सखी

*स्वातीचे शब्दमोती*

                 *सखी*

शाळेमध्ये होती माझी
मैत्रिण एक खास
तीच अंतरी वसे सदोदित
जणू ती माझा श्वास
लाख जोडली नाती जीवनी
 उणीव न कोठे उरते गं
तरी शाळेमधले नाते अजुनी
 मनात जागे होते गं  ||१||

कधी सांगावे कानी तिच्या मी
प्रसंग काही घडलेले
तिनेही चटकन उमजून घ्यावे
गुपित अंतरी दडलेले
प्रौढत्वाकडे झुकले आता
वय हे वाढत जाते गं
पण शाळेमधले नाते अजुनी
 मनात जागे होते गं  ||२||

अभ्यासात ती थोडी मागे
 फिकीर त्याची तिला नसे
अव्वल नंबर माझा येता
हर्ष बहू तिज होत असे
हात घेउनी हाती माझा
जल्लोष यशाचा करते गं
शाळेमधले नाते अजुनी
मनात जागे होते गं  ||३||

जन्मजन्मीचे ऋणानुबंध हे
मन माझे ती वाचतसे
उदास असता अंतरंगी मी
ती नजरेने जाणतसे
"सखी आज तू उदास का?",मज
कुशीत घेउनी पुसते गं
शाळेमधले नाते अजुनी
मनात जागे होते गं  ||४||

गोडगोजिरी अशी साजिरी
मैत्रिण माझी होती
रुसवेफुगवे,अबोल्यातही
गंमत मोठी होती
आठव येता प्रिय सखीचा
भूतकाळी मन रमते गं
अन् शाळेमधले नाते अजुनी
मनात जागे होते गं  ||५||

©️ स्वाती शृंगारपुरे
📞 ८६९२८९३९८४

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं