दहीहंडी डहाणूची
*दहीहंडी*
सण वर्षाचा दहीहंडीचा चला चला सत्वरी
परंपरा ही पूर्वजांची जपूया ह्रदयांतरी
डहाणू अपुले गाव वसले समिंदराच्या काठी
मंदिर तेथील आतूर झाले श्रीकृष्णजन्मासाठी
गाऊ भजने, कवने सारे जमुनी त्या मंदिरी
परंपरा ही पूर्वजांची जपूया ह्रदयांतरी
या रे सारे या रे मंदिरी जमूया सांजवेळेला
भेटू सारे, सभाही घेऊ जमवू आनंदमेळा
नाती अपुली मायेची देऊ त्यास उभारी
परंपरा ही पूर्वजांची जपूया ह्रदयांतरी
होऊ हर्षित अतिआनंदित जरी बरसे पाऊसपाणी
जल्लोषाने करू आरती अन् रंगून जाऊ भजनी
तमा न आम्हा कसली जरी ती रात्र असे अंधारी
परंपरा ही पूर्वजांची जपूया ह्रदयांतरी
पुष्पमालांनी सजवू आपण कान्हाचा पाळणा
दहीपोहे अन् खडीसाखरेचा प्रसाद कुणी आणा
एकमुखाने करुया जयघोष जेव्हा जन्मे कृष्णमुरारी
परंपराही पूर्वजांची जपूया ह्रदयांतरी
दिवस उगवता हंडी फोडून निघूया विसर्जनाला
नगरप्रदक्षिणा करुया नाचत भिजवू एकमेकाला
फिरवू पालखी जगजेठीची प्रत्येक घराच्या द्वारी
परंपरा ही पूर्वजांची जपूया ह्रदयांतरी
चला मंडळी उठा सत्वरी नावनोंदणी करा
बाळगोपाळांसी शिकवू अपुली परंपरा
नाळ आपुली डहाणूस जोडली, जरी घेऊ गगनभरारी
परंपरा ही पूर्वजांची जपूया ह्रदयांतरी
Comments
Post a Comment