कथा - आनंदाचे डोही
आनंदाचे डोही
सकाळची वेळ. दिवस नुकताच सुरू झाला होता. अश्या रम्य वेळी उगवतीच्या सूर्यकिरणांना सोबत घेऊनच ब्रिटीश एअरवेजचं एक प्रवासी विमान मुंबई विमानतळावर उतरलं अन् त्यातून विद्याधर खाली उतरला. दूरवरून प्रवास करून आल्यामुळे तो खूपच थकला होता. विमानतळाबाहेर येऊन त्यानं नाशिक ला जाण्यासाठी भाड्याची गाडी ठरवली. गाडीच्या डीकीत सामानाच्या सुटकेसेस चढवून त्यानं स्वत:ला मागच्या सीटवर अक्षरशः झोकून दिलं अन् नाशिकच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू झाला.
कधी एकदा घरी पोहोचतोय असं त्याला झालं होतं.त्यानं डोळे मिटून घेतले. पण बंद पापण्यांआडून त्याचा भूतकाळ डोकं वर काढू लागला. अनेक सल मनात सलत होते. डोळे वारंवार भरून येत होते. कटू आठवणींचा दाह कमी करण्यासाठी विद्याधरनं डोळे आणखीनच गच्च मिटून घेतले अन् त्याचा संपूर्ण जीवनपटच त्याच्या बंद डोळ्यांसमोर उलगडू लागला.
विद्याधरला त्याचं बालपण आठवू लागलं.आई,अण्णा,धाकटी बहीण सुरेखा आणि तो असं त्यांचं चौकोनी कुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिराच्या मागे एका वाड्यात रहात असत. अण्णा काळाराम मंदिरात पुजारी होते. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच. पण निगुतीनं संसार करत आई मुलांना काही कमी पडू देत नसे.
विद्याधर जात्याच हुशार. वर्गात पहिला क्रमांक त्याने कधीच सोडला नाही. कठीण परिस्थितीवर मात करत विद्याधर मिळवत असलेलं यश पाहून आई वडिलांना त्याचा खूप अभिमान वाटत असे. छोट्या सुरेखालाही दादाचं खूप कौतुक! विद्याधरची बहीण म्हणून मिरवण्यात तिला धन्यता वाटे अन् आपणही दादासारखंच अफाट मेहनतीनं अभ्यास करून यशाची शिखरं सर करायची अशी स्वप्न ती पहात असे.
शिक्षण पूर्ण होते न होते तोच विद्याधरला लंडनमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. विद्याधर लंडनला गेला.तिथेच रुळला. त्याने एका ब्रिटीश मुलीशी विवाहदेखील केला. ब्रिटनचे नागरिकत्व घेऊन मायदेशात परत येण्याचे सारे दोर त्याने स्वत:च्या हाताने कापून टाकले.
दरम्यान आई अण्णा त्याला भेटायला बोलवत असत. पुन्हा पुन्हा पत्र पाठवत असत. सुरुवातीला विद्याधर पत्रांना उत्तर पाठवत असे. पण हळूहळू विद्याधरकडून पत्रे येणे कमी कमी होत बंद झाले.
अशीच अनेक वर्षै सरली. दरम्यानच्या काळात अण्णांचा मृत्यू झाला. विद्याधरला कळवूनही विद्याधर आला नाही. आईला ह्या घटनेचा जबर मानसिक धक्का बसला व आईनेही अंथरूण धरले. शेजारीपाजारी जमेल तशी आईची सेवा करीत असत. बिचारी सदोदित विद्याधरच्या नावाचा जप करीत राहायची. पण विद्याधर येत नसे.
असाच काळ पुढे सरकत होता. विद्याधरची पन्नाशी उलटून गेली होती. अमाप पैसा त्याने कमावला होता. तरीही विद्याधरला आता ब-याच गोष्टी खटकू लागल्या होत्या. मुक्त ब्रिटीश संस्कृतीत वाढलेली पत्नी केव्हाच विद्याधरला सोडून निघून गेली होती.तिने दुसरा संसारही थाटला होता. एकुलत्या एक मुलीनंही एका आफ्रीकन निग्रो मुलाशी विवाह करून ती त्याच्यासमवेत आफ्रीकेला निघून गेली.
विद्याधर एकटा पडला. एकाकी आयुष्य कंठू लागला. त्याला आता तीव्रतेने आईची आठवण येऊ लागली. आपण चुकलो ह्याची जाणीव होऊ लागली. आईला भेटावेसे वाटू लागले.
आणि म्हणूनच तो आज मायदेशात आला होता ! जन्मभूमी नाशिकच्या दिशेनं गाडी वेगाने धावत होती. मिटलेल्या पापण्यांसमोर त्याला आई दिसत होती. कधी एकदा आई भेटतेय असं त्याला झालं होतं.एका अनावर ओढीनं तो गाडीचा वेग वाढवण्यासाठी ड्रायवरला पुन्हा पुन्हा विनंती करीत होता.
मोकळ्या रस्त्यावरून सुसाट धावणा-या गाडीनं एव्हाना कसा-याचा घाट पार केला होता. मध्येच एका ब-यापैकी दिसणा-या हाॅटेलमध्ये जेवण करून ते पुन्हा मार्गस्थ झाले अन् दिमाखदार वळण घेत गाडी रम्य अश्या इगतपुरी नगरीत शिरली. ह्याच इगतपुरीत विद्याधर लहानपणी कित्येकदा आईसोबत मामाच्या घरी येत असे. प्रेमळ मामा मामींचा पाहुणचार घेत असे. त्यांच्या भाजीच्या मळ्यात स्वच्छंद हुंदडत असे.
निघताना मामीने पिशवी भरून दिलेल्या भाज्या पुढे त्यांना आठवडाभर पुरत. आई त्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार करी. आईच्या हाताला वेगळीच चव होती. पुढील आयुष्यात जग पादाक्रांत करूनही इतके चवदार पदार्थ विद्याधरला कुठेही मिळाले नाहीत.
विद्याधर ला आता आजोळचे दिवस आठवू लागले. मामा,मामी आता कुठे असतील, त्यांचे चिमुकले प्रदीप, दिलीप अजून तिथेच रहात असतील का असे प्रश्न त्याला पडू लागले. त्यांना भेटायची त्याला तीव्र इच्छा झाली. पण ते रहात असलेल्या परिसराचं नाव काही केल्या त्याला आठवेना. संध्याकाळ होत आली होती आणि अंधार पडण्यापूर्वी नाशिकला पोहोचणे जरूरीचे होते. त्यामुळे लंडनला परत जाण्यापूर्वी मामा मामीला भेटायचंच असं मनाशी ठरवत ते पुढे निघाले.
दिवेलागणीच्या सुमारास गाडीने नाशिक शहरात प्रवेश केला. अन् एक अनामिक हुरहुर विद्याधरला लागून राहिली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिले. नाशिकनंही कात टाकली होती. शहराचा कायापालट झाला होता. टोलेजंग इमारती, मोठमोठे माॅल्स शहराच्या आधुनिकीकरणाच्या खुणा दिमाखाने मिरवत होते. बदललेल्या नाशिक शहरात विद्याधर भावुक होऊन जुन्या खाणाखुणा शोधू लागला.
अरुंद रस्त्यावरून सफाईदार वळण घेत गाडी काळाराम मंदिराच्या परिसरात शिरली. आता मात्र विद्याधरला राहवेना. काळाराम मंदिराच्या आसपासच्या ह्याच परिसरात त्याचं बालपण गेलं होतं. इथेच कित्येकदा तो सवंगड्यांबरोबर खेळला होता , आईचं बोट धरून मंदिरात गेला होता. काळाराम मंदिराचा परिसर म्हणजे भाविकांची नेहमीच गर्दी. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे भाविक येत असतात. ह्या परिसरात अनेक छोटीमोठी देवळे होती. एका पाठोपाठ एक सर्व मंदिरात देवदर्शन करत आईसोबत फिरण्याची त्याला लहानपणी खूप मौज वाटत असे.
नाशिक शहरात बरेच बदल झालेले असले तरी काळाराम मंदिराच्या परिसरात मात्र फारसा बदल झालेला नव्हता. त्यामुळेच छोटे बोळ पार करत त्याचा जुना वाडा शोधून काढणे त्याला कठीण गेले नाही.
गाडीतून उतरून विद्याधर धावतच घराच्या दिशेने निघाला. घराचा दरवाजा सताड उघडा होता. अठराविश्वे दारिद्र्याच्या अनेक खाणाखुणा त्या जीर्ण घराच्या अंगोपांगी उमटल्या होत्या. लंडनला आलिशान घरात राहणारा विद्याधर बालपणीच्या घराची ती अवस्था पाहून खजिल झाला. त्यानं आईला हाक मारली.
इतक्यात अस्थिपंजर होऊन अंथरुणावर पडलेली आई त्याला दिसली अन् आवेगानं तो आईकडे झेपावला. त्याला पाहून आईचे डोळे आनंदानं लकाकले. आईचा कृश हात त्याने प्रेमाने हातात घेतला अन् दोघांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बराच वेळ ते दोघे तसेच बसून राहिले.
भावनेचा बहर ओसरल्यावर विद्याधरचं समोर लक्ष गेलं. भिंतीच्या आडून दोन चिमुकले डोळे भेदरून त्याच्याकडे पाहत होते. नजरानजर होताच त्या चिमुरडीनं आणखीनच अंग चोरुन घेतलं.
विद्याधर प्रश्नार्थक नजरेनं आईकडे पाहू लागला. त्यानंतर आईनं जे सांगितलं ते ऐकून विद्याधरला अश्रू आवरेनात.
दाराआडून हळूच डोकावणारी ती चिमुरडी त्याच्या छोट्या बहिणीची-सुरेखाची मुलगी होती.
विद्याधर च्या शिक्षणावर अमाप पैसा खर्च झाल्यामुळे अण्णा सुरेखाला शिक्षण देऊ शकले नाहीत. दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च अण्णांना परवडण्यासारखा नव्हता. प्रेमळ सुरेखानंही स्वत: हून माघार घेत घरकामात लक्ष घालायला सुरुवात केली. शालेय शिक्षणानंतर पुढे शिकण्याचा विचार सुरेखानं सोडून दिला. खूप शिकून मोठं होण्याच्या विद्याधरच्या स्वप्नाला पूर्णत्वास नेण्यासाठी सुरेखानं स्वत:च्या स्वप्नांना तिलांजली दिली !
विद्याधर ला आठवलं.... गोड गळ्याने मराठी च्या कविता गाणारी सुरेखा अभ्यासात नेहमी अव्वल नंबर पटकावत असे. तिच्या सुंदर हस्ताक्षराचं आणि तल्लख बुद्धिमत्तेचं शिक्षक नेहमीच कौतुक करीत. पण दहावी नंतर तिने शाळा सोडल्यावर आपण मात्र तिच्यावर आळशी असल्याचा शिक्का मारून मोकळे झालो होतो ! आपल्यासाठी तिनें केलेला त्याग आपल्याला कधी दिसलाच नाही! तिनेही कधी चकार शब्द काढला नाही. विद्याधर ला स्वत:ची लाज वाटू लागली. हे सारं आठवून आता त्याला खूपच अपराधी वाटू लागलं.
आई पुढे सांगू लागली.... यथावकाश अण्णांनी सुरेखाचं लग्न करून दिलं. पण तिचा नवरा व्यसनी निघाला. त्यात तिला मूल होत नव्हतं त्यामुळे सासरची मंडळी तिचा छळ करू लागली. माहेरून हुंडा आणण्यासाठीही ते तिला वारंवार सांगत असत. परंतु अण्णांना त्रास होऊ नये म्हणून सुरेखा माहेरी ह्या गोष्टी सांगत नसे.
लग्नानंतर दहा वर्षांनी सुरेखाची कूस उजवली व तिने एका गोड मुलीला जन्म दिला. गौरीआगमनाच्या दिवशी झाली म्हणून कौतुकानं सुरेखानं तिचं नाव गौरी ठेवलं.
पण सुरेखाची छळणूक इथेही संपली नाही. मुलगी झाली म्हणून सासरची मंडळी तिचा अधिकच छळ करू लागली. हुंड्यासाठी तगादा लावू लागली. अन् एके दिवशी हुंडा आणत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी तिला जाळून मारून टाकलं ! हा धक्का सहन न होऊन अण्णांना ह्रदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
तिकडे पाच वर्षांची चिमुरडी गौरी पोरकी झाली. सुरेखाच्या निधनानंतर सासरच्यांनी गौरीला सांभाळण्यास नकार दिला व गौरीची रवानगी तिच्या आजोळी करण्यात आली. तेव्हापासून गौरी तिच्या आजी जवळच रहात असे.
शाळेची पायरीही न चढलेली गौरी मुळातच तल्लख बुद्धिमत्तेची होती. शेजारच्या मुले शाळेत जात तेव्हा गौरी अनिमिष नेत्रांनी त्यांच्याकडे पहात असे. पण आजीचं आजारपण, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत... ह्या सा-याचा विचार करून शाळेत जाण्याचा विचार गौरी मनातून झटकून टाकी. आजीची सेवा करण्यात आणि जमेल तशी घरातली कामं करण्यात गौरीला समाधान वाटत असे.
हे सर्व ऐकून विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला खूपच अपराधी वाटू लागले.
त्याने चिमुकल्या गौरीला जवळ बोलावले. ती दिसायला हुबेहूब सुरेखा सारखीच होती. तोच गोरा वर्ण, टपोरे पाणीदार डोळे, गोबरे गाल.... त्यानं प्रेमानं तिला जवळ घेतलं. आठ वर्षांची चिमुरडी गौरीही अत्यंत विश्वासानं मामाच्या कुशीत शिरली.
शेजारच्या काकूंनी आणून दिलेलं साधंच पण रुचकर जेवण तिघे आनंदाने जेवले. काकूंचा अरविंदा विद्याधरचा बालपणीचा जानी दोस्त. अरविंदानं जवळच पूजेसाठी लागणा-या सामानाचं एक छोटंसं दुकान काढलं होतं. मंदिराच्या परिसरात असल्यामुळे दुकान छान चालत असे. विद्याधर आल्याचे समजताच अरविंदाही येऊन भेटून गेला. हरवलेले गवसल्याचा आनंद विद्याधरच्या चेह-यावरून ओसंडून वाहत होता.
विद्याधरच्या आगमनानं घराला घरपण मिळालं. आनंदात न्हाऊन अत्यंत समाधानाने आई अंमळ लवकरच झोपी गेली. छोटी गौरीही विद्याधरच्या कुशीत गाढ झोपी गेली. दिवसभराच्या दगदगीनं विद्याधरही थकला होता. त्यालाही चटकन झोप लागली.
सकाळी उठल्यावर विद्याधरने काळाराम मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतलं. झालेल्या चुकांची त्याने रामरायाकडे मनापासून माफी मागितली. रामरायाच्या त्या काळ्या पण सतेज, प्रसन्न मूर्तीकडे त्याने क्षणभर पाहीले अन् तो मंदिरातून बाहेर पडला.
मंदिरातून बाहेर येऊन त्याने मनाशी काहीतरी खूणगाठ बांधली. लंडनला परत न जाता कायमचं इथेच राहण्याचा त्यानं ठाम निर्णय घेतला. आजवर केलेल्या चुकांची त्याला भरपाई करायची होती.
घरी येऊन छोट्या गौरीला त्यानं उठवलं. तिला तयार करून सोबत घेऊन त्यानं शाळेची वाट धरली. आता गौरी शाळेत जाणार होती , शिकणार होती. ती खूप आनंदात होती.
आईलाही तो चांगल्या डॉक्टरकडे नेणार होता. औषधोपचार सुरू करणार होता. घराचीही डागडुजी होणार होती. घर पुन्हा हसू खेळू लागणार होतं.
गौरीला शाळेत सोडून विद्याधर घरी आला. दिवाणखान्यातल्या अण्णांच्या तसबीरीला त्याने हात जोडले. अण्णा समाधानानं हसत होते. त्यांचा लाडका विद्याधर घरी परत आला होता.... पुन्हा कधीही परत न जाण्यासाठी !
Comments
Post a Comment