आठवणीतला गणेशोत्सव
*स्वातीचे शब्दमोती*
*आठवणीतला गणेशोत्सव*
गणेशोत्सव म्हंटलं की अर्थातच सर्वत्र उत्साहाचं,चैतन्याचं वातावरण ! बदलत्या काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरूप जरी बदलत गेले तरी उत्साह व भक्तिभाव आजही कायम आहे.
आमच्या बालपणीही गणेशोत्सव म्हणजे फार मोठी पर्वणी असे. श्रावण मध्यावर आला की घरोघरी गणेशोत्सवाची तयारी सुरू होई. बाजारात सर्व वस्तू उपलब्ध असल्या तरीही 'रेडीमेड' ची पद्धत त्याकाळी प्रचलित नव्हती. सर्वप्रथम घरातील स्त्रीया मोदकांची तयारी करीत असत. बेगमीच्या दिवसांत घरात साठवण करून ठेवलेला सुगंधी तांदूळ बाहेर काढला जाई. तांदूळ स्वच्छ धुवून,वाळवून घरीच जात्यावर दळला जाई. तांदूळ दळताना त्याचा एक प्रसन्न सुगंध घरात दरवळत असे. गणेशाच्या आगमनाची वर्दीच जणू तो प्रसन्न दरवळ घरभर पसरवत असे. दळून तयार झालेले मोदकासाठी लागणारे पीठ घासूनपुसून चकचकीत केलेल्या पितळी डब्यात भरून ठेवले की घरच्या स्त्रीयांच्या चेह-यावरील प्रसन्न भाव पाहण्यासारखे असत.
एका बाजूला घरातील पुरुष मंडळींची घराच्या अंतर्गत डागडुजीची कामे सुरू होत. एक एक करत घरातील सर्व खोल्यांना - शक्य नसेल तर निदान गणेशाची स्थापना ज्या खोलीत करायची असेल, त्या खोलीला रंग लावला जाई. जुने, परंपरागत चालत आलेले एखादे टेबल प्रत्येक घराचा एखादा कोपरा व्यापून वर्षानुवर्षे दिमाखात उभे असायचे.अस्सल सागवानी लाकडाच्या त्या वजनदार टेबलाला बाहेर काढून त्याची आवश्यक ती डागडुजी करून गणेशाच्या स्थापनेसाठी सुसज्ज केले जाई. पूजेची तयारी व त्यासाठी लागणा-या सामानाची खरेदी ही दोन्ही कामे आजी आजोबा मोठ्या आनंदाने स्वत:च्या ताब्यात घेत व बिनबोभाट पार पाडत.
गणेशोत्सव तोंडावर आला की मखर बनवण्यासाठी घरात एकच लगबग सुरू होई. नुकतीच मिसरूड फुटलेला घरातलाच एखादा दादा त्याच्याच वयाच्या मित्रमंडळींना मखर बनवण्यासाठी घरी आणत असे आणि ह्या कंपूची मग रात्री उशिरापर्यंत घरात धम्मालमस्ती चाले. आम्ही बच्चेकंपनी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या कामात लुडबूड करत असू. आत्तासारखी तयार मखरे तेव्हा मिळत नसत आणि तयार वस्तू वापरण्याची लोकांची मानसिकताही नव्हती.
घरात घुसलेला दादाचा चमू उत्साहात काही ना काही छानशी सजावट उभी करीत असे. त्यांची ती लगबग घराच्या उत्साहात भर घाली. कितीही आधीपासून सुरुवात केली तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सजावट चालूच असे आणि त्यासाठी ती मुले बाबांचा,काकांचा ओरडाही खात. तरीही 'ये रे माझ्या मागल्या' म्हणत पुढच्या वर्षी पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत असे !
गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी दुरून येणा-या नातेवाईक मंडळींनी घर भरून जाई. शहरातून येणारे चुलते कुटुंबकबिल्यासह डेरेदाखल होत व संपूर्ण कुटुंब एकत्र जमलेले पाहून आजीचे थकलेले डोळे आनंदाने लकाकत असत. नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवत पडवीतल्या झोपाळ्यावर बसून आजोबा समाधानाने हा आनंदसोहळा पहात असत.
दिवाणखान्यात गप्पागोष्टींना उत आलेला असे , तर माजघरात स्त्रीयांचा उत्साह ओसंडून वहात असे. स्वैपाकघरात सतत चुलीवर असणारे चहाचे आधण घराच्या अगत्यशील पाहुणचाराची ग्वाही देई.
प्रत्यक्ष चतुर्थीच्या दिवशी सर्वजण पहाटे तीन वाजताच उठत. भल्या पहाटे पाण्याचा बंब पेटवून भराभर स्नाने उरकली जात. मांगल्याचे प्रतिक असलेले दारच्याच केळीचे खांब दरवाज्यावर आरूढ होऊन घराचा उंबरठा मंगलमय करीत. त्यासमोर मुलींनी घातलेल्या रेखीव, नक्षीदार रांगोळ्या उठून दिसत.
पहाटेच्या रम्य वातावरणात पुरुष मंडळी बच्चेकंपनीला सोबत घेऊन गणेशमूर्ती आणायला जात. "गणपतीबाप्पा मोरया" च्या जयघोषात गणेशाचे आगमन होई आणि सर्व घरच त्या आनंदोत्सवात न्हाऊन निघे.
श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भटजी येत. मंत्रोच्चाराच्या पवित्र जयघोषात बाप्पाची विधीवत पूजाअर्चा केली जाई. त्यानंतरचे पुढचे सर्व दिवस अतिशय धामधुमीत व उत्साहात पार पडत. गणेशासमोर आरत्या, भजने गायली जात. झांजांच्या लयबद्ध निनादातील आरत्यांचा तो नादमधुर जयघोष वातावरणाच्या मांगल्यात भर घाली.
दुपारच्या जेवणातील गूळ नारळाच्या मधूर सारणाने ठासून भरलेले,वेलदोड्यांच्या घमघमाटाने सजलेले घरगुती उकडीचे पांढरेशुभ्र कळीदार मोदक आणि त्यावर घरगुती तुपाची धार भूक न चाळवतील तर नवलच! "कॅलरी कॉन्शसनेस" वगैरे संकल्पना त्याकाळी अस्तित्वातच नसल्यामुळे आबालवृद्ध सर्वचजण मोदकावर ताव मारीत. त्यांच्या जीव्हेची तृप्ती मग घरच्या सुगरणींच्या कष्टाचे चीज करी.
पुढील प्रत्येक दिवस मग सात्विक भोजनासोबत वेगवेगळ्या पक्वांनांनी जेवणाचे पान सजत असे.
गणपती येऊन स्थीरस्थावर होत तोच गौराई चे आगमन होत असे. सात्विक आणि खानदानी सौंदर्याने सजलेल्या गौरी येताना सोबत माहेरवाशिणींना घेऊन येत आणि लेकुरवाळ्या आत्यांच्या आगमनाने घराचा आनंद द्विगुणित होई. आत्त्येभावंडांच्या येण्याने बच्चेकंपूच्या दंग्यात आणखी भर पडे आणि मोठी माणसे कौतुकाने मुलांच्या बाललीला पहात असत.
गौरीचे नैवेद्य,रात्रीचे जागरण आणि ते मनोरंजक खेळ ! झिम्मा,फुगड्यांसारख्या खेळांनी समस्त स्त्रीवर्ग गौरीची रात्र जागवित असे. गौराईचे ओसे मांडून माहेरवाशिणींचा यथोचित सन्मान करून त्यांची पाठवणी केली जात असे. गौरींचेही विसर्जन केले जाई.
बहुतांश घरातून गौरी विसर्जनाबरोबरच गणपतीचे विसर्जन करण्याचाही प्रघात होता. त्यानुसार "पुढच्या वर्षी लवकर या" अशी विनवणी करीत श्रीगणरायाचेही विसर्जन केले जाई.
घरच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर शहरातून आलेले चाकरमानीही कुटुंबासह परत जात आणि मग मात्र घर सुनेसुने वाटू लागे. परंतु त्या सुन्या घरातही तेवत असे एक नंदादीप एकोप्याचा, भक्तिभावाचा आणि समाधानाचा , जो कोणत्याही संस्कार शिबिरांशिवायच पुढच्या पिढीवर संस्कारांची नितांतसुंदर शिल्पे कोरत असे, जी आजही आमच्या हृदयातली नात्यांची ओढ कायम ठेवतात.
आता काळ बदलला. कुटुंबे विभक्त झाली. गणेशोत्सवातही रेडीमेड मखर, रेडीमेड मोदकांचे फंडे आले. तरी आजही गणेशोत्सव तितक्याच उत्साहाने साजरा होताना दिसतो. परंतु, ह्रदयाच्या अलवार कोप-यातून हळूच डोकं वर काढते ती काकूच्या हातच्या सुमधूर मोदकांची चव, हळूच खुणावतो दादाच्या मित्रांनी मखर बनविण्याच्या निमित्ताने घरात घातलेला धुमाकूळ आणि आठवण येताच भावूक करून जातात ते आजी आजोबांचे समाधानात न्हाऊन निघालेले,लकाकणारे वृद्ध डोळे !
- स्वाती शृंगारपुरे
८६९२८९३९८४

Comments
Post a Comment