निरोप
*स्वातीचे शब्दमोती*
*निरोप*
वेळ येता निरोपाची दु:ख दाटते मना
परंतु त्यातच पुनर्भेटीचे गमक दडले ना ?
पुनर्भेटीची लावूनी आस देई मनास दिलासा
निरोप असतो क्लेशकारक, तरीही हवाहवासा
कन्या जाते सासुरासी निरोप पित्याचा घेई
मिठीत घेऊनी डोळे पुसता ह्रदय हेलावून जाई
संसार सुखाचा होवो त्यांचा ही पिता बाळगे आशा
निरोप असतो क्लेशकारक, तरीही हवाहवासा
लेक जातो उच्च शिक्षणा सोडूनी अपुला देश
अभिमान मातेच्या ह्रदयी दाटे सोडवी मायेचे पाश
होईल यशस्वी शिकूनी तेथे देते मनास दिलासा
निरोप असतो क्लेशकारक, तरीही हवाहवासा
बालपणीच्या सख्या भेटती अवचित एके दिवशी
गूज मनीचे उलगडू लागते बसूनी त्यांच्यापाशी
ह्रदय उचंबळे निरोप घेता परि लाभे मनास दिलासा
निरोप असतो क्लेशकारक, तरीही हवाहवासा
अखेरचा तो निरोप मात्र अती दु:खदायी
सोडूनी जाता जिवलग कुणीतरी अश्रू अनावर होई
एकरुप तो परमात्म्याशी नुरते काही पिपासा
हा निरोप मात्र क्लेशकारक अन् वाटे नकोनकोसा !
© स्वाती शृंगारपुरे
८६९२८९३९८४
Comments
Post a Comment