गुरुब्रह्मा
- Get link
- X
- Other Apps
माझा गुरू ! माझ्या प्रधान बाई !
त्यांचे पूर्ण नाव मला माहीत नाही . शाळेत सर्वजण त्यांना प्रधान बाईच म्हणत .
बाई आम्हाला मराठी विषय शिकवीत . मराठी शिकावे तर प्रधान बाईंकडूनच ! कवितांना सुमधूर चाली
लावून बाई त्या आमच्याकडून पाठ करवून घेत . र्हस्व , दीर्घ व्याकरण योग्य रितीने लिहीण्यावर त्यांचा कटाक्ष असे.
वार्षिक परिक्षेचा निकाल लागला की यशस्वी विद्यार्थ्यांच्या हातावर त्या खडीसाखरेचा खडा ठेवत .
स्वतःची परिस्थिती खडतर असूनही बाई गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके विकत घेवून देत असत . गरिबांना मदत
करण्याचा हा संस्कार त्यांच्या कृतीतूनच त्यांनी आम्हाला शिकवला .
प्रधान बाई खूप प्रेमळ होत्या . माझ्यावर तर त्यांचे फार प्रेम ! त्यांनीच जागवला माझ्या हृदयात स्त्रीत्वाचा सार्थ
अभिमान ! सावरलं मला कळीचं 'फूल ' होताना ! मला घडवताना माझ्यावर सुसंस्कारांची आभूषणे चढवली .
माझ्यातल्या उणिवाही जाणीवपूर्वक दूर केल्या .
बाई स्वतः वारकरी होत्या . साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. आषाढ महिना जवळ आला
की त्या आम्हाला दिंडीचे अभंग शिकवीत . आषाढी एकादशीला शहरातल्या विठ्ठल मंदिरात त्या आमची दिंडी घेवून जात .
भागवत धर्माचा संस्कार त्या नकळत्या वयात त्यांनी अशा पद्धतीने आमच्या निरागस मनात रुजवला .
आजही आम्ही मैत्रिणी एकत्र जमलो की हमखास बाईंची आठवण निघते .
पाऊस पडून जातो . पण त्या पावसाच्या साठलेल्या पाण्यावर धरणं बांधली जातात . तशीच बाईंनी केलेल्या संस्कारांच्या
भिंतींनी आमच्या मनाची धरणं बांधली आहेत .
दर वर्षी आम्ही गुरुपौर्णिमेला बाईंचे आशीर्वाद घ्यायला त्यांच्या घरी जातो . ह्या वर्षीही जावू . बाई आता खूप थकल्यात .
पण मला खात्री आहे ; आम्हाला पाहून त्यांना आनंद होईल. जवळ घेतील त्या आम्हाला प्रेमभराने . आवर्जून आमच्या मुलाबाळांची चौकशी करतील आणि निघताना ठेवतील प्रत्येकीच्या हातावर खडीसाखरेचा खडा !
अशा ह्या माझ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझा सस्नेह नमस्कार !
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment