सुषमा स्वराज

*स्वातीचे शब्दमोती*   ०७/०८/२०१९

*शब्दसुमनांजली*

     "ती" गेली. इहलोकीची यात्रा संपवून "ती" अनंताच्या प्रवासाला निघून गेली. तिचा पृथ्वी वरील कार्यकाल खूपच लवकर संपला. 'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला' हेच खरं !
     "ती!" सुषमा स्वराज! आम्हा स्त्रीयांचा आदर्श, आमचा अभिमान,आमचा सन्मान ! माझ्या भारत देशाची सुकन्या सुषमा स्वराज !
     त्यांचा जन्म कुठला, शिक्षण किती, आई-वडील कोण, पती कोण, मुलं किती हे आम्हाला नेहमीच सर्वप्रथम पडणारे प्रश्न सुषमाजींच्या बाबतीत आमच्या स्त्रीमनाला शिवतही नाहीत. तर त्यांचं नाव उच्चारलं की आमच्या नजरेसमोर येतं ते बुद्धिमत्तेच्या अफाट तेजाने उजळलेलं त्यांचं सोज्वळ व्यक्तिमत्व, कपाळावरचं ठसठशीत कुंकू आणि साध्या पाचवारी साडीतूनही  त्यांचं वेगळेपण जाणवावं असं दिमाखदार जॅकेट ! आम्हाला जाणवते स्त्रीत्वाचा बाऊ न करता स्वत:ला सिद्ध करणारी त्यांची धडाडी, आम्हाला खुणावतं आत्मविश्वासाने ओथंबलेलं,कानात जीव गोळा करून ऐकत राहावं असं त्यांचं प्रत्येक भाषण.... मग ते सामान्य जनतेला उद्देशून असो,संसदेतलं असो वा संयुक्त राष्ट्रसंघातलं !
     आमच्या मनात रुजतं ते त्यांचं रणरागिणी होवून संसदेत विरोधकांवर तुटून पडणारं आदिशक्ती सारखं रूप; तर आमच्या मनात सजतं ते खानदानी सुसंस्कारात मनोभावे 'करवा चौथ'चं व्रत करणारं त्यांचं सोज्वळ रूप!
     अगदी तरुण वयात विधानसभेचं मंत्रिपद त्यांनी भूषवलं. जबाबदा-यांचं भान ठेवून कार्य करीत दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पदापर्यन्त त्या पोहोचल्या आणि यशाची शिखरं सर करीत भारताच्या परराष्ट्रमंत्री हे मानाचं परंतु,जोखमीचं पद त्यांनी लीलया पेललं. पंतप्रधानपद भूषविण्याची क्षमता त्यांच्यात होती. पण नियतीला ते मंजूर नसावं बहुधा ! तिनं त्यापूर्वीच सर्व दारं बंद करून टाकली अन् सुषमाजींना अनंताच्या प्रवासाला पाठवून दिलं !
     इराक,सीरीयातून हजारो लोकांना सोडवणा-या, संयुक्त राष्ट्रसंघासमोर अत्यंत आत्मविश्वासाने भारताची बाजू परखडपणे मांडणा-या, मंत्रीपदाचा कार्यकाल संपताच सरकारी निवासस्थान स्वत:हून सोडणा-या, इंग्रजी आणि हिंदी ह्या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणा-या आणि संस्कृतचाही गाढा अभ्यास असणा-या सुषमाजी आता आपल्यात नाहीत हे वास्तव स्वीकारणं खूप कठीण जातंय !
     ज्येष्ठ नेते मा.अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या अखेरच्या दिवसात,ते अंथरुणाला खिळलेले असताना सुषमाजी नियमित त्यांना भेटायला जात असत. प्रत्येक निर्णयाची, यशाची, घडामोडीची त्या अटलजींना माहिती देत. कसं सांभाळलं असेल त्यांनी हे सारं स्वत:चे दैनंदिन व्याप सांभाळून? नुकतंच मिळालेलं काश्मीर प्रश्नातलं यश, ३७० कलम काढून टाकण्याचा तो ऐतिहासिक निर्णय! कदाचित त्याचीच माहिती अटलजींना देण्यासाठी तर त्यांनी स्वर्गलोकाची वाट धरली नसावी ??
     शारीरिक व्याधी त्यांनाही होत्याच. भोग कुणालाही चुकत नाहीत. पण त्यांनी कोणतीही कुरबुर न करता व्याधींसहित जगणं स्वीकारलं. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी कामाला सुरुवात केली. कुठून आणलं असेल एवढं शारीरिक आणि मानसिक बळ ?? खरंच त्या वेगळ्याच होत्या; आणि म्हणूनच त्या असामान्य होत्या !
     अत्यंत क्लेशदायक बातमीनं संपला कालचा दिवस! कालची रात्र समस्त भारतीयांसाठी काळरात्र ठरली. स्वतेजानं लखलखणारी अन् संपूर्ण भारत देशास प्रकाशमान करणारी ज्योत मावळली.
     सकाळची कोवळी किरणं आज मन प्रसन्न करण्याऐवजी उदास करून गेली. लौकिकार्थानं दिवस उजाडूनही आज मनात मात्र अंधार पसरलाय.... कधीच भरून न निघणारी हानी झालीय... सुषमाजींशी कधी प्रत्यक्षात भेट झालीच नव्हती.भेट होण्याचं तसं काही कारणही नव्हतं. पण तरीही आज घरचंच कुणीतरी गेल्यासारखं वाटतंय. मनाला चटका लावून,काळजावर कायमचा ओरखडा उमटवून त्या आपल्यातून निघून गेल्या.
     अशी सुषमा स्वराज आता होणे नाही ! 🙏

भावपूर्ण आदरांजली

- स्वाती शृंगारपुरे

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं