी त्याची स्तुतीसुमने गालावर लाली फुलते  प्रेम प्रेम म्हणतात तेच हे मजला ऐसे वाटतसे  ह्रदयमंदिरी माझ्या सदोदित एक तोच अन् तोच वसे  जेव्हापासून असे गुलाबी स्वप्न सखी मी पाहीले  हरवुनी गेले भान हरपून मी न माझी राहीले  मी न माझी राहीले!   ©️ स्वाती शृंगारपुरे  दि. 0...

हळदी कुंकवाचा करंडा

*हळदी कुंकवाचा करंडा* ( मुक्तछंद रचना )  सौभाग्याचं लेणं असतं म्हणे हळदीकुंकू करंडा भाग्यवंतच म्हणायचा  ह्या सौभाग्यलेण्याला स्वतःत सामावणारा इवलासा पण आकर्षक  प्रत्येक विवाहितेचा अमूल्य ठेवा एका खणात लालेलाल कुंकू अन्  दुस-यात पिवळीधम्मक हळद फार जपते स्त्री त्याला जरा जरी लवंडला ना,  तर अपशकुन होतो म्हणतात म्हणून जीवापाड जपायचा त्याला जशी सर्वांची मनं जपत,   ती विवाहिता करत असते जीवनाची यशस्वी (?) वाटचाल... आहुती देते ती तिच्या स्वप्नांची... त्या करंड्यातल्या कुंकवात  अन्  मनावर झालेल्या जखमांवर भरते हळद अन् बोटं बुडवत त्या करंड्यात  लावून घेते हळद कुंकू स्वतःच्या कपाळावर अन् सुखस्वप्ने रंगवते सुखी संसाराची  मग सुखी वैवाहिक जीवनासाठी कवेत घेतो तिला तिचा हळदीकुंकवाचा करंडा!  ©️स्वाती शृंगारपुरे १२ ऑक्टोबर, २०२२