स्पर्श
*स्वातीचे शब्दमोती*
*स्पर्श*
स्पर्श असावा मृदु,मुलायम
आश्वासकता झरे तयातून
थंड बोच-या वा-यामध्ये
सुखवून जावे थोडेसे उन
स्पर्श असावा असा निरागस
जणू चिमुकले बाळ गोजिरे
कुशीत घेता आई त्याला
ह्रदयामधुनी अमृत पाझरे
स्पर्श असावा सुरेल सुस्वर
श्रीरंगाची जणू वेणू
अधरामधुनी संगीत झरता
स्वर्गसुख की त्यास म्हणू
स्पर्श असावा पावन ऐसा
उद्धरू दे भाविक भक्त
श्रीरामाच्या पदस्पर्शाने
जशी अहिल्या झाली मुक्त
विविध रुपे ही स्पर्शाची
जीवन सुखकर करतात
विरून गेले स्पर्श तरीही
रम्य स्मृती त्या उरतात
- ©️ स्वाती शृंगारपुरे
२८/०३/२०२४
📞85913 25204
Comments
Post a Comment