सर्वेऽपि सुखिन: सन्तु
*॥सर्वेऽपि सुखिनः सन्तु॥*
मंडळी , आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होतोय. शरद ऋतू हे निसर्गाला लाभलेलं लेणंच जणू ! नुकत्याच सरलेल्या वर्षा ऋतूत पाऊस पिऊन तृप्त झालेली ही सृष्टी सकाळच्या कोवळ्या उन्हात , दुपारच्या तप्त झळांत , संध्याकाळच्या अतिमंद तरीही सुखद गारव्यात तर रात्रीच्या टिपूर चांदण्यात आता न्हाऊन निघेल. अशा प्रसन्न वातावरणात होणारे देवीमातेचे आगमन सुखावह न ठरेल तरच नवल !
सर्वत्र आता देवीच्या भक्तीचा जागर सुरू होईल. देवीची रुपे तरी किती विविध ! कधी ती हाती त्रिशूल घेऊन दुष्टांचा संहार करणारी चंडीका बनते , तर कधी हाती वीणा घेऊन शुभ्रधवला शारदा होते... कधी सप्तशृंगासारख्या बिकट डोंगरमाथ्यावर जाऊन असुरांचा नायनाट करून तेथेच निद्रावस्थेत जाते तर कधी स्त्रीसुलभ हौसेनुसार अलंकाराने नटून तुळजापुरी वास्तव्यास जाते. कधी कंसमामासारख्या दुष्टांचा संहार करीत वीज बनून गडगडणारी विंद्याचलवासिनी बनते , तर कधी खवळलेल्या दर्यात कोळी बांधवांचं रक्षण करणारी एकवीरा ! कधी माहुरगडची रेणूका तर कधी कोल्हापुरची महालक्ष्मी बनून भक्तांच्या हाकेला धावून जाते !
तिच्या नैवैद्याच्या त-हाही किती विविध ! भक्तांकडून अर्पण करण्यात आलेला 'सामिष' नैवेद्य ती आवडीने भक्षण करते , तर कधी लोकांकडून भक्तांनी मागून आणलेला 'जोगवा'देखिल ती मनापासून स्वीकारते. गरीब -श्रीमंत , उच्च-नीच सारे तिच्याठायी सारखेच ! सर्वांवर तिची कृपादृष्टी ! भक्तांवर मायेची सावली धरणारी ही प्रेमळ माता दुष्टशक्तींचा मात्र समूळ नाश करते.
वाघ , सिंहासारख्या हिंस्त्र श्वापदांना स्वतःचे वाहन बनविणारी ही जगन्माता बंगालमध्ये दुर्गा बनून दुर्गोत्सवात रमते , तर गुजरातमध्ये गरब्याच्या ठेक्यावर ताल धरायला भक्तगणांना उद्युक्त करते. महाराष्ट्राची लाडकी भुलाबाई बनून भोंडल्याच्या पारंपारीक लोकगीतातून डोकावते तर पंजाबमध्ये मातारानी बनून घरोघरी सत्संग घडवून आणते.
हिच्या आगमनाच्या निमित्ताने घरोघरी सुवासिनी पूजन व कुमारिका पूजन केले जाते. स्त्रीयांच्या स्त्रीत्वाचा हा सन्मानच जणू !
झेंडू , कमळे , चमेली सारखी रंगीबेरंगी फुले हिला अर्पण करून भक्तगण आता रोज यथाशक्ती तिची पूजा करतील .
असेच भारलेल्या भक्तिमय वातावरणात नवरात्रीचे नऊ दिवस पार पडतील. देवीचा जागर गोंधळ , गरबा , भोंडला , आरत्या , होमहवन अशा विविध स्वरुपात संपन्न होईल. आणि विजयादशमीला ही आदिशक्ती महन्मंगला सीमोल्लंघनास निघेल ! नवरात्री उत्सवाची सांगता होईल . दस-याचा सण जल्लोषात साजरा होईल आणि मग वेध लागतील दीपावलीचे !
अशा ह्या मनःसामर्थ्यदायिनी देवीमातेच्या घटस्थापनेनिमित्त सर्वांना भक्तिमय , हार्दिक शुभेच्छा !
॥सर्वेऽपि सुखिनः सन्तु॥
卐उदो उदो卐
© स्वाती शृंगारपुरे
अश्विन शुद्ध प्रतिपदा
१० ऑक्टोबर, 2018
Comments
Post a Comment