घरात हसरे तारे

 *घरात हसरे तारे*


रात्रीचा आठचा सुमार. सलग तीन दिवसांची हाॅस्पिटलमधली ड्युटी संपवून गीता घरी आली. सरकारी इस्पितळातील कोरोना वाॅर्डमध्ये ती मुख्य परिचारिका म्हणून कर्तव्य बजावत होती. तिच्या मृदू बोलण्याने रुग्णांना धीर येत असे. रुग्णांच्या मनात ती आशावाद जागृत ठेवी. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांचे पथ्यपाणी, औषधे सारं काही ती न कंटाळता करत असे. सलग तीन दिवस जराही विश्रांती न घेता ड्युटी करून आज ती घरी परतली होती. 

     लॅच की नं दरवाजा उघडून गीता घरात शिरली अन् काय आश्चर्य! दरवाज्याचा आवाज ऐकून बेडरूम मधून बाहेर आलेली सायली धावत पुढे येऊन तिला बिलगली.  क्षणभर आपण अनुभवतोय ते स्वप्न की सत्य हेच गीताला उमगेना. "आय लव्ह यू मम्मा" ह्या सायलीच्या शब्दांनी गीता भानावर आली व काहीच न समजल्यामुळे गोंधळून सायलीकडे पहात ती तशीच उभी राहिली. आत्तापर्यंत तिचा तिरस्कार करणारी तिची सावत्र मुलगी  आज अचानक कशी बदलली हेच तिला कळेना. पण कौतुकाने हसत बेडरूममधून बाहेर आलेल्या अविनाश ने सर्व खुलासा केला अन् गीताच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

     झालं होतं ते असं! अविनाश बरोबर गीताचा पुनर्विवाह झाला होता. सायली अविनाश च्या पहिल्या पत्नीची मुलगी. दीर्घ आजारपणात पत्नीचं निधन झाल्यानंतर अविनाशने गीताशी पुनर्विवाह केला. परंतु, बारा तेरा वर्षांची सायली मात्र गीताला आई मानायला बिलकुल तयार नव्हती. मुळातच प्रेमळ असलेली गीता अतिशय मनापासून सायलीला आपली मुलगी मानत असे. तिला हवं नको ते पहात असे. तिचे मनापासून लाड करत असे. पण सायली मात्र गीताचा तिरस्कार करे. ती सतत गीताला घालूनपाडून बोलत असे व बाबांजवळ तिच्या कागाळ्या करी. गीताला ह्या गोष्टीचं फार वाईट वाटत असे. परंतु, ती हे सारं मुकाट्याने सहन करी. 

     पण आज सायलीमध्ये अचानक सकारात्मक बदल झाला. त्याला कारणही तसंच होतं. 

     टीव्हीवरील बातम्यांमध्ये सरकारी इस्पितळाचा कोरोना विभाग दाखवला गेला व त्यात काम करणारी गीता सायलीला दिसली. संपूर्ण कोरोनाप्रतिबंधक पोशाखात असलेल्या गीताला खरं तर सायलीने ओळखलंच नाही. पण निवेदकाने डाॅक्टर साहेबांना काही प्रश्न विचारले तेव्हा डाॅक्टरांनी गीताच्या नावाचा उल्लेख करत तिच्या कामाची  भरभरून प्रशंसा केली. गीताच्या अथक प्रयत्नामुळेच अनेक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. 

      ते ऐकले अन् सायलीला आईचा अभिमान वाटला. इतर मुलांच्या आया  घरात सुरक्षित बसलेल्या असताना आपली आई मात्र जीवाची पर्वा न करता तिची नर्सची ड्युटी बजावत आहे ह्याचं सायलीला कौतुक वाटलं. ख-या अर्थाने आता तिला आईचा अभिमान वाटू लागला. आईच्या घरी परतण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. अन् म्हणूनच गीता घरात शिरते न शिरते तोच आवेगानं सायलीनं तिला घट्ट मिठी मारली ! 

     आज गीताला ख-या अर्थानं मातृपद मिळालं होतं. जणू तिच्या नि:स्पृह रुग्णसेवेची ईश्वरानंच दखल घेतली होती. मायलेकी एकमेकींच्या कुशीत विसावल्या होत्या अन् सोफ्यावर बसलेला अविनाश कौतुकानं दोघींकडे पहात होता. घर आनंदात न्हाऊन निघालं होतं.... 


©️स्वाती शृंगारपुरे

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं