आठवणीतला श्रावण



*आठवणीतला श्रावण*

     आमच्या लहानपणी श्रावण महिना म्हणजे आम्हा मुलांना एक पर्वणीच वाटत असे. आषाढ अर्धा संपला की तेव्हापासूनच श्रावण महिन्याचे वेध लागत. राजगिरा, साबूदाणा वगैरे उपवासाच्या पदार्थांनी घरातले पितळी डबे भरून जात. तेला/तुपाच्या वाती, उदबत्त्या वगैरे पूजेसाठी लागणा-या सामानाचे काम आजी आनंदाने स्वीकारत असे. पूजेच्या साहित्याचा भरपूर साठा केला जाई. जिवती, पिठोरी सारख्या फक्त श्रावण महिन्यात पुजल्या जाणा-या देवतांच्या चित्रांची खरेदी होई. देव्हा-याजवळ खिळे ठोकून जिवतीमातेची प्रसन्न तसबीर स्थानापन्न झाली की तिच्या त्या सोज्वळ चेह-याकडे पहातच राहावेसे वाटे. लेकुरवाळ्या मातेच्या त्या अपार मायेने ओथंबलेल्या तसबिरी कडे पाहून त्या अजाणत्या वयातही नकळत हात जोडले जात.
     आखाडाच्या शेवटच्या दिवशी घरातल्या छोट्या मोठ्या दिव्यांना घासून पुसून लखलखीत केले जाई. सांजवेळेला ह्या दिव्यांच्या सात्त्विक उजेडात देवघर न्हाऊन निघत असे. जणू 'उद्यापासून मी येतोय' अशी नांदीच श्रावण ह्या मंद, सात्त्विक प्रकाशातून देत असे.
     "श्रावणात घन निळा बरसला...." ह्या गाण्याचे रेडिओतून बरसणारे सुमधूर सूर ऐकतच श्रावणाची पहिली सकाळ उजाडत असे आणि मग आमची बालमनेही "श्रावणमासी हर्षमानसी" होऊन जात!
     सण-वार,पूजा, नैवेद्य ह्यांची तर श्रावण महिन्यात रेलचेलच असे. श्रावणातला प्रत्येक दिवसच जसा सण होऊन जाई!
     नागपंचमीला आम्हा मुलींसाठी नवं परकर पोलकं आणि काचेच्या बांगड्यांची खरेदी होई. रंगीबेरंगी बांगड्या जाड पुठ्ठ्यावर अडकवून गळ्यात जाडजूड पट्टा अडकवून बांगड्या सांभाळत हळुवारपणे येणारा तो कासार जणू जादुगारच वाटे. त्याच्याकडून बांगड्या विकत घ्यायला मग वाड्यातल्या स्त्रीया आणि मुली एकच गर्दी करत. झाडाला टांगलेल्या झोपाळ्यावर झोके घेताना नव्या बांगड्या आणि परकर पोलक्याचा सोगा सावरताना आम्हा मुलींची त्रेधातिरपीट उडत असे.
     नागोबाला घेऊन येणारा गारुडी हळूच टोपलीचे झाकण उघडे. पुंगीच्या तालावर फणा काढून डोलणारा,त्याच्या टोपलीतून डोकावणारा नाग आजही मनात घर करून आहे. मोठ्या मनोभावे ह्या सर्पराजाला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवला जाई. सर्पमित्र वगैरे संघटना त्याकाळात अस्तित्वात नसाव्यात. त्यामुळे आत्ताच्या पिढीला क्रूर वाटणा-या ह्या प्रथा नकळत आमच्या बालमनावर प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचे, त्यांना पूजनीय, वंदनीय मानण्याचे संस्कार करून गेल्या.
     श्रावणी सोमवारी शाळा अर्ध्या दिवसाने सुटत असे. घरी येताना बेल,पत्री गोळा करून आम्ही आजीला आणून देत असू. आजीबरोबर गावच्या शंकर मंदिरात जाण्यातली मजा काही वेगळीच होती. गाभा-यातली ती महादेवाची धीरगंभीर पिंड ईश्र्वराच्या अस्तित्वाची जणू साक्षच देत असे. 'ॐ नमः शिवाय' च्या जयघोषात दुधाने न्हाऊन, बेलाफुलांनी सजलेली ती पिंड म्हणजे त्या जगन्नियंत्याची अप्रतिम कलाकृती वाटे आणि मग त्या नीलकंठाच्या कमंडलूतील पाण्याचे थेंब डोळ्याला लावून पावन होण्यासाठी आम्हा बाळगोपाळांची जणू स्पर्धाच लागत असे!
     घरात होणारे शिवलीलामृताचे सामुदायिक वाचन घराच्या मांगल्यात भर घाली. ह्याचप्रमाणे श्रावणी शनिवारी श्रीशनिमहात्म्याचे सामुदायिक पठण होई.
     त्यातच येणारा १५ ऑगस्ट चा स्वातंत्र्यदीन ह्रदयात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करून जाई.
     रक्षाबंधन ह्या सणाचे फारसे महत्त्व त्याकाळात नसले तरी नारळी पौर्णिमा मात्र उत्साहात साजरी होई. कोळी बांधवांनी केलेली त्या अथांग महासागराची पूजा पाहण्यासाठी सारा गाव सागर किनारी जमायचा. भक्तिभावाने सर्वजण खवळलेल्या दर्याला नारळ अर्पण करून शांत होण्याची विनवणी करीत आणि खरोखरच निष्पाप, भाबड्या कोळी बांधवांच्या विनंतीला मान देऊन तो अथांग सागरही हळूहळू शांत होत असे. रक्षाबंधन मात्र रंगीबेरंगी राख्या हाताला बांधून घेण्याइतकेच मर्यादित होते.
     दहीहंडीला बाजारू स्वरूप त्याकाळात आलेले नव्हते. पण कृष्णजन्म मात्र उत्साहात साजरा व्हायचा. पावसाळी मध्यरात्रीची नीरव शांतता भेदून जमलेले भाविक सजलेल्या पाळण्याभोवती सुरेख भजने व पाळणे गात असत.बाळकृष्णाच्या जन्मानिमित्त वाटल्या जाणा-या दहीपोह्यांच्या प्रसादाची चव आजही जीभेवर जशीच्या तशी रेंगाळतेय. मोठमोठ्या थरांची दहीहंडी आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट मात्र त्याकाळात कुठे पाहिल्याचे स्मरणात नाही.
     मंगळागौर, शुक्रवार चे हळदीकुंकू ही उत्साहात भर घालणारी आणखी काही कार्ये! रात्रभर जागून खेळलेले मंगळागौरीचे खेळ आणि तीच्या मखराभोवतीची सुरेख आरास करण्यात आम्हा मुलींच्या कलात्मकतेचा कस लागत असे.
     पिठोरी अमावस्येने ह्या पवित्र महिन्याची सांगता होई. एकीकडे बैलपोळ्यानिमित्त अन्नदात्या वृषभांची पूजा बळीराजा मनोभावे करीत असे; तर घरातील स्त्रीयांच्या मातृदिन सोहळ्याने घर आनंदात न्हाऊन निघे. "अतिथी कोणी आहे का?" असे विचारत आम्हा मुलांना वाण देणारी सात्त्विक,सोज्वळ आई आजही नजरेसमोर उभी राहते आणि नकळत डोळ्यांच्या कडा पाणावतात.
     एक ना दोन! असे अनेक सणवार आमची निरागस बालमने समृद्ध करून जात.
     श्रावण संपता संपता जणू श्रीगणेशाच्या आगमनाची वर्दी देऊनच जात असे. बाजारपेठा उत्साहाने फुलून जात. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असे. वरुणराजाही हळूहळू आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करी; आणि ह्या प्रसन्न वातावरणात हळूच श्रावण काढता पाय घेई, तो पवित्र संस्कारांची शिल्पे आमच्या ह्रदयात कोरूनच !

©स्वाती शृंगारपुरे
८६९२८९३९८४

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं