वटपौर्णिमा - परंपरेचा भार की विज्ञानाचा आधार
- Get link
- X
- Other Apps
नमस्कार
स्मृतीगंध समूहातर्फे आयोजित 'प्रज्ञा' उपक्रमासाठी मी सौ.स्वाती शृंगारपुरे वास्तव्य बोरीवली, मुंबई येथून माझे विचारसुमन पाठवत आहे.
*वटपौर्णिमा - परंपरेचा भार की विज्ञानाचा आधार*
हिंदू धर्माला फार मोठी सणांची परंपरा लाभली आहे. बहुतांश सण साजरे करण्यामागे पुराणकाळापासून चालत आलेल्या काही कथा आहेत, ज्या आजही प्रथा म्हणून पाळल्या जात आहेत. ह्यापैकीच एक म्हणजे वटपौर्णिमा.
जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रीया वड पूजतात कारण सावित्रीने वडाची पूजा करून सत्यवानाचे प्राण वाचवले.
परंतु, आपण आजच्या युगातील स्त्रीया आहोत. आपल्या मनात आपले विचार सुस्पष्ट आहेत. सावित्रीने केलं म्हणून आपण ते करायचं हा विचार आपल्यापैकी प्रत्येकीला पटेलच असे नाही.
पण सख्यांनो, वडाच्या झाडाची महती तर आपण जाणतोच ना? वटवृक्ष भरपूर प्राणवायू सोडत असतो. आजच्या कोरोनाकाळात तर प्राणवायूचं महत्व आपल्याला चांगलंच उमगलंय. कोणताही मोबदला न घेता वटवृक्ष सातत्याने प्राणवायूचा पुरवठा करत असतो. हो की नाही ? ह्यातूनच दिसतं ते आपल्या परंपरांच्या मुळाशी असलेलं विज्ञान. कदाचित ह्या वटवृक्षाखाली प्राणवायू मिळाल्यामुळेच सत्यवानाचे प्राण वाचलेले असू शकतात. नाही का ?
वटवृक्षाचे औषधी गुणधर्म ही काही कमी नाहीत. अनेक औषधांमध्ये वडाच्या वेगवेगळ्या भागांचा वापर केला जातो.
मैत्रिणींनो, कामाच्या धबडग्यामध्ये हळूच स्वैपाकघराच्या खिडकीवर बसून चिवचिव करणारी चिऊताई सुखावते की नाही आपल्याला? अश्या अनेक चिऊताई, किलबिलाट करणारे चिमुकले पक्षी ह्यांचं तर हा वटवृक्ष म्हणजे आश्रयस्थान! ह्याच झाडावर कित्येक पक्षी घरटी बांधतात. आणि ह्याच्याच तर पारंब्यांना लटकून आपण बालपणी सूरपारंब्या खेळलोय, निदान पारंब्यांना लटकून झूला झुलण्याची स्वप्न तरी बालपणी पाहिलीच आहेत. त्या पारंब्या जमिनीत रुजून पुन्हा त्यातून नवे वृक्ष तयार होतात.. पर्यावरणासाठी असे महाकाय वृक्ष किती आवश्यक आहेत, आपण जाणतोच!
मग काय हरकत आहे ह्या अक्षयवृक्षाची आपण पूजा केली तर ? सावित्रीची कथा आपल्यापैकी काहीजणींच्या आधुनिक विचारसरणीला पटत नसेल. काही हरकत नाही. पण वटवृक्षाचे फायदे तर आपल्याला सर्वांनाच कळतात ना ? मग करूया ना त्या जीवनदात्याची पूजा ! पूजा करणं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. कुणीही आपल्याला मदत करत असेल, तर त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहेच आहे.
तर मग मैत्रिणींनो, पुजूया वटवृक्ष दरवर्षी, निदान वर्षातून एकदा तरी... वटपौर्णिमेला... त्यानिमित्ताने छान छान नटुया... सुंदर साडी, सुंदर अलंकार... मस्त मस्त दिसुया... आणि ह्या वटवृक्षासमोर आदराने नतमस्तक होऊया... केवळ सावित्रीने त्याची पूजा केली म्हणून नव्हे, तर तो खरोखरच पूजनीय, वंदनीय आहे म्हणून !
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment