काळवीटाच्या निमित्ताने

*स्वातीचे शब्दमोती*

*काळवीटाच्या निमित्ताने...*

     अखेर सलमान 'जेल की सलाखों के पीछे गेला !' काळवीटाला न्याय मिळाला ! कानून से बढकर कोई नही. पण कानूनमध्ये पण 'सबको सही इन्साफ मिलने के लिये' तरतुदी आहेतच... गेला गेला म्हणताना कानून च्या ह्याच पळवाटांनी पळत पळत आपला सल्लूभाई बाहेर येऊन त्याच्या आलिशान घरात पोहोचलादेखील !
     पण एकूणच प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. अनेक गुन्हे करणारा हा गुन्हेगार "बिइंग ह्युमन" म्हणत आज अभिमानाने मिरवतो आहे. त्याचे चाहते बेंबीच्या देठापासून ओरडून त्याने केलेली सत्कृत्ये जगापुढे मांडत आहेत.
     त्यात भर प्रसारमाध्यमांची ! स्वतःच्या नैतिक ,  सामाजिक जबाबदारीचं जराही भान प्रसारमाध्यमं ठेवत नाहीत. जेथे जिथे कुठे "बाईट" मिळण्याची शक्यता वाटते , तिथे हे पापाराझींचे थवे धावत सुटतात.  आता काय तर वकील कोर्टात शिरले.. सलमान को जमानत मिलेगी या नही ! आली आली.. आता अलवीरा आली ,  अर्पिता आली... सीधे कोर्ट की तरफ चल पडी !! माॅर्निंग वाॅक करणा-या सलमानच्या वडीलांची "आसू छुपाते छुपाते" दिलेली प्रतिक्रिया ,  सब से पहले हमारे चॅनलपर !!
     जया भादुरीसारख्या संसदेतल्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीं(?)ना सलमान च्या काळजीने ग्रासून टाकलंय ! एकंदरीतच आजची देशासमोरची सर्वात मोठी समस्या सलमान सहन करीत असलेला मानसिक ताण हिच असावी असं ह्या लोकनेत्यांना वाटत असावं !
     काल तर एका टिव्ही चॅनल ने कहरच केला.  "सलमान को पनिशमेंट होगी" म्हणत फूटफूटकर रोनेवाली एक बालिका त्यांनी कॅमे-यासमोर आणली ! गुन्हेगाराला शिक्षा झाली हे योग्यच आहे असं तीला कोणीच समजवलं नाही. उलटपक्षी ,  तिच्या निरागस सलमानप्रेमाबद्दल तिचं अपरंपार कौतुक केलं गेलं. दोष तिचा नव्हेच. तिला असं वाटणं हा आपला दोष आहे. तिच्या निरागस मनाला योग्यायोग्यतेचा ताळेबंद आपण शिकवू शकलो नाही.
     हाच आदर्श आपण आपल्या भावी पिढीपुढे ठेवणार आहोत का ? सलमान खान सारख्यांचे कित्ते गिरवत आपली भावी पिढी घडणार का ??
     विद्यार्थ्यांना घडवणं ,  शिक्षण देणं  हे शिक्षकांचं काम , सुसंस्कारित करणं हे आईबाबांचं काम ! आणि मग प्रसारमाध्यमांची काहीच जबाबदारी नाही का ? सलमानखान आणि श्रीदेवीसारख्या नगण्य बातम्यांना महत्व देऊन आपण भावी पिढीकडून राष्ट्रभक्तीची अपेक्षा करत आहोत. भावी पिढी बेशिस्त असल्याचं ज्येष्ठ पिढी ओरडते आणि मधली पिढी त्याला दुजोरा देते. आपणही प्रतिनिधीत्व करतो ह्याच पिढ्यांचे. पण बहुतांश प्रमाणात आपणच जबाबदार आहोत. का घडवू शकत नाही आपण एक सशक्त पिढी , एक प्रगल्भ समाज ??
     आज आपले अनेक जवान सीमेवर लढत आहेत ,  शत्रूशी मुकाबला करत आहेत ,  धारातीर्थी पडत आहेत. पण आज किती तरुणांनी ह्याचं महत्व जाणलं आहे ? किंवा आपण मुलांच्या ह्रदयापर्यन्त ह्या गोष्टी पोहोचवण्यात किती प्रमाणात यशस्वी ठरलो आहोत ? ह्यातून प्रेरणा घेऊन सैन्यात दाखल होण्यासाठी किती तरुणांना आपण प्रवृत्त करू शकलो ?? की आपल्यालाच नको आहे आपल्या मुलांनी सैन्यात भरती होणं ?? आपल्यालाच खुणावत आहेत का भरपूर पैसा मिळवून देणारी ,  एक स्थीर आयुष्य देणारी क्षेत्रं ?? 
     बाॅलिवूडच्या बातम्या प्रसारमाध्यमांमुळे सतत मुलांच्या कानांवर आदळत असतात आणि  मनांवर रुजत असतात. प्रसारमाध्यमांनी बाॅलिवूडला दिलेलं अवाजवी महत्वच बाॅलिवूडप्रती तरुणांचं आकर्षण आणि सहभाग वाढवत असावं . अर्थात बाॅलिवूडही महत्वाचं आहेच. पण त्याचं अतिप्रमाणात उदात्तीकरण होत आहे.
    जी प्रसारमाध्यमं आज जोधपूर कोर्टाच्या बाहेर "फिल्डींग" लावून उभी होती किंवा काही दिवसापूर्वी श्रीदेवीच्या आलिशान निवास स्थानाजवळ " सबसे पहले ब्रेकींग न्यूज हमारे चॅनलपर" देण्यासाठी ताटकळत होती , त्यातले कितीजण शहीद जवानांची महती सांगणारे कार्यक्रम दाखवतात ?? कितीजण सीमेवरल्या जवानांचं जीवात जीव असेपर्यन्त लढणं 'ब्रेकींग न्यूज' म्हणून दाखवतात ? श्रीदेवीसाठी अश्रू ढाळणा-यांना शहीदांच्या नातलगांचे अश्रू दिसत नाहीत का ? शहीदांसाठी त्यांचे डोळे का पाणावत नाहीत ?
     इतके निबर झालोय आपण ? इतकं कसलं गारुड बसलं आहे आपल्या मनावर ? प्रसारमाध्यमांचं ?? ती तर त्यांचं 'मार्केटींग' करण्यात मग्न आहेत आणि आपण त्यांच्या मार्केटचे "गि-हाईक" बनत आहोत.
     मित्रांनो ,  आपल्या भावी पिढीला घडवणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून ती पार पाडायला हवी. प्रसारमाध्यमांनी तर सर्वात प्रथम ह्याचे भान ठेवायला हवे कारण तरुण त्यांचा आदर्श ठेवतात. प्रसारमाध्यमं जे दाखवतात त्यावर तरुणांचा ठाम विश्वास असतो. त्यानुसार त्यांची विचारसरणी बनत असते ,  मनाची जडणघडण होत असते.
     कृषिप्रधान भारत देशात आज कृषिवल उपाशी राहतोय ही खेदजनक व चिंताजनक बाब आहे.  क्रिकेटखेरीज कुठल्याच खेळाला आपण फारसं महत्व देत नाही ,  खेळाडू घडवण्याकडे गांभिर्याने पहात नाही हे देशासाठी खचितच घातक आहे.
     इंटरनेटच्या महाजालात गुंतत जाणारी तरुण पिढी  देशापुढील आवाहने पेलण्यास सक्षम बनविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. पण आपण स्वतःच आत्मकेन्द्री होत चाललो आहोत. उच्चशिक्षित तरुण देशाबाहेर जाऊन स्थायिक होऊ लागला आहे. "खेड्याकडे चला" चा नारा आता निरर्थक बनला आहे. कारण खेड्यांचंच आता शहरीकरण होऊ घातलंय. अर्थात ही चांगलीच बाब आहे. बदल स्वागतार्ह आहेतच. पण त्या बदलांना योग्य दिशा मिळायला हवी.
     प्रसारमाध्यमांनी अधिक जागरुक राहायला हवं. बाॅलिवूडला अतिरिक्त महत्व न देता तरुणांना योग्य दिशा दाखवणारे कार्यक्रम दाखवायला हवेत. तरुणांमध्ये असलेली उर्जा ,  बुद्धीमत्ता योग्य दिशेला वळवायला हवी.
     सरकारनेही आता अधिक कार्यक्षम व्हायला हवं. खेड्यांचं शहरीकरण करताना शेतीचंही उदात्तीकरण करायला हवं. शेतमालाला रास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने सरकारनं पावलं उचलणं गरजेच आहे. "उत्तम शेती ,  मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी" हेच समीकरण योग्य आहे हा विश्वास तरुणांना वाटायला हवा. तरच तरुण पिढी शेतीकडे आकृष्ट होईल.
     पालकांनीही आता अधिक सजग व्हायला हवं. मुलांना चांगलंवाईट पारखण्याची क्षमता पालकांनी द्यायला हवी. सोशल साईट्स् च्या अतिरिक्त वापरावर प्रथम पालकांनी ताबा मिळवायला हवा. जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत व्यतित करायला हवा. फक्त नोकरी किंवा  व्यवसायात अडकून न राहता सैनिकी प्रशिक्षणासारखे दालन मुलांना खुले करून द्यायला हवे.
    स्वातंत्र्यलढ्याचं , हुतात्म्यांच्या बलिदानाचं ,  अतिरेक्यांच्या हल्ल्यातून देशाचा बचाव करणा-या शहीदांचं महत्व तरुणांना समजवायला हवं. राष्ट्रभक्ती तरुणांच्या रक्तात भिनायला हवी ,  गात्रांत रुजायला हवी. तर भारत महासत्ता होण्याची किमान स्वप्ने तरी आपण पाहू शकू !

© स्वाती शृंगारपुरे
8692893984

https://swaticheshabdamoti.blogspot.in

Comments

  1. सद्यपरिस्थितीवर व्यक्त होणे हे सुजानपणाचे लक्षण आहे आणि ते तू केलेले आहेस. मला लेख आवडला.

    ReplyDelete
  2. सद्यपरिस्थितीवर व्यक्त होणे हे सुजानपणाचे लक्षण आहे आणि ते तू केलेले आहेस. मला लेख आवडला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं