आदरांजली - सुधा नरवणे

*स्वातीचे शब्दमोती*
           
              *आदरांजली*

      "आकाशवाणी पुणे. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे!"

     मंडळी , कोणाकोणाला आठवतोय हा स्वर ?? वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माझ्यासारख्या अनेकांना नक्कीच आठवत असेल.
      साधारण 70-80 चं दशक. दूरदर्शन चा सोनेरी विळखा अद्याप पसरला नव्हता. पण रेडीओ मात्र त्याकाळात घराघरात विराजमान असे. सिनेमा वगैरे पाहण्याची चैन परवडण्यासारखी नव्हती. रेडीओ हे एकमेव मनोरंजनाचं साधन !
     सकाळची सुरुवातच मुळी आकाशवाणीवरच्या सुमधूर प्रभातगीतांनी व्हायची. सकाळची रम्य वेळ , बच्चेकंपनीची शाळेला निघायची घाई , बाबांची कार्यालयात जाण्याची तयारी , सर्वांचे डबे तयार करण्याची आई आणि आजीची लगबग.... सर्वच आवरत आलेलं असे आणि अशा वेळेलाच हा चीरपरिचित स्वर कानी यायचा !
      सुधाताईंचा सुमधूर श्रवणीय स्वर कानी येताच घरातलं वातावरण अचानक बदलून जात असे. निवांत बसलेले आजोबा कान टवकारून बातम्या ऐकायला सरसावायचे.  बाबा मात्र फक्त "ठळक बातम्या" ऐकून मार्गस्थ व्हायचे. आणि सुधाताईंच्या बातम्या म्हणजे बच्चे कंपनीच्या मनातल्या घड्याळाचा गजरच जणू ! दप्तर काखोटीला मारून मुले पटापट शाळेकरिता निघत असत.
     सुधाताईंच्या बातम्यांमध्ये मुलांना फारसा रस नसे. तरीही तो स्वर कानात साठवतच मुले शाळेला निघत.
     आजही तो स्वर कानात घुमतोय.... बालपणीच्या अनेक आठवणी मनात फेर धरतायेत.... ह्रदय उचंबळून येतंय...
       सुधाताईंच्या जाण्याने फार मोठा धक्का बसलाय ह्रदयात जपून ठेवलेल्या त्या बालकोप-याला.... ढवळून निघालंय् ते अलवार बालविश्व ! अनेक आठवणी डोकं वर काढतायेत...
      सुधाताईंच्या बातम्या ऐकण्यासाठी कान टवकारून आरामखुर्चीत रेलून बसलेले आजोबा डोळ्यासमोर येतायेत... घराबाहेरचं जग ह्याच बातम्यांमधून माहित करून घेणारी सोज्वळ आजी आणि "निघा रे पटापट ,  सुधाताई आल्या" अशी प्रेमळ दटावणी करणारी आई ! सारं बालपण आज सुधाताईंच्या जाण्याने नजरेसमोर आलं आणि पापण्या नकळत ओलावल्या !
      "मरावे परी किर्तीरुपे उरावे" ह्याचीच जणू मूर्तिमंत प्रचिती म्हणजे सुधाताई ! त्या उत्तम लेखिका होत्या. त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू असले तरी "वृत्तनिवेदिका" हीच त्यांची ओळख आजही सर्वांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवते.

      अशा ह्या सर्वांच्या ह्रदयात कायम घर करून राहिलेल्या ,  आकाशवाणीच्या वृत्तनिवेदिका सुधा नरवणे ह्यांना भावपूर्ण आदरांजली !


© स्वाती शृंगारपुरे

Comments

  1. खूपच भावपूर्ण आदरांजली.70-80च्या दशकाचा तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला आणि सुधाताईंची आठवण तीव्रतेने जागी झाली,त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. देव सुधाताईंच्या आत्म्याला शांती देवो. -------/चित्रे मावशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं