स्नेहांकिता स्नेहसंमेलन पुणे १८ जानेवारी २०२६
.//श्री//
*गणेश पार्वती*
निर्मिती: संस्कृती चांकाप्र महिला मंडळ -कांदिवली, बोरीवली
संहिता लेखन - सौ. स्वाती शृंगारपुरे
दिग्दर्शन: सुलेखा देशपांडे
पात्रे ७
१) गणेश -
२) पार्वती -
३) उंदीर मामा-
४)
५)
६)
७) (माणसे)-
वेळ ७ मिनिटे
पार्वती: (वाट पहात असते...)
हा गजानन का बरं आला नाही अजून?
गणेश: आलो बरं माते... १० दिवस पृथ्वीलोकावर राहून, मानवजातीचा पाहुणचार घेऊन आज मी कैलासावर परत आलोय. पृथ्वीलोकावरचा गणेशोत्सव संपन्न झाला... नमस्कार करतो माते...
मूषक : वंदन करतो माते, गणराजासोबत मलाही पृथ्वी ची सैर घडली..
पार्वती : वाह वाह! ( आशिर्वाद देते )
पार्वती: (गणेशाकडे वळून)
या या गणेशा, तुमच्याविना इथे फारच सुनं सुनं वाटत होतं. बरं, ते जाऊ दे. कसं काय पृथ्वी वरील वास्तव्य? तिकडे सारं काही ठीकठाक आहे ना?
गणेश: माते, पृथ्वीवरील वास्तव्य खूपच आनंददायी झालं. लोकांनी माझं जल्लोषात अन् उत्साहात स्वागत केलं... पहा ना...
(आता इतर ४ जणी पुढे येतात. गणेशोत्सवाचा पहिला दिवस... गणपती घरी आणतानाचा सीन...)
१,२,३,४- गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया ( जयघोष )
[ मोरयाला मखरात बसवून लोकांचं डिस्कशन ]
१) चला चला.. बाप्पाची यथासांग पूजा करू
२) शमी, दूर्वा, जास्वंदीची फुलं आणली आहेत ना ?
३) हो तर... आणि पूजा झाली की छान आरती करुया
४) आणि मग २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करुया..
[ पुन्हा एकदा 'गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष ]
गणेश: आणि मग १० दिवस पूजाअर्चा,आरत्या, नैवेद्यासाठी लाडू,पेढे,मोदक,पंचपक्वान्नांची रेलचेल... आनंदीआनंद...
पार्वती: वाह वाह गणेशा, तुमचं वर्णन ऐकून मी ही सुखावून गेले. बरं... पृथ्वीवर सर्व ठीक चाललंय ना ? लोक सुखात आहेत ना ?
गणेश: माते, फार चांगला प्रश्न विचारलास... पृथ्वीवर सारं काही अगदी छाऽऽन सुरू आहे. अगं, ब्रम्हदेवानं ही सृष्टी निर्माण केली आणि मानवानं त्यात अनेक शोध लावून बदल घडवले..
पार्वती: हम्म.. गणेशा, तूच तर बुद्धी देतोस लोकांना... तू तर बुद्धीची देवता...
गणेश: तेही खरंच म्हणा... पण माते, मानवानं मेहनतही खूप घेतलेली दिसते. टोलेजंग इमारती, मोबाईल फोन, संगणक, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान ! ह्या सर्वाचा फार सुरेख मेळ साधला आहे लोकांनी..
हां... आता काही चुकाही मानव करीत आहे. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास होताना दिसला. शिवाय अनेक ठिकाणी युद्ध, अपघात, गरीबी, मंदीची लाट, कुठे दुष्काळ, तर कुठे महापूर ह्या समस्या आहेत.
पण बरं का माते, मानवजाती हुशार आहे. मेहनती आहे, ह्या समस्यांमधून मार्ग काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. पहा ना... लोक जनजागृती करत आहेत..
१) पर्यावरण वाचवा... झाडे लावा झाडे जगवा.. २
२) युद्ध नको, शांती हवी २
३) वेगाला घाला आळा, अपघात टाळा २
४) पाणी वाचवा पाणी अडवा पाणी जिरवा २
पार्वती: वाह वाह गणेशा... अशीच जनजागृती होत राहिली तर पृथ्वी पुन्हा एकदा बहरून जाईल, नद्या, तलाव दुथडी भरुन वाहू लागतील, वनराई हिरवीगार होईल. शेते डोलू लागतील आणि पृथ्वीवर समृद्धी,सुख, समाधान नांदू लागेल. युद्धे थांबली तर लोक सुरक्षित होतील. कोणत्याही प्रकारचे भीतीचे सावट पृथ्वीवर राहणार नाही..
गणेश: वाह वाह माते, तुझ्या ह्या आशावादानं मी अगदी आनंदून गेलो आहे. आनंदाच्या भरात नृत्य करण्याचा मोह मला आता आवरत नाही..
नृत्य: फक्त दोन ओळी किंवा वेळेच्या उपलब्धतेनुसार..
पार्वती: बरं बरं बरं... गणराज, पुरे झालं हं आता तुझं नृत्य... चल बरं... चटकन् स्नान करून घ्या.. तुम्ही स्वगृही परतणार म्हणून मी ही आज चवदार मोदक केले आहेत..
गणेश: वाह वाह
पार्वती: आणि मूषकराज, आपणही चला.. गणेशाचा भार वाहून आपणही थकला असाल. आपल्यासाठीही मोतीचुराचे सुरेख लाडू तयार आहेत..
मूषक: पार्वतीमातेचा जयजयकार असो. २
आणि आता समारोप
इथे पृथ्वीवर -
निरोप तुमचा घेतो आम्हा आज्ञा असावी बाप्पा आज्ञा असावी
चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी..
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
पुढल्या वर्षी लवकर या
पुढल्या वर्षी लवकर या
Comments
Post a Comment