गुलाबी स्वप्न
*गुलाबी स्वप्न*
ऐक सखे गं मनीचे माझ्या गुपित सांगते एक तुला
भल्या पहाटे रोज पडतसे गोडगुलाबी स्वप्न मला
स्वप्नामध्ये येतो माझ्या कुणी देखणा राजकुमार
भासे जणू की साजण माझा घोड्यावरती असतो स्वार
प्रिये ऐक ना म्हणे मला तो तुजवर मी जाहलो फिदा
हाय तुझे हे रुप साजिरे हाय तुझ्या दिलफेक अदा
डोळे सुंदर पाणीदार अन् नाक जणू की चाफेकळी
गोब-या गुलाबी गालावरची खुणविते मला ती गोड खळी
भुरूभुरू उडती वा-यावरती खट्याळ कुरळ्या केशबटा
ओठामधले मंद स्मित अन् लज्जेच्या रंगीत छटा
तुझ्या रुपाने ओढ लावली घायाळ झालो मी सजणी
सांग प्रिये तू आज मला, होशील का माझी राणी?
स्वप्न पाहता असे सखे गं मनोमनी मी मोहरते
ऐकुनी त्याची स्तुतीसुमने गालावर लाली फुलते
प्रेम प्रेम म्हणतात तेच हे मजला ऐसे वाटतसे
ह्रदयमंदिरी माझ्या सदोदित एक तोच अन् तोच वसे
जेव्हापासून असे गुलाबी स्वप्न सखी मी पाहीले
हरवुनी गेले भान हरपून मी न माझी राहीले
मी न माझी राहीले!
©️ स्वाती शृंगारपुरे
दि. 0१ जानेवारी, २०२३
Comments
Post a Comment