घरात हसरे तारे
*घरात हसरे तारे* रात्रीचा आठचा सुमार. सलग तीन दिवसांची हाॅस्पिटलमधली ड्युटी संपवून गीता घरी आली. सरकारी इस्पितळातील कोरोना वाॅर्डमध्ये ती मुख्य परिचारिका म्हणून कर्तव्य बजावत होती. तिच्या मृदू बोलण्याने रुग्णांना धीर येत असे. रुग्णांच्या मनात ती आशावाद जागृत ठेवी. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांचे पथ्यपाणी, औषधे सारं काही ती न कंटाळता करत असे. सलग तीन दिवस जराही विश्रांती न घेता ड्युटी करून आज ती घरी परतली होती. लॅच की नं दरवाजा उघडून गीता घरात शिरली अन् काय आश्चर्य! दरवाज्याचा आवाज ऐकून बेडरूम मधून बाहेर आलेली सायली धावत पुढे येऊन तिला बिलगली. क्षणभर आपण अनुभवतोय ते स्वप्न की सत्य हेच गीताला उमगेना. "आय लव्ह यू मम्मा" ह्या सायलीच्या शब्दांनी गीता भानावर आली व काहीच न समजल्यामुळे गोंधळून सायलीकडे पहात ती तशीच उभी राहिली. आत्तापर्यंत तिचा तिरस्कार करणारी तिची सावत्र मुलगी आज अचानक कशी बदलली हेच तिला कळेना. पण कौतुकाने हसत बेडरूममधून बाहेर आलेल्या अविनाश ने सर्व खुलासा केला अन् गीताच्या आनंदाला पारावार उरला नाही. झाल...