चिऊताईची कविता
*चिऊताईची कविता*
गोडगोजिरी अशी सानुली हवीहवीशी असते चिमणी
पहाटवेळी चिवचिव करते फांदीवरती बसते चिमणी
चिऊकाऊचा घास कालवून बाळ गोजिरे खाई मम्मम
खाता खाता खुदकन हसते दारी पाहता छोटी चिमणी
आई बसुनी ओसरीवरी निवडून घेई धान्ये सारी
हळूच पाहुनी इकडेतिकडे धान्य टिपण्या येते चिमणी
शेतक-याची प्रिय सखी ही साथ देई त्या शेतीकामी
फस्त करुनी अळ्या, किडेही शेतक-यांना सुखवी चिमणी
येतो पाऊस वादळवारा, वाहून नेतो तिचा निवारा
घरट्यासाठी जमवून काड्या पुन्हा घरकुल बांधे चिमणी
क्रूर परि ही मानवजाती तिला कश्याची फिकीर नसे
जंगल तोडून घरे बनविती भिऊनी त्यांना पळते चिमणी
ऐक मानवा धडा शीक हा वाचविण्यासाठी तिजला
कत्तल केली वृक्षांची तर सांग कशी मग उरेल चिमणी ?
म्हणूनच ऐका महत्व जाणा इवल्याश्या त्या चिऊताईचे
जगास सांगा ठणकावुनी हवीच चिमणी हवीच चिमणी !
Comments
Post a Comment