पावसाळ्यातील एक आठवण

 पावसाळ्यातील एक आठवण


     ही आठवण आहे साधारण १६ वर्षापूर्वीची.

     माझा मुलगा स्वयम तेव्हा नुकताच नर्सरी शाळेत जाऊ लागला होता. साधारण अडीच वर्षांचं वय. जून महिन्याचा शेवटचा आठवडा असावा, किंवा जुलैचा पहिला आठवडा. सकाळपासूनच वीजा चमकत होत्या, थोडा थोडा पाऊस सुरू झालेला होता. स्वयमची शाळा अकरा ते दोन ह्यावेळात भरत असे. साडे दहा वाजता सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झालेला असतानाही मी त्याला शाळेत नेऊन सोडले कारण एखादा दिवस घरी राहिला की दुस-या दिवशी शाळेत जाताना तो खूप रडून गोंधळ घालत असे. आणि शाळाही काही फार लांब नव्हती त्यामुळे वाढलाच पाऊस, तर घरी घेऊन येऊ पटकन, असा विचार मी केला.

      स्वयम् ला शाळेत सोडून मी घरी आले. पटापट घरातली कामे उरकू लागले. बाहेर सोसाट्याचा वारा सुरूच होता. पावसाचा जोरही वाढत होता. मी चटकन् कुकर लावला. चपाती भाजी तयारच होती. सकाळच्या शाळेला गेलेली माझी मुलगी संजुक्ता ( इयत्ता-चौथी ) एक वाजता चिंब भिजून शाळेतून घरी आली. तिची शाळा घरापासून अगदी दोन इमारती सोडून इतकी जवळ असल्याने ती एकटीच येत असे. तिचं डोकं पुसून कोरडे कपडे तिला घालायला दिले व टेबलवर तिच्या जेवणाची तयारी केली. एव्हाना पावणे दोन वाजले होते. मी चटकन् चप्पल घालून हातात छत्री घेतली आणि स्वयमला शाळेतून आणण्यासाठी घराबाहेर पडले. 

       लिफ्ट चा दरवाजा उघडत असतानाच "धडाम धुम" असा मोठ्ठा आवाज कानावर पडला आणि अचानक आरडाओरडा ऐकू आला. मी तशीच खाली धावले आणि पाहते तर काय ! आमच्या गेटजवळ असलेले महाकाय झाड पडले होते. भर रस्त्यावर अजस्त्र झाड कोसळून पडल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. सुदैवाने झाडाखाली कोणी सापडले नव्हते; पण मला पुढे जाता येईना. दोन वाजले. मी तशीच वर आले आणि शाळेत फोन केला. इथे झाड पडल्याने मला यायला थोडासा उशीर होईल असे त्यांना कळवले. त्यांनीही हरकत नाही, तुमचा बाळ आमच्या कडे सुरक्षित आहे असे दिलासादायक उत्तर दिले. तरीही शाळा सुटली की धावत माझ्याकडे झेपावणारा, माझ्या कुशीत शिरणारा निरागस स्वयम माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता आणि माझे टेन्शन वाढत होते. झाड उचलायला आलेल्या फायर ब्रिगेड आणि पोलिसांना मी पुन्हा पुन्हा विनंती करत होते की थोडीशी जागा करा आणि मला माझ्या बाळापर्यन्त पोहोचू द्या. पण त्यांचाही नाइलाज होता. झाड बाजूला काढायला उशीर तर लागणारच होता. माझे डोळे वारंवार भरून येत होते. कधी एकदा स्वयमला बघतेय असं मला झालं होतं. 

     शेवटी बराच प्रयत्न करून झाड उचलण्यात अग्निशामक दलाचे जवान यशस्वी ठरले. एव्हाना साडे तीन वाजले होते. 

      रस्ता मोकळा झाल्याबरोबर सुसाट धावत मी पुढच्या पाच मिनिटात शाळेत पोहोचले. चिमुकल्या शाळेच्या चिमुकल्या गेटला घट्ट धरून स्वयम माझी वाट पहात उभाच होता. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. गोब-या गालावर डोळ्यातलं पाणी पडून चेहरा लालबुंद दिसत होता. सोबत आणखीही काही चिमुरडी मुलं आईची वाट पहात ओक्साबोक्शी रडताना दिसली. सर्वांना समजावताना टीचरचीही खूपच तारांबळ उडत होती. 

      मला पाहताच स्वयम माझ्याकडे आला आणि मला घट्ट बिलगला. मी ही चटकन त्याला उचलून घेऊन त्याचे पापे घेतले. टीचर चे पुन्हा पुन्हा आभार मानून आम्ही घरी आलो. 

      आज स्वयम अठरा वर्षांचा आहे. काॅलेजमध्ये शिकतो आहे. परंतु पावसाळ्यातला तो दिवस आम्ही आजही विसरलेलो नाही. पडलेल्या झाडाची जमिनीत खोलवर रुतलेली मुळं महानगरपालिकेने संपूर्ण काढून कुठेतरी जंगलात नेऊन लावली. त्या जागेवर आता एक पानाची गादी आली आहे. पण पावसाळ्यात वीजा चमकू लागल्या आणि सोसाट्याचा वारा सुटला, मुसळधार पाऊस सुरू झाला की आजही आमची नजर वारंवार त्या जागेकडे वळते. रस्त्यात पडलेलं ते झाड आणि त्यावेळची मनोवस्था आजही आम्हाला दोघांना भावूक करून जाते. 



Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं