गाथा क्रांतिकारकाची
*क्रांतिकारकाची जीवनगाथा*
(संस्कृती चांकाप्र महिला मंडळ उपक्रमाकरिता)
- स्वाती शृंगारपुरे
आज मी ज्या क्रांतिकारकाची ओळख करून देणार आहे, त्यांचे नाव आहे श्री.गजानन यशवंत कर्णिक.
२४ जून,१९१८रोजी कर्जतजवळील भिवपुरी गावात गजाननरावांचा जन्म झाला. त्यांचे वडील डाक खात्यात नोकरीला होते. शिक्षणासाठी वडीलांनी गजाननरावांना पुण्यात भाऊसाहेब गडकरी ह्या स्नेह्यांकडे पाठवले. पुण्यात चिमणबागेतील भाऊसाहेबांच्या घराजवळ अनेक क्रांतिकारक रहात असत. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होऊन गजाननरावांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले.
क्रांतिकारक मगनलाल पटेल ह्यांच्याबरोबर गजाननरावांनी एक धाडसी मोहीम आखली.... ती म्हणजे शनिवारवाड्यावर तिरंगा फडकविण्याची. दि.४ मार्च, १९३२ रोजी तिरंगी झेंडा घडी करून पोटाभोवती गुंडाळून त्यांनी वर नेहरू शर्ट चढवला व ते शनिवारवाड्याचे जिने चढून वर गेले. तेथे असलेल्या युनियन जॅक ची दोरी त्यांनी सोबत आणलेल्या ब्लेड ने कापून टाकली व तेथे भारतीय तिरंग्याची दोरी बांधून तिरंगा फडकवला. 'भारतमाता की जय' असा जयघोष केला.
ताबडतोब पोलिस आले व त्यांनी गजाननरावांना मारत मारत फरासखान्यात नेऊन बंद केले. पुढे गजाननरावांना ६ महीने कारावासाची शिक्षा झाली. त्यावेळी ते भावे हायस्कूलमध्ये इंग्रजी चौथीत शिकत होते. पोरसवदा वय, पण केवढे हे धाडस!
कारागृहातून सुटून आल्यावर भाऊसाहेबांनी त्यांना पुन्हा घरात आसरा दिला व शिक्षणात लक्ष घालण्यास बजावले. परंतु,त्याच सुमारास क्रांतिकारी चळवळीने जोर धरला व गजाननराव पुन्हा क्रांतिकारी गटाकडे ओढले गेले. ६रुपये भाड्याने जागा घेऊन त्यांनी देशपांडे,धर्माधिकारी वगैरे १४ मंडळींना सोबत घेऊन दारुगोळ्याचे सामान जमविण्यास सुरुवात केली. ठाणे येथील खारकर आळीत ५ रुपये भाड्याने घर घेऊन तेथे त्यांनी दारुगोळा नेऊन ठेवला व तत्कालीन गव्हर्नर सर राॅजर ह्याचा वध करण्याची स्वप्ने ते पाहू लागले.
इतक्यात २७जून,१९३७ रोजी सकाळी ७ वाजता गव्हर्नर रेल्वेने ठाण्यावरून जाणार असल्याची खबर त्यांना लागली. त्याकाळी ठाणे-पुणे दरम्यान एकच पूल होता. त्या पुलावर मध्यरात्रीच डायनामाईट लावून गव्हर्नरची आगगाडी जात असताना बॅटरीच्या सहाय्याने पूल उडवून देण्याची योजना ह्या १४ क्रांतिकारकांनी आखली व मध्यरात्री पुलावर जाऊन प्रत्येक खांबावर डायनामाईट बांधले. दुर्दैवाने हे सारे तेथील पोर्टरच्या पत्नीने पाहिले व ह्या सर्वांचा बेत फसला. युरोपियन सोल्जर्सनी पुलावर चढून दिसेल त्याला गोळ्या घालण्यास सुरुवात केली, त्यात १४ पैकी १२ जणांचा मृत्यू झाला.
पट्टीचे पोहणारे असलेल्या गजाननरावांनी खाली खाडीत उडी टाकली व पोहत ते कल्याणजवळ एका किनार्याला लागले. नंतर कित्येक दिवस ते भूमिगत राहीले.अखेर एकदा दादर ला दादासाहेब फणसे ह्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले असताना पोलिसांनी त्यांना पकडले व विसापूर कारागृहात स्थानबद्धतेत ठेवले.
सुटून आल्यावरही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अनेक हालअपेष्टा भोगल्या.
मैत्रिणींनो, असे अनेक क्रांतिकारक त्याकाळात होऊन गेले ज्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणांची बाजी लावली, त्याचीच गोड फळे आपण आज चाखत आहोत.
अश्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम.
*भारतमाता की जय!*
Comments
Post a Comment