कोणता म्हणावा सूर्य खरा?



( कन्याकुमारी येथील सूर्योदयाचे नयनरम्य दृश्य पाहून सुचलेली कविता.
येथे ज्ञानमणी,  ज्ञानसूर्य,  ज्ञानझरा हे शब्द  स्वामी विवेकानंदांकरिता वापरले आहेत. तर अरुण, दिनकर, वासरमणी, नारायण हे शब्द सूर्य ह्या शब्दाला समानार्थी म्हणून वापरले आहेत.)

उधळीत केशर पृथ्वीतलावर 
   अरुण उगवला नभांगणी
येता येता अवलोकी तो
           भूलोकीचा ज्ञानमणी

धरतीवरचा ज्ञानसूर्य 
          करितो जीवनज्ञान प्राप्त
मानवंदना देई त्यास जणू
          अवतरुनी दिनकर तप्त

वासरमणी अन् ज्ञानमणी 
         आलिंगन देती परस्परां
पाहुनी हा सोहळा आगळा
          संतृप्त सागर,संतृप्त धरा
 
 भारतभूची शान असे 
          स्वामीजींचे पावन स्थान
किरणे बरसुनी नारायण हा
           घाली स्वामीजींना स्नान

एक असे तो ऊर्जास्त्रोत अन्
           दुसरा अखंड ज्ञानझरा
तुम्हीच सांगा प्रिय सख्यांनो 
           कोणता म्हणावा सूर्य खरा ? 


 

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं