आनंदनवमी
*स्वातीचे शब्दमोती*
*आनंदनवमी*
"ओढ लाविते अशी जीवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती..."
दूरून कुठून तरी येणारे गाण्याचे सूर मन हळवं करुन गेले. फाल्गून सरत आला होता आणि आम्हा समस्त डहाणू पालघर परिसर चां.का.प्र.(डपापचांकाप्र - हा आम्ही बनवलेला सोयिस्कर शाॅर्टफाॅर्म बरं का !) कुटुंबियांना रामनवमीसाठी डहाणू ला जाण्याचे वेध लागले होते. दरवर्षीप्रमाणे रामनवमी उत्सवाकरिता डहाणू ला जाणं ह्यावर्षी अशक्य वाटत होतं अन् मातीची ओढ मन अस्वस्थ करीत होती.
भरून येणा-या डोळ्यांपुढे डपापचांकाप्र मंडळाचं श्रीराम मंदिर दिसत होतं. त्यातला तो रामनवमीचा उत्सव, श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईच्या विलोभनीय मूर्ती आणि रामजन्म सोहळ्यासाठी सुंदर सजवलेला तो चिमुकला पाळणा ! मंदिरात बसून वाद्यांच्या साथीने सुरेल भजन गाणारे मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि युवा कार्यकर्ते, त्यांच्या स्वरात स्वर मिसळून गाणारे आम्ही पुण्या मुंबई हून आलेले समस्त कुटुंबीय ! एकंदरीतच भारलेलं , मंतरलेलं प्रसन्न वातावरण !
पण ते ह्यावर्षी अनुभवायला मिळणार नाही असं वाटत असतानाच मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री. अशोक चित्रे उर्फ माऊली ह्यांच्याकडून मन प्रफुल्लित करणारा एक संदेश आला आणि अचानक हरवत चाललेलं काहीतरी गवसणार असल्याचे सुखद संकेत मिळाले.
रामनवमी ला प्रत्येक कुटुंबाने घरातच बसून जसं आपण रामनवमीला डहाणू मंदिरात भजन बोलतो तसंच प्रत्येकाने आपापल्या घरी बोलण्याचं त्यांनी आवाहन केलं. सर्वांनी आपापल्या घरी एकाच वेळेस म्हणजे दुपारी साडेबारा वाजता "नादातुनिया नाद निर्मितो" हे भजन गाऊन रामजन्म साजरा करावा असं त्या संदेशात म्हंटलं होतं. माऊलींनी त्यासोबत भजनाची व्हिडिओ, ऑडीओ क्लीप व लिखित स्वरुपातही भजन पाठवले.
झालं ! हे वाचताच प्रत्येकाच्या मनात चैतन्य संचारलं ! मरगळ झटकून आम्ही सर्वजण आजच्या रामनवमीची वाट पाहू लागलो.
आज सकाळी नेहमीपेक्षा थोडी लवकरच जाग आली. आन्हिकं उरकून मोठ्या उत्साहात नैवेद्य तयार केला आणि साडेबारा वाजण्याची वाट पाहू लागलो.
बरोब्बर साडेबारा वाजता बहुतांश डपापचांकाप्र कुटुंबियांनी आपापल्या घरी भजनाला सुरुवात केली. घंटा, झांजांचा लयबद्ध निनाद सुरू झाला व "नादातुनिया नाद निर्मितो, श्रीराम जयराम जयजयराम" चे सुमधूर सूर घरोघरी घुमू लागले. पुढची दहा मिनिटे भारलेल्या वातावरणात हा जागर सुरू होता. शरीराने घरात असलो तरी मनाने आम्ही सर्वजण केव्हाच डहाणूला पोहोचलो होतो.... प्रत्यक्ष नसलो तरी अप्रत्यक्षपणे मायेच्या माणसांच्या सान्निध्यात !
भजन संपलं . घड्याळात पाहिलं, १२.३९ ! राम जन्मला ! हो ! आमच्या घराघरात श्रीरामाने जन्म घेतला ! संकटातून आम्हाला तारणारी, मनोबल वाढवणारी सकारात्मक उर्जाच जणू आमच्या ठायी जन्म घेत होती ! आम्ही धन्य झालो.. भारलेल्या स्वरात नकळत आरती म्हणायला सुरूवात केली. इन मीन चार माणसं आम्ही घरात ! पण जल्लोषात आरती केली. पारंपारिक भोजनाचा नैवेद्य दाखवला. आनंदाने जेवलो !
अश्या त-हेने आमची रामनवमी "आनंदनवमी" ठरली.. जी डपापचांकाप्र कुटुंबियांपैकी प्रत्येकाच्या मनात लावून गेली नंदादीप एकोप्याचा अन् सुखद, सकारात्मक आशावादाचा !
|| श्रीराम जयराम जयजयराम ||
- सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे
बोरीवली मुंबई

Comments
Post a Comment