विनोदी कविता - हीरो

 

काल बरं का रात्री गंमत झाली किती
नेहमी सारखीच माझी झाली फजिती 

झोपायला मी जाणार इतक्यात खणखणला फोन 
लावला चटकन् कानाला अन् बोलले "हॅलो कोण? "

आवाज आला समोरुन मी धर्मेंद्र सिनेस्टार 
तुझ्या सोबत फिरायला जाण्याचा आहे माझा विचार 

हेमाचं आणि माझं फारसं आता पटेना 
पहिल्या पत्नी बद्दल तर बिलकुल प्रेम वाटेना 

आहेस तू समजूतदार अन् खूप खूप हुशार
दिसतेसही छान अन् कविता तुझ्या सुरेख फार 

ऐकुन ती स्तुतीसुमनं मनात लाडू लागले फुटायला 
चटकन् वेळ ठरवून मी ही तयार त्याला भेटायला 

काॅलेजात असताना तो होता माझ्या मनात 
सिनेमे त्याचे पहायचा मला जडला होता नाद

चटकन् तयार झाले मी ठेवणीतली साडी नेसून 
इतक्यात आला धर्मेद्र आलिशान गाडीत बसून 

मला बोलला चल आधी मस्त फिरुन येऊ
फाईव स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाऊ 

गेलो मग गेट वे ला फिरलो तेथे खूप 
गप्पागोष्टी झाल्या मग लागली सडकून भूक

गेलो मग ताज मध्ये,  त्याने मागवली स्पेशल हंडी
मला मात्र खावीशी वाटली साधीशीच खिचडी 

बोलण्यात त्याच्या सतत पैशाचीच भाषा बढाया होत्या वाढत
सतत सिगरेट ओढत होता धुराचे वलय काढत 

पाहून त्याचे बेगडी वागणे मला रडू कोसळले 
संपून गेली गंमत सारी मन माझे ढासळले 

इतक्यात माझ्या मोबाईल चा खणखणला गजर 
झोपले आहे गाढ मी ह्याचा मला पडलाच होता विसर 

डोळे उघडून पाहते तो शेजारी होता नवरा 
चेहरा माझा पाहून बिचारा झाला कावराबावरा 

जवळ ओढून मला म्हणाला काय झालं राणी? 
मी कधीच नाही पाहू शकत डोळ्यात तुझ्या पाणी 

प्रेमभरलं बोलणं त्याचं माझं काळीज लागलं चीरू 
हाच खरा माझा हीरो नको शोलेवाला वीरू 

ओळखून माझ्या मनातले भाव तो हसला हळूच खुशीत 
आनंदाने मी ही मग शिरले त्याच्या कुशीत!  

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं