काॅ.मदन फडणीस

 * राष्ट्रहिताय कामगारहिताय च !*

 कामगारनेते काॅम्रेड ॲडवोकेट मदन फडणीस 


    दि. ०२ मार्च, २००९. शिवाजी पार्क स्मशानभूमीवर अफाट जनसागर लोटला होता. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य कामगार स्त्रीपुरुष बस, टॢक किंवा मिळेल त्या वाहनातून धाव घेत होते. आपले पितृछत्र हरपल्याची भावना प्रत्येक कामगार स्त्री पुरुषांच्या मनात दाटून येत होती.  

      कोण होते हे कामगारांचे नेते? तर हे होते काॅम्रेड ॲडवोकेट मदन फडणीस!

      दि. २३ सप्टेंबर, १९२३ रोजी एका सुसंस्कृत कुटुंबात मदनजींचा जन्म झाला.  त्यांचे वडील ब्रिटीश राजवटीत पोलिस खात्यात अधिकारी होते. वडील ग. द. फडणीस व आई सरस्वतीबाई ह्यांच्या प्रेमळ छत्राखाली कोल्हापूर येथे शालेय शिक्षण पूर्ण करून अर्थार्जनासाठी मदनजींनी मुंबई गाठली व तिथे त्यांना रेशनिंग इन्स्पेक्टर ची नोकरी मिळाली. 

     थोडे आर्थिक स्थैर्य आल्यावर मूळचे कोल्हापूरपासूनच गुप्त पद्धतीने चालत असलेले इंग्रज राजवटीविरुद्धचे कार्य आणि कामगार संघटनांचे कार्य जोमात करण्यास त्यांनी सुरुवात केली.  महाविद्यालयीन शिक्षण चालू ठेवत त्यांनी गिरणी कामगार लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिले.  बी.ए. ची पदवी मिळवून त्यांनी कायद्याचीही पदवी प्राप्त केली व वकिलीची सनद मिळवली.  तत्कालीन सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व कामगारनेते काॅ. के.टी. सुळे हे मदनजींचे मामा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारविषयक कायदे आत्मसात करत कामगारांचे वकील म्हणून मदनजींनी देशभर नावलौकिक मिळविला. 

      रेल्वे कर्मचारी संघटनेच्या आंदोलनात कर्मचाऱ्यांना मदत केल्याबद्दल राज्य सरकारने त्यांना 'देशद्रोही' ठरवून त्यांची रेशनिंग खात्यातील नोकरी काढून घेण्याचे ठरवले.  परंतु, तोपर्यंत मदन फडणीस ह्या नावाचा दबदबा इतका वाढला होता की सरकारच्या ह्या कृतीमुळे आता दुसरे आंदोलन उभे राहील की काय अशी सरकारलाच भिती वाटली व गृहमंत्री मोरारजीभाई देसाई ह्यांनी मदनजींना केबिन मध्ये बोलावून राजीनामा देण्याची विनंती केली. स्वाभिमानी मदनजींनी तात्काळ नोकरीचा राजीनामा दिला व कामगार चळवळीत स्वतःला झोकून दिले. 

       मदनजींच्या ह्या महान कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी कै. सौ. मंगलाताई ह्यांनी पाठिंबा दिला व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सर्वार्थाने स्वतःच्या खांद्यावर घेतली.  

     कामगारांच्या समस्या समजावून घेत त्यातून सुयोग्य मार्ग काढणारे मदनजी कामगारांना जणू थोरले भाऊच वाटत. कामगारांचे ते लाडके "दादा" बनले होते. गिरणी कामगारांचे प्रश्न एवढाच त्यांच्या कामाचा आवाका नव्हता, तर विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांचे दादा प्रमुख आधारस्तंभ बनले. ह्यामध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, औषध व्यवसायातील कर्मचारी,  बॅन्कींग व इन्शुरन्स तसेच शिपिंग कार्पोरेशन,  हिंदुस्थान ॲन्टीबायोटिक्ससारख्या निमसरकारी कंपन्या,  वृत्तपत्र व्यवसायातील पत्रकार व असंघटित कर्मचारी, प्राध्यापक, डाॅक्टर ह्यासारखा बुद्धीजीवी वर्ग असे सर्वजण फडणीस वकीलांचे मार्गदर्शन व कायदेविषयक मदत घेत असत.  

     मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या मदन फडणीस ह्यांना राजकीय कारणास्तव अटक करण्यात आली. पण कामगारांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले आणि सरकारी यंत्रणेला नमते घ्यावे लागले. कामगारांच्या केसेस लढविण्यासाठी त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. कामगारांचे हित जपणारा हा वकील कोणत्याही प्रकारच्या स्वार्थासाठी झुकत नाही,  योग्य त्याच मागण्या मांडतो आणि कामगारवर्गालाही चुकीच्या कामांपासून परावृत्त करतो ह्याची नोंद विविध कामगार संघटनांप्रमाणेच कंपन्यांचे मालक तसेच न्यायाधीशांनीही घेतली.  त्यामुळे सर्वांच्याच मनात मदनजींविषयी आदरभाव होता. ह्याचेच फलित म्हणून त्यांना "श्रममहर्षी" ही उपाधी बहाल करण्यात आली. 

     अखेरच्या श्वासापर्यंत कामगारांचे हित जपणा-या मदनजींची प्राणज्योत वयाच्या ८६ व्या वर्षी मालवली आणि "आमचा आश्रयदाता हरपला" ही भावना कामगारांच्या ठायी निर्माण झाली. शोकाकुल कामगारांनी देशाच्या विविध भागांतून त्यांच्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्याजवळ निगडी येथे कामगारांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या अर्धपुतळ्याची स्थापना केली आहे व दरवर्षी पुण्यतिथीचे औचित्य साधून कामगारहिताचे कार्यक्रम तेथे आयोजित केले जातात.  

     असे हे सच्चे कामगारनेते काॅम्रेड ॲडवोकेट मदन फडणीस ह्यांना आजच्या कामगार दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन! असा नि:स्पृह कामगारनेता आता होणे नाही ! 


 - सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे


छायाचित्र सौजन्य व माहितीस्त्रोत- सौ. मृदुला सतीश राजे ( काॅ.मदन फडणीस ह्यांच्या ज्येष्ठ कन्या )

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं