आषाढस्य प्रथम दिवसे
नमस्कार
मी सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे, बोरीवली,
*आषाढमास, महाकवी कालिदास आणि मेघदूत*
आषाढमास म्हणजे अत्यंत सुखावह वातावरणाचा मास. अंगाची काहिली करणा-या ग्रीष्मापासून मान्सूनच्या आगमनाने आषाढापूर्वी सुटका झालेलीच असते. पण आषाढ येतो तोच सोबत पावसाच्या मुसळधार सरी घेऊन ! वातावरणात एक सुखद गारवा पसरू लागतो. सृष्टीवर हिरवाईचा साज चढू लागतो. अन् अश्या वेळी महाकवी कालिदासाची आठवण न झाली तरच नवल !
आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस महाकवी कालिदासांचा जन्मदिवस. म्हणूनच हा दिवस कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.
राजा विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी कालिदास हा एक रत्न होता. कालिदासाच्या वैयक्तिक जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी कालिदासाचा जन्म ख्रिस्तपूर्व काळात झाला असावा. तो राजा विक्रमादित्याच्या आश्रयास होता. ह्याच विक्रमादित्य राजाने नंतरच्या काळात 'विक्रम संवत्सर' सुरू केले.
कालिदासाने तत्कालीन प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेत विपुल काव्यलेखन व नाट्यलेखन केले. संस्कृत भाषेतील पाच सुप्रसिद्ध महाकाव्यात कालिदासाच्या कुमारसंभव व रघुवंश ह्या महाकाव्यांचा समावेश आहे. तसेच अभिज्ञान शाकुंतलम् ह्या लोकप्रिय नाट्याचीही निर्मिती कालिदासाच्याच लेखणीतून झाली.
महर्षी व्यास व महर्षी वाल्मिकी हे संस्कृत भाषेचे आर्ष कवी. व्यास हे सत्य व वाल्मिकी हे शिव मार्गावरून वाटचाल करून काव्यनिर्मिती करीत. कालिदास हे भारतीय संस्कृतीचे प्रातिनिधिक कवी. कालिदासांनी ह्या सत्य आणि शिव ला सुंदराची जोड दिली आणि सत्यम् शिवम् सुंदरम् अश्या काव्यांची रचना केली. "मेघदूत" हे अजरामर खंडकाव्य त्यापैकीच एक.
पत्नीच्या विरहामुळे व्याकूळ झालेल्या एका यक्षाने मेघांबरोबर पत्नीला पाठवलेला संदेश म्हणजे मेघदूत हे खंडकाव्य.
'मंदाक्रांता' ह्या वृत्तातील मेघदूत ह्या काव्याचा नायक एक यक्ष असून तो कुबेराचा सेवक होता. त्याला नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला यक्षराज कुबेर ह्यांनी हद्दपारीची शिक्षा ठोठावली. त्याठिकाणी बरेच दिवस नवपरिणीत पत्नीचा विरह साहत असतानाच आषाढाचा पहिला दिवस उजाडला अन् प्रेमीजनांना व्याकूळ करणारा वर्षा ऋतू सुरू झाला . पत्नीविरहाने व्याकूळ झालेल्या त्या यक्षाने आषाढातल्या मेघांनाच दूत बनवून पत्नीला संदेश पाठवला. तसेच तिचाही शुभसंदेश मला येऊन सांग अशी विनंती केली अशी ह्या 'मेघदूत' ची संकल्पना आहे.
तर , असा हा आषाढ महिना... सर्वांनाच हवाहवासा वाटणारा.. ह्या सुखद आषाढाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
©️सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे
०८/०७/२०२४
Comments
Post a Comment