साई समाधी निबंध स्पर्धा

*स्वातीचे शब्दमोती*

*साईसमाधीशताब्दीवर्षानिमित्त निबंधस्पर्धा*

*द्वितीय पारितोषिकपात्र निबंध*

*विषय - श्रीसाई समाधी शताब्दी व आपल्या अपेक्षा*

       ॐ साई जय जय साई....
       साईनाम घेतच आम्ही लहानाचे मोठे झालो. तसं बघायला गेलं तर आमचं संपूर्ण घरच साईबाबांचे भक्त. बाबा सतत साईनामाचा जप करीत असत. आमच्या प्रशस्त घराच्या दर्शनी भागात श्रीसाईबाबांची एक नितांतसुंदर तसबीर होती. करुणार्द्र नजरेने साई सतत माझ्याकडेच पहात आहेत असे त्या अजाणत्या वयात मला वाटत असे व एक प्रकारची सुरक्षित भावना मनात दाटून येई. येताजाता त्या तसबिरीकडे नजर जाताच मनात भक्तिभाव दाटून येत असे व आपोआप साईंना हात जोडले जात. आई तर त्या तसबिरीची साग्रसंगित पूजा केल्याखेरीज पाणीही पीत नसे. रोज सकाळ,संध्याकाळ बाबा आणि काका साईंच्या आरत्या म्हणत असत. आम्हीही सर्वजण त्यांना साथ देत असू. उमलत्या वयात कानावर पडून मुखोद्गत झालेल्या त्या आरत्या व स्तवने आजही तोंडपाठ आहेत.
     माझे आजोबा त्याकाळी सरकारदप्तरी फार मोठे अधिकारी होते. सरकारी कामानिमित्त त्यांना अनेकवेळा शिर्डीला जावे लागे. त्यांनी साईबाबांना अनेकदा जवळून पाहिले होते. साईंच्या शिकवणीचा आजोबांवर मोठा पगडा होता व साईभक्तीचे संस्कार ते आमच्या निरागस बालमनांवर रुजवत असत.
     वर्षातून एकदा संपूर्ण कुटुंबकबिल्यासहित आम्ही शिर्डीला साईसमाधीच्या दर्शनाला जात असू. मुंबईहून अतिशय कष्टप्रद प्रवास करून आम्ही शिर्डीला पोहोचत असू. पण शिर्डीत प्रवेश केल्यावर एक प्रकारचं  भारलेपण जाणवत असे. प्रवासाचा शीण क्षणार्धात पळून जाई . शिर्डीतल्या भक्तिमय,सुखद वास्तव्याची ग्वाही जणू शिर्डीच्या प्रवेशद्वारावरच मिळत असे.
     त्याकाळात श्रीसाईसमाधीला मनोभावे वंदन करून आम्ही समाधीमंदिरात तासन् तास  बसू शकत होतो. समाधीमंदिराच्या गाभा-यात बसून आई 'स्तवनमंजिरी' वाचत असे , तर आम्ही मुले छोटी छोटी स्तोत्रे व कवने पाठ म्हणत असू. शुभ्र स्फटिकातल्या साईमूर्तीकडे त्यावेळेला पहातच रहावेसे वाटे.
     बघताबघता काळ पुढे सरकला. आम्ही मोठे झालो. अनेक बदल समाजातही झाले. माहितीच्या महाजालाचा सोनेरी विळखा सर्वत्र पसरू लागला. श्रीक्षेत्र शिर्डीनेही कात टाकली. समाधीमंदिराचे पुनरुज्जीवन झाले व साईंची मूर्ती अधिकच दिमाखदार दिसू लागली. धनाढ्य भक्तांनी चढवलेल्या अलंकारामुळे सर्वत्र सोन्याचा मुलामा चढल्यागत भासू लागले. संभाव्य अतिरेकी हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी अनेक बदल संस्थानच्या अधिका-यांना करावे लागले. संपूर्ण भारत देशावरच अतिरेकी हल्ल्याचे सावट पसरले आणि ह्याच काळात साईंच्या समाधीलाही शंभर वर्षे पूर्ण झाली. आम्हीही पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहोचलोच की ! बालपणीचं अल्लड भाबडेपण जाऊन आता मन विचारी बनलं आहे. अनेक सुखदु:खे पचवूनही साईकृपेने सुखात रहात आहोत.
     पण जेव्हा जेव्हा शिर्डीला पाऊल ठेवतो ,  तेव्हातेव्हा जाणवतात ते शिर्डीत झालेले बदल आणि मांडाव्याशा वाटतात माझ्या अपेक्षा - संस्थानकडून , ग्रामस्थांकडून आणि शिर्डीला भेट देणा-या भाविकांकडूनदेखिल !
     अनेक दशकांपूर्वी साईबाबा शिर्डीत आले आणि त्यांच्या वास्तव्याने शिर्डी पावन झाली. सर्वधर्मसमभावाची त्यांची शिकवण ,  श्रद्धा अन् सबुरीचा त्यांचा संदेश समाजाला बरंच काही सकारात्मक शिकवून गेले. पण आज त्याच शिर्डीमध्येदेखिल भिन्नधर्मिय एकोप्याने राहताना दिसत नाहीत . साईबाबांची शिकवण ते आता विसरले आहेत असे वाटते. अर्थात काळपण बदलला आहे. तरीही शिर्डी ग्रामस्थांची साईंची शिकवण विसरू नये. शिर्डीत जगाच्या कानाकोप-यातून भाविक दर्शनाला येत असतात. भाविकांचा ओघ सतत सुरू असतो. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांना खरेदीसाठी दुकाने आहेत. परंतु ,  ही दुकाने पाहता शिर्डीचे अक्षरशः बाजारीकरण झाल्याचे लक्षात येते. विकत घेतलेल्या वस्तू ब-याच वेळा निकृष्ट दर्जाच्या असल्याचे घरी गेल्यावर लक्षात येते. शिर्डीत जगभरातून भाविक येत असल्यामुळे जेव्हा त्यांनी खरेदी केलेल्या वस्तू दर्जाहीन निघतात तेव्हा जगाच्या नकाशावर भारत देशाचं नाव खराब होतं ह्याचं भान शिर्डीतील व्यापा-यांनी ठेवायला हवं. साईसमाधी शताब्दीच्या निमित्ताने देशप्रेमाचा हा वसा व्यापा-यांनी घ्यायला हवा. माल जरूर विका ,  फायदाही घ्या ; परंतु दर्जा घसरू देऊ नका एवढीच माफक अपेक्षा आहे.
         आज शिर्डी झपाट्याने बदलते आहे. आधुनिकीकरणाचे वारे शिर्डीचे शिवार व्यापत आहेत. लोहमार्गच काय , तर विमानतळदेखिल डेरेदाखल झालाय. भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ह्या भाविकांकडूनही माझ्या काही अपेक्षा आहेत. आजकाल भाविकांच्या ठायीही म्हणावा तसा भक्तिभाव दिसून येत नाही. बहुतांश भाविक हे साईदर्शनाला जरी आलेले असले तरी त्यांचा कल सहल आणि मजामस्तीकडे जास्त असलेला दिसतो. "मागणी तसा पुरवठा" ह्या तत्वानुसार शिर्डीत अनेक ठिकाणी पर्यटनस्थळे तयार झालेली दिसतात - ज्यात भाविक पर्यटक तुडुंब भरलेल्या तरणतलावात पोहताना दिसतात. कर्णकर्कश्य संगिताच्या तालावर थिरकताना दिसतात. एवढेच काय , तर मांसाहार , अपेयपानही राजरोसपणे करताना दिसतात. शहरी पर्यटकांच्या खिशात खुळखुळणारा पैसा व त्यांचं तणावपूर्ण जीवन हेच ह्याला कारणीभूत आहे. अर्थात आपला पैसा आपण कसा वापरावा हा ज्याचात्याचा  वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु ,  आपण साईबाबांच्या पावन शिर्डीत आलो आहोत ह्याचे भान पर्यटकांनी ठेवायला हवे. भक्तीचा मार्ग हा ऐषारामासाठी नव्हे , तर आत्मिक समाधानासाठी असतो  ही बाब स्वीकारायला हवी. शिर्डी हे मौजमस्तीचे ठिकाण नव्हे तर ते एक पवित्र स्थान आहे. समाधीस शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणजेच शतकाहून अधिक काळ श्रीसाई भक्तांचा सांभाळ करीत आहेत ,  भक्तांच्या मनोकामना पूर्ण करीत आहेत. आणि आपण भाविक ! भाविक म्हणावं की धम्मालमस्ती करायला आलेले पर्यटक ? हे साईसमाधी शताब्दीवर्ष आहे. निदान ह्यावर्षीपेसून तरी संकल्प करुया की शिर्डी क्षेत्राचं पावित्र्य आपण भंग करणार नाही. ज्या शिर्डीत एक शतकापूर्वी हे समाधीस्थान तयार  झालं , ती शिर्डी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. भक्तांच्या पाठीशी साई सतत खंबिरपणे उभे आहेत. मौजमस्ती करण्याचं हे ठिकाण नव्हे.
      शिर्डी साई संस्थानकडून मात्र समाधी शतादी निमित्तानेही फारश्या अपेक्षा नाहीत. संस्थान त्यांची कामगिरी अत्यंत चोख बजावत आहेत. निरपेक्ष भावनेने समाजहिताची कामे करणारे अनेक साईभक्त कार्यकर्ते संस्थानात अहोरात्र राबत असतात. जगभरातून येणा-या भाविकांची ते चोख व्यवस्था ठेवतात. अगदी मध्यरात्रीही आलेला भाविक दर्शनापासून वंचित राहू नये ह्या अनुषंगानेच दर्शनाची सोयही संस्थानने केली आहे. गरीब ,  श्रीमंत , जातपात असा भेदभाव न करणारे उत्कृष्ट प्रतीच्या धान्यापासून तयार करण्यात आलेले महाप्रसादाचे सात्विक भोजन भाविकांची क्षुधाशांती करते. शाळा, महाविद्यालयासारख्या अनेक लोकोपयोगी संस्था व उपक्रम संस्थानने सुरू केले आहेत जे उत्तम दर्जा राखून आहेत. ह्याकरीता साई संस्थानचं कौतुक करावं तेवढं थोडंच !
     गेल्या शंभर वर्षात समाधीमंदिरात अनेक बदल झाले. अर्थात काळानुरुप होत गेलेले बदल अपेक्षितच आहेत. आज संपूर्ण जगावरच अतिरेकी हल्ल्यांचे सावट पसरलेले दिसते. शिर्डीसारखी भाविकांनी फुललेली तीर्थक्षेत्रे कायम अतिरेक्यांच्या निशाण्यावर असतात. पण शिर्डीतील सुरक्षाव्यवस्था अत्यंत तुटपुंजी वाटते. अतिरेक्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी बसविण्यात आलेल्या बहुतांश यंत्रणा नादुरुस्त झालेल्या पहायला मिळतात. सुरक्षा व्यवस्थेतही पारदर्शकता दिसून येत नाही. यंदाचं वर्ष हे साईसमाधीचं शताब्दीवर्ष आहे. तेव्हा ह्यानिमित्ताने अपेक्षा करायला नक्कीच हरकत नाही की सर्व यंत्रणांची दुरुस्ती होऊन त्या पुन्हा कारायरत होतील व संस्थानच्या सेवेत रुजू होतील. त्यामुळे सुरक्षा अधिका-यांची आणि कर्मचा-यांचीही कार्यकुशलता वाढेल आणि अतिरेकी हल्ल्यांची शक्यताही काही अंशी तरी कमी होईल.
     दुसरी महत्वाची नकारात्मक बाब जी शिर्डीत फिरताना जाणवते ती म्हणजे येथे फिरणारे बहुसंख्य भिकारी ! अतिशय मोठ्या संख्येने शिर्डीत भिकारी आढळतात. हे भिकारी भाविकांच्या मागेपुढे भीक मागत फिरताना दिसतात. शिर्डी हे जगाच्या नकाशावरील महत्वाचे तीर्थक्षेत्र व बाहेच्या देशातूनही येथे भाविक येत असतात.  हे भिकारी परदेशी भाविकांना तर खूपच त्रास देतात. समाधी शताब्दी वर्षानिमित्ताने मी संस्थानच्या अधिका-यांकडून भिका-यांचं पुनर्वसन करण्याची अपेक्षा बाळगत आहे. अनेक कठीण कामे लीलया करून दाखविणा-या श्रीसाईसंस्थानला भिका-यांचं पुनर्वसन करणं मुळीच अशक्य नाही.
     शंभर वर्षांचा काळ लोटला. शिर्डीत खूप सुधारणा झाल्या. अनेक सकारात्मक बदल झाले. जे बदल आवश्यक असूनही अद्याप झालेले नाहीत तेही लवकरच होतील अशी अपेक्षा आहे.
      अपेक्षा पूर्ण होवोत अथवा न  होवोत ;  पण श्रीसाईंचे शुभाशिर्वाद मात्र कायम राहणार आहेत , आपल्यापैकी प्रत्येकाच्या पाठीशी ;  आणि तेच प्रेरणा देत राहतील जीवनाची खडतर वाटचाल यशस्वी करण्यासाठी !

 ©स्वाती सुबोध शृंगारपुरे

Comments

  1. Swati surekh.
    Mojkya shabadat paristhiti madhe hot gelela badal farch chan mandala aahe

    ReplyDelete
  2. सुंदर लेख लिहिला आहे ताई.. प्रत्येकाच्या मनातलं लिहीले आहे.. अगदी सरळ साधे पण मनाला भिडणारे आहे.. खरचं वाचताना प्रत्येकाला विचार करायला लावेल असे शब्द आहेत.. लहानपण.. जुनी शिर्डी डोळ्यासमोर उभी राहिली.. सुंदर

    ReplyDelete
  3. Swati.,..atishay surekh lekh lihila aahes...Agdi manapasun tuze Abhinandan...! Tuze vichar patle...kharach Sai sansthan ne tuzya vicharanvar yogya to pavitra ghetla pahije...Sai sansthanche Nav jagachya nakashavar zalalel he nakkii...Punha ekda tuze abhinandan...!

    ReplyDelete
  4. Swati..varil reply Ashlesha Deshpande ne dila aahe

    ReplyDelete
  5. अगदी बरोबर लिहिले आहे.
    मी पण शिर्डीतील स्थित्यंतरे पाहिली आहेत.आई स्तवन मंजिरी वाचत असताना लहानपणी निर्माल्यातील चांदीचे हारातील तुकडे वेचून प्रसाद म्हणून वहीत ठेवून दिले होते.
    आता गर्दीचा वीट येतो.नमस्कार.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं