Posts

Showing posts from June, 2021

ज्ञान दे मज बुद्धीसागरा

  *ज्ञान दे मज बुद्धी सागरा* दूर करुनी अज्ञान माझे ज्ञानरुपी प्रकाश दे ज्ञान दे मज बुद्धीसागरा तव भक्तीची आस दे  ||१|| नको वासना विषयाची मज भोगविलासी वृत्ती नको कळावया गुरुची महती उपासनेचा ध्यास दे  ||२|| ज्ञान असे दे दयाघना इतरांची मज पीडा कळो पीडा हराया दु:खी जनांची ह्रदयात तुझा अधिवास दे ||३|| ज्ञान दे मज बुद्धीसागरा पर्यावरणा जपण्याचे हिरवाईने बहरून सृष्टी चिऊ काऊ ला निवास दे ||४|| शब्दांमध्ये अर्थ असावा काव्य फुलावे त्यांमधुनी काव्यानंदा लुटणा-या त्या रसिकांचा सहवास दे!  ||५||

वटपौर्णिमा - परंपरेचा भार की विज्ञानाचा आधार

नमस्कार      स्मृतीगंध समूहातर्फे आयोजित 'प्रज्ञा' उपक्रमासाठी मी सौ.स्वाती शृंगारपुरे वास्तव्य बोरीवली, मुंबई येथून माझे विचारसुमन पाठवत आहे.              *वटपौर्णिमा - परंपरेचा भार की विज्ञानाचा आधार*      हिंदू धर्माला फार मोठी सणांची परंपरा लाभली आहे. बहुतांश सण साजरे करण्यामागे पुराणकाळापासून चालत आलेल्या काही कथा आहेत, ज्या आजही प्रथा म्हणून पाळल्या जात आहेत. ह्यापैकीच एक म्हणजे वटपौर्णिमा.       जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रीया वड पूजतात कारण सावित्रीने वडाची पूजा करून सत्यवानाचे प्राण वाचवले.       परंतु, आपण आजच्या युगातील स्त्रीया आहोत. आपल्या मनात आपले विचार सुस्पष्ट आहेत. सावित्रीने केलं म्हणून आपण ते करायचं हा विचार आपल्यापैकी प्रत्येकीला पटेलच असे नाही.       पण सख्यांनो, वडाच्या झाडाची महती तर आपण जाणतोच ना? वटवृक्ष भरपूर प्राणवायू सोडत असतो. आजच्या कोरोनाकाळात तर प्राणवायूचं महत्व आपल्याला चांगलंच उमगलंय. कोणताही मोबदला न घेता वटवृक्ष सातत...

विनोदी कविता - एकदा काय झालं

  सकाळ झाली, उजाडले ना लगबग सुरु झाली  'हे'गेले कामावर आणि मुले शाळेत गेली मस्त निवान्त मग मी आरामात कामं होते करत विळी ओढली जवळ, नि बसले भाजी चिरत  ओठातल्या ओठात हळूच गुणगुणत होते गाणी इतक्यात खुट्ट झाले दिवाणखान्यात, आले वाटतं कुणी दरवाजा होता बंद आणि बेलही नव्हती वाजली  चोरच घुसला असणार, धडधड माझी वाढली जाम घाबरले मी, अन्  उभी राहीले उठून डोळे फाडून पाहू लागले फडताळाच्या पाठून काळाकभिन्न वर्ण त्याचा डोळे लालभडक  ऐटीत चालत येत घुसला स्वैपाकघरात तडक आता मात्र माझे पाय लागले कापायला इकडे तिकडे पहात मी जागा शोधू लागले लपायला मनातल्या मनात करू लागले देवाचा धावा  धावत या हो बाप्पा मला ह्याच्या पासून वाचवा इतक्यात त्याची नि माझी नजरानजर झाली तो ही घाबरला मला नि लपला टेबलाखाली  मी आहे घरात हे त्यालाही नव्हतं माहित  मला समोर पाहून त्याची झाली पंचाईत  हाच मोका साधून मी हातात घेतली काठी सारं बळ एकवटून लागले त्याच्या पाठी आता आमची दोघांची शर्यत झाली सुरु  मी धावे मागे नि तो लागे जोरात पळू  तो पुढे  मी मागे चालला बराच वेळ खेळ माझी क...

विनोदी कविता - हीरो

  काल बरं का रात्री गंमत झाली किती नेहमी सारखीच माझी झाली फजिती  झोपायला मी जाणार इतक्यात खणखणला फोन  लावला चटकन् कानाला अन् बोलले "हॅलो कोण? " आवाज आला समोरुन मी धर्मेंद्र सिनेस्टार  तुझ्या सोबत फिरायला जाण्याचा आहे माझा विचार  हेमाचं आणि माझं फारसं आता पटेना  पहिल्या पत्नी बद्दल तर बिलकुल प्रेम वाटेना  आहेस तू समजूतदार अन् खूप खूप हुशार दिसतेसही छान अन् कविता तुझ्या सुरेख फार  ऐकुन ती स्तुतीसुमनं मनात लाडू लागले फुटायला  चटकन् वेळ ठरवून मी ही तयार त्याला भेटायला  काॅलेजात असताना तो होता माझ्या मनात  सिनेमे त्याचे पहायचा मला जडला होता नाद चटकन् तयार झाले मी ठेवणीतली साडी नेसून  इतक्यात आला धर्मेद्र आलिशान गाडीत बसून  मला बोलला चल आधी मस्त फिरुन येऊ फाईव स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊ  गेलो मग गेट वे ला फिरलो तेथे खूप  गप्पागोष्टी झाल्या मग लागली सडकून भूक गेलो मग ताज मध्ये,  त्याने मागवली स्पेशल हंडी मला मात्र खावीशी वाटली साधीशीच खिचडी  बोलण्यात त्याच्या सतत पैशाचीच भाषा बढाया होत्या वाढत सतत सिगरेट ओढत...

तुझ्याविना

कविता शीर्षक- तुझ्याविना  (परदेशी असलेल्या मुलाच्या आईची व्यथा ओळी-16) लेकरा रे तुझ्याविना घर वाटे सुनेसुने अश्रू आईच्या नयनी बाळा तुझ्या विरहाने परदेशी राहूनी तू झाला मोठा अधिकारी हात जोडूनी उभी सारी सुखे तुझ्या दारी प्रेमळ ती पत्नी आणि गोजिरवाणी मुले परदेशात सुखाने तुझा संसारही फुले इथे घरात आईचे मात्र मन हे उदास नातवंडांच्या भेटीची मज लागली रे आस नको मला बाळा काही आता उतारवयात सापडेन आता केव्हाही मी यमाच्या फे-यात रोज दारात येऊन तुझी पाहते मी वाट कधी होईल रे घरी तुझ्या स्वागताचा थाट तुझ्याविना ह्या घराचा उंबराही भासे सुना गेले सुकून अंगण नाही बहर फुलांना कधी उजळेल सांग पुन्हा घराचा उंबरा तुझ्याविना ह्या घराचा रिता कोपरा कोपरा ! 

पावसाळ्यातील एक आठवण

 पावसाळ्यातील एक आठवण      ही आठवण आहे साधारण १६ वर्षापूर्वीची.      माझा मुलगा स्वयम तेव्हा नुकताच नर्सरी शाळेत जाऊ लागला होता. साधारण अडीच वर्षांचं वय. जून महिन्याचा शेवटचा आठवडा असावा, किंवा जुलैचा पहिला आठवडा. सकाळपासूनच वीजा चमकत होत्या, थोडा थोडा पाऊस सुरू झालेला होता. स्वयमची शाळा अकरा ते दोन ह्यावेळात भरत असे. साडे दहा वाजता सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झालेला असतानाही मी त्याला शाळेत नेऊन सोडले कारण एखादा दिवस घरी राहिला की दुस-या दिवशी शाळेत जाताना तो खूप रडून गोंधळ घालत असे. आणि शाळाही काही फार लांब नव्हती त्यामुळे वाढलाच पाऊस, तर घरी घेऊन येऊ पटकन, असा विचार मी केला.       स्वयम् ला शाळेत सोडून मी घरी आले. पटापट घरातली कामे उरकू लागले. बाहेर सोसाट्याचा वारा सुरूच होता. पावसाचा जोरही वाढत होता. मी चटकन् कुकर लावला. चपाती भाजी तयारच होती. सकाळच्या शाळेला गेलेली माझी मुलगी संजुक्ता ( इयत्ता-चौथी ) एक वाजता चिंब भिजून शाळेतून घरी आली. तिची शाळा घरापासून अगदी दोन इमारती सोडून इतकी जवळ असल्याने ती एकटीच येत असे. तिचं डोकं ...

पर्यावरण

               *पर्यावरण* सावध व्हा रे चराचरांनो,ऐका भविष्यातल्या हाका पर्यावरण हे कवच पृथ्वीचे कधीच भेदू नका डोंगर अडविती मेघांना अन् बरसे पाऊसपाणी  हिरवाईने डोले मग ही सुकुमार सृष्टीराणी  परी डोंगर फोडुनी त्यातुनी रस्ता बनवी मानव  काय म्हणावे स्वार्थाला ह्या, मानव की दानव?  पर्वतराजी उपकारक तीस सुरूंग लावू नका  पर्यावरण हे कवच पृथ्वीचे कधीच भेदू नका झाडे देती छाया अन् बांधिती घरटे पक्षी फुलाफळांनी निसर्ग रेखी जणू झाडावरती नक्षी पुरविती झाडे प्राणवायूही तुम्हांस जगण्याला  हाय! तुम्ही रे तोडुनी झाडे घात स्वतः चा केला नकाच तोडू झाडे वेली, द्या उमलू त्यावर कलिका  पर्यावरण हे कवच पृथ्वीचे कधीच भेदू नका ऐका श्रोते तुम्हा सांगते मार्ग एक सोपा रक्षण करण्या पृथ्वीचे पर्यावरण मूलमंत्र जपा  स्वतः च स्वतः वर ठेवा ताबा राखा आरोग्य  जीवन जगण्या आनंदाने हवे पर्यावरण योग्य  सृष्टीच्या त्या सौंदर्याला लावू नका रे धक्का  पर्यावरण हे कवच पृथ्वीचे कधीच भेदू नका 

पाऊस-मनात साठलेला

           *पाऊस-मनात साठलेला* बालपणीचा पाऊस मला हवाहवासा वाटायचा चिमुकल्या माझ्या छत्रीवर थेंबाथेंबाने साठायचा हळूच छत्री भिरकावून मी नाचे साचल्या पाण्यात आणि पाऊस बरसे माझ्या ओठांवरल्या गाण्यात तारुण्यात पाऊस मात्र अंग अंग भिजवायचा भिजवतानाच डोळ्यांत माझ्या रंगीत स्वप्न सजवायचा एका छत्रीत दोघे आम्ही पाऊस खट्याळ तेव्हा वाटायचा धुंवाधार बरसून माझ्या अंगोपांगी दाटायचा प्रौढत्वात आता पाऊस जबाबदा-यांनी वाकलाय खूप बरसायचं असूनसुद्धा  बंधनांमध्ये झाकलाय सांजवेळी पण जीवनाच्या सुखावणारा असेल वारा इंद्रधनूचे रंग मनी अन् संतृप्तीच्या रिमझिमधारा !