खड्ड्यांचा रस्ता



       *खड्ड्यांचा रस्ता*

जपून हाक रे वाहन तुझे चाल जपून तू दोस्ता
गावोगावी आता जाहला खड्ड्यांचा रस्ता

मुसळधार हे मेघ बरसले कोसळल्या जलधारा
संगे त्यांच्या घेऊन आल्या सोसाट्याचा वारा
धूप होऊनी जमिनीची मग धरेस जाती तडे
म्हणून होती रस्त्यावरती जीवघेणे ते खड्डे
खड्ड्यांमध्ये विरून गेला दिमाखदार हमरस्ता
गावोगावी आता जाहला खड्ड्यांचा रस्ता

कुणी काढिती मोर्चे आणि ठोकिती आरोळी
राजकीय ते नेते अपुली भाजून घेती पोळी
कुणी झोपिती खड्ड्यांमध्ये घालूनी अंथरुणे
कुणी शासना दोष देऊनी काढिती उणेदुणे
खड्ड्यांमध्ये कुणी लाविती कमळांचा गुलदस्ता
गावोगावी आता जाहला खड्ड्यांचा रस्ता

अनेक जाहले अपघात परंतु न फिकीर त्याची कुणा
दोष ढकलूनी दुस-यांवरी ते लपविती स्वतःचा गुन्हा
कुणी न करिती जरुरी कामे कुणी न बुजवी खड्डे
कुणी न समजून घेई येथे जनसामान्यांचे रडे
दावी न अनुकंपा कुणी तुला,कुणी न वाली दोस्ता
गावोगावी असाच राही हा खड्ड्यांचा रस्ता !


© स्वाती शृंगारपुरे

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं