विनोदी कविता - एकदा काय झालं

 

सकाळ झाली, उजाडले ना लगबग सुरु झाली 
'हे'गेले कामावर आणि मुले शाळेत गेली

मस्त निवान्त मग मी आरामात कामं होते करत
विळी ओढली जवळ, नि बसले भाजी चिरत 

ओठातल्या ओठात हळूच गुणगुणत होते गाणी
इतक्यात खुट्ट झाले दिवाणखान्यात, आले वाटतं कुणी

दरवाजा होता बंद आणि बेलही नव्हती वाजली 
चोरच घुसला असणार, धडधड माझी वाढली

जाम घाबरले मी, अन्  उभी राहीले उठून
डोळे फाडून पाहू लागले फडताळाच्या पाठून

काळाकभिन्न वर्ण त्याचा डोळे लालभडक 
ऐटीत चालत येत घुसला स्वैपाकघरात तडक

आता मात्र माझे पाय लागले कापायला
इकडे तिकडे पहात मी जागा शोधू लागले लपायला

मनातल्या मनात करू लागले देवाचा धावा 
धावत या हो बाप्पा मला ह्याच्या पासून वाचवा

इतक्यात त्याची नि माझी नजरानजर झाली
तो ही घाबरला मला नि लपला टेबलाखाली 

मी आहे घरात हे त्यालाही नव्हतं माहित 
मला समोर पाहून त्याची झाली पंचाईत 

हाच मोका साधून मी हातात घेतली काठी
सारं बळ एकवटून लागले त्याच्या पाठी

आता आमची दोघांची शर्यत झाली सुरु 
मी धावे मागे नि तो लागे जोरात पळू 

तो पुढे  मी मागे चालला बराच वेळ खेळ
माझी काठी नि त्यांचं डोकं ह्यांचा बसत नव्हता मेळ

इतक्यात मला घाबरून तो टेबलावरती चढला 
काठी सरसावून मग मी अचुक निशाणा साधला 

जोरात किंचाळत त्याने घेतली खिडकीकडे धाव
खिडकीबाहेर उडी मारून धूम ठोकली ना राव! 

खूश होऊन मग मी थोपटली माझीच पाठ
नव्हतीच माझ्या ड्रेसला, तरी काॅलर केली ताठ

गरमागरम चहा घेतला नि लागले पुन्हा कामा 
दुसरा तिसरा कुणी नाही तो होता उंदीरमामा! 
तो होता उंदीरमामा!  

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे