हळदी कुंकवाचा करंडा
*हळदी कुंकवाचा करंडा*
( मुक्तछंद रचना )
सौभाग्याचं लेणं असतं म्हणे हळदीकुंकू
करंडा भाग्यवंतच म्हणायचा
ह्या सौभाग्यलेण्याला स्वतःत सामावणारा
इवलासा पण आकर्षक
प्रत्येक विवाहितेचा अमूल्य ठेवा
एका खणात लालेलाल कुंकू अन्
दुस-यात पिवळीधम्मक हळद
फार जपते स्त्री त्याला
जरा जरी लवंडला ना,
तर अपशकुन होतो म्हणतात
म्हणून जीवापाड जपायचा त्याला
जशी सर्वांची मनं जपत,
ती विवाहिता करत असते
जीवनाची यशस्वी (?) वाटचाल...
आहुती देते ती तिच्या स्वप्नांची...
त्या करंड्यातल्या कुंकवात
अन् मनावर झालेल्या जखमांवर भरते हळद
अन् बोटं बुडवत त्या करंड्यात
लावून घेते हळद कुंकू स्वतःच्या कपाळावर
अन् सुखस्वप्ने रंगवते सुखी संसाराची
मग सुखी वैवाहिक जीवनासाठी
कवेत घेतो तिला
तिचा हळदीकुंकवाचा करंडा!
©️स्वाती शृंगारपुरे
१२ ऑक्टोबर, २०२२
Comments
Post a Comment