शृंगार मनाचे
मन कुणा उमगेना कसे असते आतून
संवेदना प्रसवून मन, देते अस्तित्वाची खूण
मन असावे असे जणू नितळ आरसा
शुद्ध आचरणाचा त्याने नित्य घ्यावा वसा
मनाठायी नसो कधी विषयवासना
ईश्वराची भक्ती हाच मनाचा दागिना
कधी होऊनी असह्य मन जागवे वेदना
जणू काजळाची तीट दृष्ट लागो कुणाची ना
संस्कारांचे अलंकार मना सजवून जावे
भावनांच्या आवेगाने मना भिजवून जावे
भोगविलासी वृत्ती नको, नको अविचार
सद्सद्विवेक बुद्धीचा मने ल्यावा रत्नहार
मन ठेवाया प्रसन्न गुणगुणावे भजन
जशी सुवासिनीहाती बांगड्यांची किणकिण
मन असावे हळवे तरी व्हावे कणखर
कर्तव्याच्या वाटेवर दक्ष व्हावे क्षणभर
मना नको अहंकार अन् चोचले तनाचे
त्याग, प्रेम, समर्पण हेच शृंगार मनाचे!
Comments
Post a Comment