माझी अविस्मरणीय दिवाळी


माझी अविस्मरणीय दीवाळी

     साधारण १९८०च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ. दीवाळीचा पहिला दिवस होता. त्यामुळे घर भरलेलं. तसंही एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही घरचीच १५ माणसं. त्यात दीवाळीनिमित्त आलेले पाहुणे ! 
     तर, असा हा उत्साहवर्धक दीवाळीचा पहिला दिवस. आई,आजी,काकू पटापट कामे उरकत होत्या. आम्हा मुलींनाही घरकामाचे धडे देण्यासाठी कांदा चीरणे वगैरे छोटीमोठी कामे त्या देत असत. 
     मला ही कामे मुळीच आवडत नसत. आईने मला मदतीला बोलावले की मी सपशेल नकार देई. त्या उमलत्या वयात मला कथा,कविता वगैरे लिहीण्याचा छंद जडला होता व मी सतत एका कोप-यात लिहीत बसे. 
     दीवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही मंदिरात जाऊन देवदर्शन करून आलो. आल्यावर फराळाची ताटे भरली गेली. फराळ खरोखरच चविष्ट होता. पाहुणे भरभरून स्तुती करीत होते. 
     काकूच्या सुरेखा आणि सरिता माझ्याच वयाच्या. आई,आजी,काकूला त्या फराळ बनवायला उत्साहाने मदत करीत. त्यामुळे आजी त्यांचं कौतुक करीत होती. मी काहीच मदत केली नसल्याने माझं कौतुक करण्याचा प्रश्नच नव्हता. उलट मी कशी काहीच कामाची नाही ह्याबद्दल आजी सर्वांना सांगत होती. चवदार फराळाचा आस्वाद घेत सर्वचजण "मुलीच्या जातीला सर्व आलेच पाहिजे" वगैरे  उपदेशाचे डोस मला पाजत होते.
     फराळ आटपला. मंडळी घरभर विखुरली. गप्पागोष्टींना उत आला होता. स्त्रीया स्वैपाकाला लागल्या. पुरुष मंडळींचे पानसुपारी चे फड जमले. मी अंगणात पळाले. अंगणातील प्राजक्ताने सारा आसमंत गंधाळून टाकला होता. मस्त केशरी उन्हाचे कवडसे अंगणात लपाछपी खेळत होते. मधूनच कुठूनतरी फटाक्यांचा आवाज कानावर येई. दीवाळीचा उत्साह तनामनात झंकारून उठे. 
     इतक्यात दारावर कुणी आल्याची चाहूल लागली. मी अंगणातूनच डोकावून पाहिले. दूर दरवाजावर पोस्टमन उभा दिसला. दादा त्याच्याकडून टपाल घेत होता. तिकडे दुर्लक्ष करून मी फुले वेचायला सुरुवात केली. 
      पाच मिनिटे झाली नसतील तोच"राणी, ए राणी.." अश्या दादाच्या हाका मला ऐकू आल्या. पाठोपाठ घरात बराच गोंधळ चाललेला जाणवला. हातातली परडी तशीच टाकून मी पडवीत गेले. पडवीतल्या झोपाळ्यावर बसून दादा सर्वांना काहीतरी दाखवत होता आश्चर्यानं डोळे विस्फारून सारे तिथं पहात होते. मी आल्यावर दादाने धावत उठून मला मिठीच मारली. पाठोपाठ शाळेतले देवरे सरही घरात डेरेदाखल झाले. मला काहीच कळेना. इतक्यात दादानेच उलगडा केला. पोस्टमनने आणून दिलेलं ते टपाल म्हणजे एक प्रथितयश दीवाळी अंक होता , ज्यात मी लिहीलेली एक कथा व दोन कविता छापून आल्या होत्या. मलाही कळेना की माझ्या कथा, कविता त्यांच्यापर्यन्त कश्या पोहोचल्या! पण त्याचा खुलासा देवरे सरांनी केला. 
     देवरे सर आमचे मराठीचे शिक्षक. मी उत्तम निबंध लिहीत असल्यामुळे मी सरांची आवडती विद्यार्थिनी. मला उत्तमोत्तम लिखाणासाठी ते प्रवृत्त करीत. त्यांच्याच सांगण्यावरून मी काही कथा व कविता लिहील्या. सरांना त्या इतक्या आवडल्या की त्यांनी त्या दीवाळी अंकाच्या संपादकांना दाखवल्या. आणि संपादकांच्या पसंतीस उतरल्यामुळेच त्यांना दीवाळी अंकात मानाचे स्थान मिळाले होते. 
     आता मात्र घरातले वातावरण पार बदलले. माझ्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. बाबांनी मला प्रेमाने जवळ घेतले. आजी म्हणाली पोरीची दृष्ट काढायला हवी. आपल्या घराण्यात आजवर कुणीच लेखक झालेलं नाही. पोरीनं घराण्याचं नाव काढलं. आजोबांचे वृद्ध डोळे आनंदाने लकाकत होते. इतक्यात काकू खरोखरच मीठ मोहरी घेऊन आली. माझी दृष्ट काढण्यात आली. आईने लामणदिवा तयार करून मला पाटावर बसवून औक्षण केले. आलेली पाहुणे मंडळी कौतुकसुमनं उधळीत होती. अंकातील माझे साहित्य वाचण्याची सर्वांना घाई झाली होती. ह्या दीवाळीने मला भरभरुन आनंद दिला अन् ही दीवाळी कायमची मनात घर करून राहिली. 
     त्यानंतर आजवरच्या आयुष्यात मी भरपूर लेखन केले. अनेक प्रथितयश वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून माझे साहित्य प्रकाशित झाले, खूप मान सन्मान मिळाला, परंतु कायम स्मरणात राहिली ती दीवाळी जिने मला एक लेखिका, कवयित्री म्हणून सन्मान मिळवून दिला. 
      दीवाळी संपली. नातेवाईक पांगले. शाळा सुरू झाली. दहावीचं वर्ष असल्यामुळे मीही जोमाने अभ्यासाला लागले. शाळा सुरू होऊन आठ दिवसही झाले नसावेत, इतक्यात त्या अंकाच्या कार्यालयातून एक शिपाई मला शोधत शाळेत आला. माझ्या छापून आलेल्या साहित्याचे मानधन म्हणून पंधरा रुपये रोख एका पाकीटात घालून त्याने आणले होते. मुलांनी हातात एवढे पैसे घेण्याचा तो काळ नव्हताच. मी तसेच ते पाकीट देवरे सरांच्या ताब्यात दिले. सरांनी ते आईला नेऊन दिले. आईने ते पाकीट देवापुढे ठेवले व मनोभावे देवाला हात जोडले. 
      पुढील आयुष्यात मी खूप पैसे कमावले; पण त्या पंधरा रुपये मानधनाची किंमत आजही लाखमोलाची वाटते. त्या दीवाळीने मला नाव दिलं, लेखिका म्हणून ओळख दिली स्वकष्टाची कमाई दिली अन् घरात आलेले पैसे आधी देवापुढे ठेवण्याचा संस्कारही दिला, जो मी आजही काटेकोरपणे पाळते. म्हणूनच ती दीवाळी माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. आज पन्नाशीच्या उंबरठ्यावरही ती दीवाळी जशीच्या तशी आठवते अन् मन भावूक होऊन गतस्मृतीत रंगून जातं! 

 - स्वाती शृंगारपुरे
 बोरीवली, मुंबई

भ्रमणध्वनी ८६९२८९३९८४

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं