जरा विसावू ह्या वळणावर
*पा.ता.मराठी सा. मंडळकरिता*
मान्यवर साहित्यिकांनी दिलेल्या आठ ओळींवरून बेतलेली कथा
लेखिका - सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे
*शीर्षक - जरा विसावू ह्या वळणावर*
*डोंगरालगतच्या ओढ्याकाठी निसर्गसौंदर्य लाभलेलं एक छोटंसं सुंदर गाव.* सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ह्या गावावर निसर्गानं मुक्त हस्तानं हिरवाईची उधळण केली होती. *ह्या गावातल्या ग्रामीण रुग्णालयात समृद्धीची परिचारिका म्हणून नेमणूक झाली.*
एके दिवशी समृद्धी गावात डेरेदाखल झाली अन् गावाच्या मध्यवर्ती चौकात असणाऱ्या रुग्णालयात आली. रुग्णालयाच्या मेट्रन बाईंना स्वतः ची ओळख करून देऊन तिनं वसतीगृहाची चौकशी केली. अतिशय आपुलकीने बाईंनी स्वतः तिला वसतीगृहात नेऊन तिची खोली दाखवली. छोटीशीच पण नीटनेटकी खोली समृद्धीला खूप आवडली. चटकन स्वतःचे सारे आवरून समृद्धीने रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता उरकला आणि लगेचच ती ड्युटीवर हजर झालीदेखील!
आता रोजच ती वेळच्या वेळी रुग्णालयात जाऊ लागली. असेच दिवस सरकू लागले. *वृक्षप्रेमी असलेली समृद्धी ह्या गावात नेमणूक झाली म्हणून अगदी खुशीत होती.* तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तिने अनेक मैत्रिणीही जोडल्या. मनापासून करत असलेल्या रुग्णसेवेमुळे रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनातही समृद्धीला एक आदरयुक्त स्थान प्राप्त झाले.
*समृद्धीच्या बाबतीत असं थोडंफार चांगलं होत असताना एका माणसाच्या मात्र हे डोळ्यात खुपत होतं. आणि तीच व्यक्ती समृद्धीचा माग काढीत ह्या छोट्या गावात पोचली होती. समृद्धीला ह्याची पुरेपूर जाणीव झालेली होती. रुग्णालयात रुग्ण, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी ह्या सा-यांवर शोधक नजरेने पाहण्याची सवय तिने स्वतःला लावून घेतली. ती व्यक्ती एक धोकादायक वादळ बनून समृद्धीच्या जीवनात शिरली होती.*
तो समृद्धीचा सावत्र भाऊ कुणाल होता !
समृद्धी चार वर्षांची असताना साध्या तापाचे निमित्त होऊन तिच्या आईचे निधन झाले व बाबांनी पुनर्विवाह केला. समृद्धीने नव्या आईला सहज स्वीकारले. नवी आईही समृद्धीला काही कमी पडू देत नसे. पण लवकरच कुणालचा जन्म झाला अन् घरातले चित्र पालटले. सावत्र आईला समृद्धी नकोशी झाली व तिला वसतीगृहात ठेवण्यासाठी आईने बाबांच्या मागे लकडा लावला. हतबल झालेल्या बाबांनी मग समृद्धीला दूरच्या एका निवासी शाळेत ठेवले अन् समृद्धी कुटुंबाला पारखी झाली. अधूनमधून बाबा तिला भेटायला येत. तिला दूर ठेवावं लागल्यामुळे त्यांना अपराधी वाटत असे. कधीतरी सुट्टीत बाबा तिला घरी नेत असत. पण तेव्हा कुणाल काही ना काही भांडण उकरून काढत असे. तो अतिशय हट्टी व बेशिस्त मुलगा होता. आईबाबांजवळ तो तिच्या कागाळ्या करीत असे. ह्यामुळे समृद्धीला खूप वाईट वाटत असे. ती मात्र त्याला प्रेमाने जवळ घेई.
हळूहळू अभ्यासाचे कारण देत समृद्धीने सुट्टीत घरी येणे बंद केले.
असाच काळ पुढे सरकत होता. आता शिक्षण पूर्ण करून समृद्धी परिचारिका बनली होती. कुणाल मात्र शिक्षण अर्धवट सोडून उनाडक्या करत फिरत असे. दारू,सिगरेट सारखी अनेक व्यसने त्याला जडली होती.
मधल्या काळात आई निवर्तली होती अन् बाबाही आता पार थकले होते. समृद्धीला दूर ठेवावं लागल्याची सल सतत त्यांच्या मनात होती. त्यातच कुणालच्या व्यसनांना ते कंटाळले होते. मृत्यूची चाहूल लागताच त्यांनी त्यांचे प्रशस्त घर व पाच एकर जमीन समृद्धीच्या नावे करून कुणालला मिळकतीतून बेदखल केले. लवकरच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
संपत्ती समृद्धीच्या नावे झाली हे कुणालला खटकत होते अन् समृद्धीला कायमचे संपविण्याचा विचार करून तिला शोधत तो ह्या गावात आला होता. रोज रुग्णालयात किंवा वसतीगृहात येऊन तो समृद्धीला धमकावत असे. ह्याप्रकाराने समृद्धी अगदी वैतागून गेली होती. कुणाल तिचे काही बरेवाईट करेल ही भितीही तिला भेडसावत होती.
अश्यातच एक दिवस समृद्धी तिच्या खोलीत झोपलेली असताना भल्या पहाटे तिचा फोन खणखणला व कुणी अत्यवस्थ रुग्ण दाखल झाल्याने तिला रुग्णालयात बोलावून घेण्यात आले.
चटकन तयार होऊन समृद्धी रुग्णालयात आली आणि पाहते तर काय ! तो रुग्ण कुणाल होता !
दारूच्या नशेत रस्ता ओलांडताना एका टेम्पोची त्याला जोरदार धडक बसली व तो दूर फेकला गेला. डोक्याला मार लागल्याने तातडीची शस्त्रक्रिया करणे जरुरीचे होते. क्षणात तिच्यातली परिचारिका जागी झाली अन् डाॅक्टरांच्या मदतीला उभी राहिली.
सुमारे दोन तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी करून डॉक्टर बाजूला झाले अन् समृद्धीच्या सराईत हातांनी जखमेवर बॅन्डेज बांधले.
आठवडाभर उपचार घेऊन कुणाल ब-यापैकी बरा झाला. ह्यादरम्यान समृद्धीने त्याची खूप काळजी घेतली. ते पाहून कुणाल अगदी भारावून गेला. समृद्धीशी वाईट वागल्याचा त्याला आता खूप पश्चात्ताप झाला. "ताई, मला माफ कर" , एवढं बोलून तो रडू लागला. "असं म्हणू नकोस कुणाल, आजपासून आपण एकत्र राहू... आपल्या घरात.. आपल्या बाबांच्या घरात!" ती गलबलून म्हणाली आणि तिने प्रेमाने कुणालला जवळ घेतले... अगदी लहानपणी घ्यायची तस्संच!
एव्हाना संध्याकाळ टळत आली होती. दूर क्षितिजावर चमचमणारे तारे दिसू लागले होते. अन् इथे पृथ्वीवर अस्ताला गेलेलं बहिणभावांचं एक नातं पुनरुज्जीवित होत होतं. समृद्धी आनंदात होती. तिच्या मनावरचं मळभ आता दूर झालं होतं !
सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे
भ्रमणध्वनी : ८५९१३ २५२०४
Comments
Post a Comment