वृक्षवल्ली त्यांना सोयरी...
- Get link
- X
- Other Apps
मी पाहिलेला झाडावर प्रेम करणारा माणूस
बालपणीच्या अनेक रम्य आठवणींपैकी मनात घर करून राहिलेली आठवण म्हणजे माझी शाळा आणि आमचे आवडते लोकरे गुरुजी. लोकरे गुरुजी आमच्या शाळेतले चित्रकला शिक्षक. पण कोणताही विषय सोपा करून शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
अतिशय संवेदनशील मनाचे लोकरे गुरुजी निसर्गावर खूप प्रेम करीत. झाडे,पाने, फुले हा तर त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. वृक्षराजीवर गुरुजींचे अतोनात प्रेम. झाडे म्हणजे सरांचा प्राणच जणू ! शाळेच्या प्रशस्त आवारातही त्यांनी मैदानाच्या कडेकडेने भरपूर झाडे लावली होती. रोज पहाटे लवकर उठून वेळेच्या पंधरा वीस मिनिटे अगोदर ते शाळेत हजर होत. झाडांना पाणी घालून मनोभावे नमस्कार करीत.
आम्हा विद्यार्थ्यांनाही ते झाडांचं महत्त्व समजावून सांगत. आमच्याकडूनही ते छोटी रोपटी लावून घेत. मातीत बिया रुजवून घेत. बी मधून हळूहळू डोकं वर काढणारं रोपटं आम्हाला दाखवताना गुरुजी इतकं भरभरून बोलत की जणू काही त्यांचं बाळच ते ! त्या चिमुकल्या रोपट्याला ते आंजारत, गोंजारत. त्याच्याशी बोलत. शाळेभोवतालच्या बागेत फिरताना गुरूजी सर्वच झाडांशी बोलत असत. शाळेच्या बागेत त्यांनी अनेक फळझाडे व फुलझाडे लावली होती. गुलाबाच्या झाडाजवळ जाऊन ते "काय गुलाबराव!" अशी ते झाडाला हाक मारीत. शेवंतीच्या झाडाला "गो शेवंते" म्हणत. नाजूकश्या वेलींवर तर त्यांचे पोटच्या पोरींसारखे प्रेम ! जाई जुई सायलीसारख्या नाजूक वेलींची ते खूप काळजी घेत. गुरुजींचे प्रेम त्या अबोल झाडांनाही बहुधा समजत असावे. त्यामुळे आमच्या शाळेभोवतीच्या बागेतली झाडे नेहमीच फळाफुलांनी डवरलेली असतं व त्यांचा एक मंद दरवळ सभोवतालचा परिसर व्यापून राही.
वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा एक चांगला संस्कार गुरुजींनी त्याकाळात आमच्या बालमनांवर रुजवला, जो आज प्रौढत्वातही मनाच्या संवेदना जागृत ठेवतो. आजही माझ्या छोट्याशा फ्लॅटच्या एका कोपऱ्यात मी सुंदरशी फुलबाग फुलवली आहे.
गावाच्या उत्तरेला एक सुंदरशी टेकडी होती. त्या टेकडीच्या पायथ्याशीच गुरुजींचे छोटेसे टुमदार घर होते. सुट्टीच्या दिवशी आम्ही अभ्यास करण्यासाठी गुरुजींच्या घरी जात असू. गुरुजींच्या पत्नी जानकीकाकू ह्यादेखिल खूप प्रेमळ होत्या. झाडांवर प्रेम करण्याची गुरुजींची आवड मनापासून स्वीकारणा-या आणि जोपासणा-या जानकीकाकू ख-या अर्थाने गुरुजींच्या अर्धांगिनी होत्या. घराभोवतीही दोघांनी मिळून सुंदरशी बाग फुलवली होती.
घराभोवतालच्या बागेत त्यांनी अनेक औषधी वनस्पतींचीही लागवड केली होती. गुरुजी स्वत: झाडपाल्यापासून औषधे बनवत असत. त्यांना प्रत्येक झाडाचे औषधी गुणधर्म माहीत होते व वेगवेगळी औषधे तयार करण्याच्या पद्धतीही अवगत होत्या. अनेकदा छोट्या मोठ्या आजांराकरिता गावकरी गुरुजींकडून औषधे घेत. गुरूजी सर्वांना विनामोबदला औषधे देत. शाळेत खेळताना एखादा विद्यार्थी पडला, तर गुरुजी चटकन् त्याला झाडपाल्यापासून स्वत: बनवलेलं औषध लावित. त्यामुळे इतर शाळांसाठी लाल औषधाच्या बाटलीची आमच्या शाळेला कधीच गरज पडली नाही. शिक्षक कक्षात एका खणात सरांनी बरीच औषधे ठेवली होती. ही सर्व त्यांच्या प्रिय झाडांपासून त्यांनी बनवली होती. शिक्षकांपैकीही कुणी आजारी असेल तर गुरुजी ह्यातली औषधे त्यांना देत. गुरुजींची औषधे अत्यंत गुणकारी असत.
मधल्या सुट्टीत किंवा फावल्या वेळात गुरुजी शाळेच्या आवारात झाडांमधून फिरत असत. झाडांवरुन प्रेमाने हात फिरवत. त्यांच्याशी बोलत. खूपदा गुरुजी झाडांशी गप्पा मारताना दिसत.
रस्त्यातल्या कुठल्याही झाडाला कोणी त्रास दिलेला गुरुजींना खपत नसे. रस्त्यातून जाताना कुणी झाड तोडताना दिसले किंवा झाडाला दगड मारताना दिसले तर गुरुजी त्यांच्या अंगावर धावून जात.
गुरुजी सतत झाडांच्या सान्निध्यात रहात. वृक्षराजी हेच त्यांचं जग होतं. बागेत सतत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येई. वेगवेगळे रंगीबेरंगी पक्षी सरांच्या बहरलेल्या वृक्षराजीत मुक्त संचार करीत. घरटी बांधत. चिमुकल्या खारोट्या इकडून तिकडे तुरुतुरु पळताना दिसत. कौतुकभरल्या नजरेने गुरूजी हा सर्व नजारा समाधानाने पहात असत आणि एक मंतरलेली अनुभूती त्या वृक्षवेड्या व्यक्तीच्या सान्निध्यात आम्ही घेत असू.
असेच दिवस सरत गेले. काळ कोणासाठी थांबत नाही. आम्ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. पेढे द्यायला सरांच्या घरी गेलो. आम्ही उत्तीर्ण झाल्याचा आमच्यापेक्षा जास्त आनंद गुरुजींना झाला. गुरुजी झाडांशी बोलू लागले. "पहा बरं, माझ्या पोरी उत्तीर्ण झाल्या!" झाडेही आनंदाने डोलू लागल्याचा भास मला त्या क्षणाला झाला.
दहावीनंतर मात्र आमची पांगापांग झाली. गावात पुढील शिक्षणाची फारशी सोय नसल्यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर गेले. मलाही वडीलांनी शहरातल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन मामाकडे राहण्यास पाठविले. शिक्षण पूर्ण होते न होते तोच आमच्यापैकी ब-याच मैत्रिणींची लग्नेही झाली व त्या आपापल्या संसारात रमल्या. अर्थार्जनासाठी शाळेतले मित्रही शिक्षण पूर्ण करून शहरात स्थायिक झाले व गावाशी संबंध हळूहळू कमी होत बंदच झाला.
इंटरनेट ने आपला सोनेरी विळखा अद्याप पसरला नव्हता असा तो काळ होता. त्यामुळे वृक्षप्रेमी लोकरे गुरुजींशी दुरान्वयानेही प्रत्यक्ष संपर्क राहीला नाही. परंतु, वृक्षसंवर्धनाचे त्या उमलत्या वयात गुरुजींनी केलेले संस्कार आजही मन व्यापून आहेत. आजही कुणी झाडे तोडताना दिसलं की मन बंड करून उठतं. त्यांना विरोध करण्याची ताकद आपोआप येते. झाडाचा जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करतो. वृक्षवेड्या लोकरे गुरुजींनी केलेल्या संस्कारांचंच हे फलित !
महानगरात रहात असूनही मी माझ्या छोट्याशा बाल्कनीत झाडे लावली आहेत. गुरुजींच्या विचारांचा पगडा आज वयाच्या पन्नाशीतही मनावर गारूड करून आहे आणि तेच संस्कार प्रेरणा देतात मला जीवनाचा संघर्ष लीलया पेलण्यासाठी, समृद्धीच्या दिशेने मार्गक्रमणा करण्यासाठी ! आणि ह्याचं श्रेय नक्कीच जातं वृक्षराजीवर अंत:करणापासून प्रेम करणा-या आमच्या लोकरे गुरुजींकडे !
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment