आनंदवारी
*स्वातीचे शब्दमोती*
मित्रांनो ,
माझ्या लहानपणी माझ्या शाळेतून विठ्ठल मंदिरापर्यन्त विद्यार्थ्यांची दिंडी निघत असे. आषाढी एकादशीला निघणा-या ह्या दिंडीसाठी जूनमध्ये शाळा सुरू झाली की लगेचच अभंगांचा सराव सुरू होई. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने आमच्या बालमनांची धरणे बांधली व भागवत धर्माच्या संस्कारांनी त्या धरणांच्या भिंती समृद्ध केल्या. आज वयाच्या चाळीशीनंतरही मनात घर करून असलेल्या त्या दिंडीवर आधारीत माझी कविता..
*आनंदवारी*
बालपण माझे
आनंदात फुलले
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन माझे झुलले
सहज आठवली मला
आज शाळेतली दिंडी
आणि नकळत माझे पाय
मग दिंडीसोबत चालले
शाळेतल्या दिंडीचा
काय तो थाट
बालगोपाळ चालायचे
मंदिराची वाट
हाती घेऊन लेझिम
झांजा नी ढोल
रस्त्यामध्ये करायचे
रिंगण गोल
विठूरायाच्या भक्तीत
होऊन दंग
बाईही गायच्या मग
गोड गोड अभंग
बाळगत नसे तमा कुणी
कोसळणा-या पावसाची
आस असे मनी फक्त
दर्शनाच्या ध्यासाची
अखेर दिंडी पोचतसे
विठूरायाच्या द्वारी
आनंदात न्हाऊन निघत
बालवारकरी
बालपणीच्या आठवांना
मन माझे भुलले
आणि नकळत माझे पाय
मग दिंडीसोबत चालले !
- स्वाती शृंगारपुरे
Comments
Post a Comment