लाॅकडाऊन आणि मी
- Get link
- X
- Other Apps
विषय - लाॅकडाऊन आणि मी
लाॅकडाऊन म्हणजे आव्हान, संघर्ष !
पण वाईटातून चांगलं निघतं ह्या उक्तीची ह्याकाळात प्रचिती आली.
लाॅकडाऊनमुळे माझ्या क्षमता मला कळल्या. सुरुवातीला अशक्यप्राय वाटलेली धुणीभांडी, केरकचरा ही कामं आता तितकीशी कठीण वाटत नाहीत. वेळेचं काटेकोर नियोजन केल्यामुळे स्वत:साठी वेळ मिळू लागला. रोज घरचं ताजं जेवण जेवल्यामुळे सर्वांच्या तब्येतीही स्वस्थ आणि मस्त आहेत. पिझ्झा,मॅगीच्या विळख्यात सापडलेल्या मुलांना आईच्या हातचे पदार्थ अधिक रुचकर वाटू लागले .
"घरीच तर असतेस,काम काय असतं तुला?"ह्या नवरोजींच्या प्रश्नाला आता उत्तर मिळत आहे. माझा कामाचा आवाका आणि उरक बघून त्यांच्या डोळ्यात तरळणारी अभिमानाची छटा मला सुखावून जाते.
पटापट कामं उरकत असताना स्वैपाकघराच्या खिडकीतून समोरच्या झाडावर चाललेला चिमण्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करतो.
ह्या लाॅकडाऊनने मला जसं कठीण परिस्थितीवर मात करायला शिकवलं तसंच नात्यांचीही नव्याने ओळख करून दिली. चटकन् आईला मदत करायला सरसावणारी मुले, बाहेरून काही आणायचंय म्हंटलं की"थांब गं, तू नको जाऊस,मी देतो आणून" म्हणणारा नवरा, "बस जरा, किती करतेस गं", म्हणत जमेल तशी मदत करणा-या सासूबाई, "वहिनी बरी आहेस ना?" म्हणून फोन करणारी नणंद, "ताई लाॅकडाऊन संपलं की घरी ये बरं का आराम करायला" म्हणणारा प्रेमळ भाऊ ! सगळी माझी मायेची माणसं! सुसाट सुटलेल्या आयुष्याच्या गाडीत जणू विस्कटलीच होती ही नाती ! लाॅकडाऊननं पुन्हा मला ह्या ऋणानुबंधात गुरफटून टाकलं.
थॅन्क्यू लाॅकडाऊन थॅन्क्यू !
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment