अंधःकार - लघूकथा
*अंधःकार*
आशा नगरच्या झोपडपट्टीत छोट्याश्या झोपड्यात तुटक्या खाटेवर पडून काशिनाथ आढ्याकडे एकटक पहात होता. लोकांकडे धुणीभांडी करणारी त्याची बायको सुमन सकाळीच कामावर निघून गेली होती. दिवसभर काबाडकष्ट करून ती तिन्हीसांजेला घरी परतत असे. एकुलता एक मुलगा विकास हा ही एका कुरीयर कंपनीत कामाला असल्यामुळे सकाळीच घराबाहेर पडला होता.
दोन वर्षापूर्वी एका अपघातात दोन्ही पाय गमावल्यामुळे काशिनाथ दिवसभर झोपड्यातच खाटेवर पडून राही. आजही तो तसाच खाटेवर पडून आढ्याकडे टक लावून पहात होता. त्याचे डोळे वारंवार भरून येत होते. त्याचा सारा जीवनपटच त्याच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखा सरकत होता.
आशा नगरमधल्या एका ब-यापैकी चाळीत काशिनाथ, सुमन आणि त्यांचा लाडका विकास असं त्रिकोणी कुटुंब रहात असे. काशिनाथ एका नामवंत शाळेत शिपायाची नोकरी करीत असे. अत्यंत कामसू आणि प्रामाणिक असा त्याचा नावलौकिक होता.
पण अचानक एकदा मित्रांबरोबर फिरायला गेला असताना मित्रांच्या आग्रहाला बळी पडून काशिनाथने दारूचा प्याला ओठाला लावला आणि त्यानंतर हाच प्याला त्याची दैनंदिन गरज ठरला. हळूहळू काशिनाथ व्यसनाधीन झाला. नोकरी करून कमावलेले सारे किडूकमिडूक आता व्यसनात संपून गेले. चाळीतल्या स्वतःच्या मालकीच्या घरातून बाहेर पडून आशा नगरच्या टोकाला असलेल्या झोपडपट्टीत एक झोपडे भाड्याने घेऊन राहण्याची त्यांच्यावर पाळी आली.
समजूतदार सुमन घरकाम करून कुटुंबाची कशीबशी गुजराण करू लागली. जात्याच बुद्धिमान असलेल्या विकासने शिक्षण अर्धवट सोडून मिळतील ती कामे करून आईला हातभार लावला व आता तो एका कुरीयर कंपनीत काम करत होता.
ह्यातच दारूच्या नशेत झोकांड्या खात चालत असताना काशिनाथ एका खोल खड्ड्यात पडला व ह्या अपघातात कंबरेला जबर दुखापत होऊन त्याला कायमचे अपंगत्व आले.
तेव्हापासून काशिनाथ असाच अंथरुणाला खिळून होता. पश्चात्तापात होरपळत दिवस घालवत होता. संसाराची वाताहात , सुमनचे काबाडकष्ट, बुद्धिमान विकासच्या आयुष्याचं झालेलं नुकसान ह्यामुळे त्याला आता खूपच अपराधी वाटत होते.
पण आता वेळ निघून गेली होती. त्याच्या व्यसनाने त्याचा घात केला होता. आणि आता त्याच्यासमोर उभा होता फक्त आणि फक्त अंधःकारमय भविष्यकाळ !
- ©️ स्वाती शृंगारपुरे
swatishringarpure505@gmail.com
Comments
Post a Comment