संत गजानन महाराज
*संत गजानन महाराज*
( छंद -अभंग चरण -४ )
गजानन स्वामी | तुम्ही माझे गुरु |
वाटे कल्पतरू | मजलागी ||१||
तुमचे चरण | हेचि गोदास्नान |
होई मी पावन | वंदुनी त्यां ||२||
तुझ्या द्वारी येती | दर्शनासी भक्त |
त्यांचे मनोरथ | पुरवी तू ||३||
शेगावी राहुनी | केले चमत्कार |
झाले साक्षात्कार | भक्तगणा ||४||
लाभो मज देवा | तुझा सहवास |
तूच माझा ध्यास | रात्रंदिन ||५||
तुझी जी समाधी | माझी ती पंढरी |
घडो मज वारी | शेगावीची ||६||
माझ्या हाती नित्य | घडो तुझी सेवा |
हेचि दान देवा | द्यावे मज ||७||
सदा तुझे नाम | असो माझ्या मुखी |
ठेव मज सुखी | "स्वाती" म्हणे ||८||
©️ स्वाती शृंगारपुरे
दासनवमी १५/०२/२०२३
Comments
Post a Comment