मोरू पोरका झाला
*स्वातीचे शब्दमोती*
*मोरू पोरका झाला!*
होय ! मोरू पोरका झाला ! मोरूच्या मावशीचा चेहरा हरपला... मावशी हे जग सोडून गेली... अवघ्या 63 व्या वर्षी मोरूच्या मावशीची प्राणज्योत मालवली... मावशी देवाघरी गेली... कदाचित् देवालाही हवी असेल निखळ करमणूक..... समस्त रसिकजनांसारखं त्यालाही वेड लावलं असेल मावशीच्या जिवंत आणि कसदार अभिनयानं... नाहीतर 63 हे काही जाण्याचं वय नव्हे.
मराठी नाट्य-चित्रसृष्टीवर आज मोठा आघात झाला. सर्व मराठी रसिकजनांना दु:खाच्या खाईत लोटून सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय चव्हाण ह्यांनी आज जीवनाच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेतली.
गिरणगावातील एका छोट्याशा चाळीत त्यांचे बालपण गेले. दादर इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करून रुपारेल महाविद्यालातून त्यांनी बीए ची पदवी संपादन केली. महाविद्यालयात असताना अनेक एकांकीकांमधून त्यांनी भूमिका केल्या.
व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांनी अनेक नाटकांतून अभिनय केला व विनोदी अभिनेता ही त्यांची ओळख ठरली. श्रीमंत दामोदरपंत , टूरटूर , कार्टी प्रेमात पडली , देखणी बायको दुस-याची ही त्यांची काही गाजलेली नाटके. परंतु त्यांना लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवले ते आचार्य अत्रे ह्यांच्या "मोरूची मावशी" ह्या व्यक्तिरेखेने!
मोरूची मावशी नाटकामधील त्यांची मावशीची भूमिका खूपच गाजली. उंच, धिप्पाड देहयष्टीची मोरुची मावशी चापूनचोपून साडी नेसून, केसांचा घट्ट अंबाडा घालून नजाकतीने पावले टाकत रंगमंचावर अवतरली की टाळ्यांचा कडकडाट होई. अत्र्यांच्या मोरूच्या मावशीला विजय चव्हाण ह्यांनी ख-या अर्थाने जिवंत केले.
ह्याखेरीज अनेक चित्रपटांतूनही त्यांनी लक्षवेधी भूमिका केल्या. घोळात घोळ , वहिनीची माया सारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. जश्या विनोदी भूमिका केल्या तश्याच गंभिर भूमिकाही त्यांनी समर्थपणे पेलल्या. प्रेक्षकांना हसवता हसवता त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी , कारुण्याची झालर असलेली जत्रा चित्रपटातील त्यांची "कानोळे" ही व्यक्तिरेखा रसिकांच्या कायम स्मरणात राहीली.
लाईफलाईन , असे पाहुणे येती ह्यासारख्या काही गाजलेल्या दूरदर्शन मालिकांतूनही त्यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली. 'असे पाहुणे येती' मधल्या पाहुण्यांच्या आगमनाने ग्रासलेल्या आणि सासूबाईंच्या टोमण्यांनी त्रासलेल्या हतबल जावईबापूंची व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने लोकप्रिय केली.
अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले. चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार , संस्कृती कलादर्पणचा जीवनगौरव पुरस्कार ह्यासारखे प्रतिष्ठेचे मानले जाणारे अनेक सन्मानही त्यांना प्राप्त झाले.
गेले बरेच दिवस ते दुर्धर रोगाने आजारी होते. पण मृत्यूशी त्यांनी कडवी झुंज दिली. मृत्यूलाही परतविण्यात एकदा ते यशस्वी झाले होते. पण ह्यावेळेस मात्र यमराजाने डाव साधलाच आणि यमराजाच्या तावडीतून ह्या दिलखुलास अभिनेत्याची सुटका झाली नाही.
विजय चव्हाण ह्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची कधीच भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांची उणीव कधीच भरून निघणार नसली तरीही प्रेक्षकांच्या ह्रदयात सतत जागृत राहील ही मोरूची मावशी... कायम स्मरणात राहील त्यांनी अजरामर केलेली मोरूच्या मावशीची भूमिका आणि तीच तेवत ठेवेल रसिक ह्रदयांतील नंदादीप जे अखंड उजाळा देतील विनोदी अभिनेते विजय चव्हाण ह्यांच्या स्मृतीला !
भावपूर्ण आदरांजली
© स्वाती शृंगारपुरे
८६९२८९३९८४

Comments
Post a Comment