सुषमा स्वराज
*स्वातीचे शब्दमोती* ०७/०८/२०१९ *शब्दसुमनांजली* "ती" गेली. इहलोकीची यात्रा संपवून "ती" अनंताच्या प्रवासाला निघून गेली. तिचा पृथ्वी वरील कार्यकाल खूपच लवकर संपला. 'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला' हेच खरं ! "ती!" सुषमा स्वराज! आम्हा स्त्रीयांचा आदर्श, आमचा अभिमान,आमचा सन्मान ! माझ्या भारत देशाची सुकन्या सुषमा स्वराज ! त्यांचा जन्म कुठला, शिक्षण किती, आई-वडील कोण, पती कोण, मुलं किती हे आम्हाला नेहमीच सर्वप्रथम पडणारे प्रश्न सुषमाजींच्या बाबतीत आमच्या स्त्रीमनाला शिवतही नाहीत. तर त्यांचं नाव उच्चारलं की आमच्या नजरेसमोर येतं ते बुद्धिमत्तेच्या अफाट तेजाने उजळलेलं त्यांचं सोज्वळ व्यक्तिमत्व, कपाळावरचं ठसठशीत कुंकू आणि साध्या पाचवारी साडीतूनही त्यांचं वेगळेपण जाणवावं असं दिमाखदार जॅकेट ! आम्हाला जाणवते स्त्रीत्वाचा बाऊ न करता स्वत:ला सिद्ध करणारी त्यांची धडाडी, आम्हाला खुणावतं आत्मविश्वासाने ओथंबलेलं,कानात जीव गोळा करून ऐकत राहावं असं त्यांचं प्रत्येक भाषण.... मग ते सामान्य जनतेला उद्देशून असो,संसदेतलं असो ...